श्री सतीश मोघे
विविधा
☆ कोलाज… ☆ श्री सतीश मोघे ☆
शाळेत’ कार्यानुभव’ हा विषय होता. त्यात कधीतरी तुकड्या तुकड्यांचा कोलाज घरून करून आणणे, असा गृहपाठ असायचा. रंगबिरंगी घोटीव पेपर आणून ते कापायचे आणि हवे तसे चिकटवायचे. चिकटवतांना ठाऊक नसायचं की पूर्ण झाल्यावर कसे दिसेल ? वर्गात सर्वांचे कोलाज पाहिल्यावर कळायचे की आपल्याच रंगाचे कागद वापरून एखाद्याने फारच सुंदर ते केले असायचे. रंगसंगतीची जाण आणि तुकडा योग्य ठिकाणी लावणं या दोन गोष्टी कोलाज सुंदर करतात, हे समजायचं. आपण हा तुकडा इथे, तो तिथे लावायला हवा होता असं वाटायचं. हे कोलाज करायाचेच काम आयुष्यभर करायचे आहे, हे तेव्हा ठावूक नव्हतं.
दोन जीवांच्या कोलाजमधून एक नवीनच जीवाचा तुकडा जन्माला येतो. तो जन्माला आला की आईचं मातृत्वाचं कोलाज चित्र पूर्णत्वाला जातं. वयाची चार-पाच वर्ष हा ‘दिल का टुकडा’ आईचंच कोलाज विश्व आपलं समजत असतो. हळूहळू स्वतःच कोलाज तो तयार करायला सुरुवात करतो.
ही कोलाज करण्याची क्रिया अखरेच्या श्वासापर्यंत सुरुच असते.
शक्य असतील त्या वस्तू घेऊन आपण आपला संसाराच्या कोलाजचा सांगाडा उभा करतो आणि आयुष्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या भावछटांसह त्यात ठेऊन संसाराचे हे कोलाज रंगीत करत असतो.
मनुष्य हाच मुळात एकसंध नाही, त्याचं आयुष्य एकसंध नाही.. तेही तुकड्या तुकड्याचे…तुकडे तुकडे एकत्र येऊन तयार होणारे कोलाज. पुन्हा आयुष्यातले तुकडेही बदलणारे… बालपणाचे मित्र, कॉलेजचे मित्र, आताचे मित्र, बदलणारे. नातंवाईक, त्यांचे प्रेमसंबंध बदलणारे. कुणाला आपण नकोसे तर कुणी आपल्याला नकोसे. हवीहवीशी व्यक्ती कायम सोबत राहीलच याचीही शाश्वती नाही. या सर्व परिस्थितीत हाती जे जे आहे त्याचे सुंदर कोलाज करून त्याचा आनंद घेणं, हेच कौशल्य आहे.
अनुभव घेणारं मन, त्याला अनुभवापर्यंत नेणारा देह आणि या मन आणि देहाला विवेकाने हाकणारी बुद्धी या तिन्ही गोष्टी जागेवर शाबूत असल्या की, त्या त्या वेळी असणाऱ्या तुकडयांची जागा (Placement) योग्य ठरविली जाते. कोणाला किती महत्व दयायचं, कोणाला केंद्रस्थानी ठेवायचं, कोणाला कोणाजवळ ठेवायचं हे हळूहळू कळतं, हळूहळू आत्मसाद होतं.
काही तुकडे असे वाटतात की डोळे मिटून कुठेही ठेवा, शोभून दिसतात, आनंद देतात,असे वाटते. काही मात्र कुठेच मॅच होत नसतांनाही ठेवावे लागतात,असे वाटते.हा सगळा त्या तुकड्यांना असणारा वरवरचा रंग पाहून आपल्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या भावनेचा खेळ आहे,
ही भावनाच सकारात्मक आणि निर्मोही झाली की या कोलाजचा खरा आनंद मिळतो. समोरच्या तुकड्याने आपले केलेले ‘दिल के टुकडे’ आठवायचे की त्यांने आपल्याला कधीकाळी दिलेला भरपुर आनंद आठवायचा ? हाच खरा प्रश्न आहे.
आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक तुकड्याला आणि आपल्यालाही एक काळी बाजू असते आणि एक रंगीत बाजू असते.रंगीत बाजू सन्मुख,डोळ्यासमोर ठेऊन कोलाज केले तरच ते सुंदर होते…सुंदर दिसते.
आयुष्याचा कोलाज म्हणजे जोडलेल्या तुकड्यांच्या रंगीत भावछटांचा तुकड्या तुकड्यांनी घेतलेला आनंद. त्या तुकड्यांना एकसंध करून त्यात फार गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्नही करू नये. सर्वसंगपरित्याग करून आत्म्याच्या भेटीसाठी तपसाधना करणाच्या संत सत्पुरुषांची जीवने सोडली तर आपणा सर्वांची जीवने निरर्थकच. तेव्हा त्यात अर्थ शोधून बुद्धी झिजवा कशाला! एका प्रसिद्ध चित्रकाराला, “त्याने काढलेल्या ॲबस्ट्रॅक्ट चित्रात काय अर्थ आहे?” असे विचारले. तो उत्तरला “या चित्रात अर्थ शोधायचा नसतो. त्यातल्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या आकृती आणि विविध
रंगछटा केवळ भोगायच्या असतात.. त्यांचा आनंद घ्यायचा असतो.” आपलेही जीवनाचे कोलाज असेच ॲबस्ट्रॅक्ट.त्यात अर्थ न शोधता रंगांचा फक्त आनंद घ्यायचा.
हे कोलाज म्हणजे विविध व्यक्ती,त्यांच्या वेगवेगळ्या रंगछटा-भावछटांचे,स्वभाव छटांचे.. तुकड्या- तुकडयांचे जोडकाम. त्यातल्या त्यात सकारात्मक, आपल्याला भावतील, आनंद देतील असे तुकडे हाताशी घ्यावेत. त्यांच्या दोषांची काळी बाजू
नजरेआड करून गुणांची रंगीत बाजू सन्मुख करावी. आपली समज आणि कौशल्य यानुसार ते हृदयात किंवा हृदयापासून हव्या तेवढ्या अंतरावर ठेवावेत आणि रंगीत कोलाजचा घेता येईल तेव्हढा आनंद घ्यावा, हेच बरे.
अर्थात हे करताना कागदाचे कोलाज आणि आयुष्याचे कोलाज यातला एक मुख्य फरक समजून घेतला पाहिजे.कागदाच्या कोलाजचे तुकडे एकदा चिकटले की चिकटले. त्यांना कागदाला,एकमेकांना सोडून जायचे स्वातंत्र्य नाही. पण माणसाच्या जीवनातील कोलाज मधील माणसे (तुकडे) मात्र सोडून जाऊ शकतात. कधी त्यांच्या इच्छेने तर कधी नाईलाजाने. या कोलाजमधले आजूबाजूचे तुकडे सोडून गेले तर फारसा फरक पडत नाही. पण मधलेच..केंद्रस्थानी असलेले,हृदयातले तुकडे सोडून गेले तर मात्र कठीण होते. संपूर्ण कोलाजची पुन्हा नवीन मांडणी करावी लागते… नवीन तुकड्यांना सोबत घेऊन… आयुष्य आहेच असे की, हा जुन्या-नवीनचा खेळ अव्याहत सुरूच असतो.अशावेळी असे का घडले? याचा विचार करून बुद्धी शिणवण्यापेक्षा आहे त्या तुकड्यांची पुनर्मांडणी करून नव्या उत्साहाने त्याच्या रंगाचा, भावछटांचा आनंद घेणं ज्याला जमलं त्याला प्रत्येक क्षणी हे कोलाज,त्यातल्या व्यक्ती आनंद देतात,आवडतात.तुकड्या तुकड्यांच्या खंडप्राय आयुष्यात आनंद मात्र अखंड,एकसंध राहतो.
© श्री सतीश मोघे
मो – +91 9167558555
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈