सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ कप्पे… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
अगदी लहानपणापासून आपल्याला काही गोष्टींच आकर्षण असतं. काही वस्तुंची, गोष्टींची संकल्पना आपल्या डोक्यात फीट बसलेली असते आपापल्या आवडीनुसार.
अगदी लहानपणी खेळतांना ति.सौ.आईची पर्स घेऊन मिरवायची खूप आवड.अगदी तेव्हा पर्स असं सुध्दा न म्हणता त्या वस्तू ला प्रस अस म्हंटल्या जायचं . त्या पर्समध्ये मला नेहमीच त्या पर्सच्या आकार, रंगापेक्षाही त्या पर्सला कप्पे म्हणजेच किती “खाणे”आहेत ह्याकडेच लक्ष असायचे.जितक्या जास्त कप्प्यांची पर्स तितकी ती जास्त आवडायची.
पुढे थोडे मोठे झाल्यावर घरोघरी गोदरेज ची कपाटं आलीतं.ही कपाटं तशी सर्रास नव्हती.अगदी घरटी एखादचं असायचं.ही लोखंडी कपाटं अगदी लोकल मेड असली तरीही त्या कपाटाला सगळे “गोदरेजचं कपाट” असचं म्हणायचे.माझ्या दृष्टीने ह्या कपाटातील कप्पे हेच आकर्षण केंद्र असायचं. ह्या कपाटात खालचे आणि वरचा एक असे मोकळेढाकळे , ऐसपैस,कप्पे होते. मधल्या भागात एक अगदी छोटसं लाँकर असायचं त्याचा वापर अगदी इटुकले पिटुकले किडुकमिडूक सोन्याचे बारीकसारीक डाग ठेवायला केल्या जायचा.
एक होतं तेव्हा माझं,तुझं असा काही शब्दचं नसायचा जे काही असायचं ते “आपलं”, सगळ्यांच सामायिक असायचं. त्यामुळे त्या एकाच कपाटात वेगवेगळ्या कप्प्यात अख्ख्या कुटूंबाचं जणू सर्वस्व एकवटलेलं असायचं.
काय नसायचं त्या कपाटात? त्या कपाटात सगळ्यांचे ठेवणीतले कपडे, महत्वाचे दस्तावेज, घरातील सगळ्या हिशोबाच्या डाय-या,पैसे, ठेवणीतील फक्त पाहुणे अआले की बाहेर काढायच्या चादरी, क्राँकरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्याच्याशी निगडित असलेल्या आठवणी.
ह्या कप्प्यांनी मात्र पुढील आयुष्यात खूप मोलाची गोष्ट शिकविली. ह्या कप्प्यांच महत्त्व च वेगवेगळे. ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं स्थान वेगवेगळं. आपण ठरविलेल्या कप्प्यांमध्ये ठराविक जागीच ठराविक वस्तूचं महत्व योग्य. त्याची जर का स्थान,जागा सोडून सरमिसळ झाली तर सगळचं बिघडणारं.
तसचं अगदी मनात पण मी अनेक कप्पे तयार करुन त्याच्यात सरमिसळ होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेण्याचं ठरविलं. प्रत्येक नात्याचा कप्पा वेगवेगळा, त्याच महत्व वेगवेगळं. त्यामुळे एखाद्या नात्यात बाधा निर्माण झाली तरी आपले बाकीचे नाते सावरायला असतात, किंवा आपणही एका नात्यासाठी बाकी नात्यांचं प्रेम काळजी ह्याने सक्षमपणे उभे राहू शकतो. मनाच्या ह्या कप्प्यांमध्ये रागाचा कप्पा मात्र अगदीच छोटासा आणि मागचा निवडला,फारसा न वापरल्या जाणारा,जास्त महत्व नसलेला.
प्रेमाचा,स्नेहाचा कप्पा मात्र मोठा आणि अगदी हाताला येईल असा ठेवला,वारंवार वापरात येणारा, कदाचित कुणावर चुकीने,गैरसमजाने आरोप केले असतील,आळ घेतले असतील तर दिलदारपणे खुल्यादिलाने माफी मागण्याचा कप्पा सदैव नजरेच्या टप्प्यात ठेवलायं,जेणेकरून कुणीही व्यक्ती विशेषतः निर्दोष व्यक्ती आपल्याकडून नकळत का होईना पण दुखावल्या जाणार नाही ह्या काळजीने.
अशा त-हेचे अनेक कप्पे मनात योग्य जागी तयार केलेत ज्यामुळं मनाला एक वेगळे समाधान लाभतं लाभतं हे नक्की.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈