डाॅ.भारती माटे

🌸 विविधा 🌸

☆ कालिंदीचे हृदयशल्य फेडले… – लेखिका : सुश्री विनिता तेलंग ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

कालिंदीचे हृदयशल्य फेडले…

श्रावण वद्य अष्टमी..

एक-कारागृहाच्या बंद भिंतींच्या आड जन्मलेला, देवकीचा तान्हा.

दुसरा-चंद्रमौळी कुटीत, रुक्मिणीच्या कुशीत जन्मलेला, विठ्ठलपंतांचा ज्ञाना.

एक सदैव भरल्या गोकुळात, सखे-आप्त, गाई-वासरे, वने-वृन्दावने, कालिंदी-यमुनेच्या सहवासात रमला.

दुधातुपात न्हाला.

दुसरा, विजनवासात, वन्य पशूपक्षी पाहत, एकांतात, बहिष्कृतीत, ओंजळभर पाण्यासाठी तळमळला, शेणा घाणीला झेलून उरला.

एक आश्रमात शिकला, महाशक्तींना आव्हाने देत समर्थ झाला, दुसरा शिकण्यासाठी वणवण भटकला, महाभागांकडून झालेले अपमान सोसूनही शांत राहिला.

एक विविध स्त्री रूपांना मोहवणारा मुरारी, दुसरा बालब्रह्मचारी.

राजकारण ते रण, दानव ते मानव, गीत ते नृत्य, मुरली ते सुदर्शन असा एक विश्वी विस्तारलेला, दुसरा आळंदीच्या पैसाच्या खांबाशी लेखणीत सामावलेला.

एकाने धर्माची स्थापना-अधर्माचा विच्छेद यासाठी युध्द केले, दुसऱ्याने खलाचे खलत्व संपवण्याचे पसायदान मागितले.

एक एकशेवीस वर्षे जगला, प्रचंड उलथापालथी घडवून, वृक्षाच्या तळाशी प्राणांतिक विध्द झाला.

दुसरा अवघ्या एकवीस वर्षात कार्य आटोपून वृक्षाच्या मुळाशी समाधीत बद्ध झाला.

अशी जीवनकथेत भिन्नता, पण वृत्तीची मात्र एकरूपता. बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण हे ठरवणे अवघड. एक योगेश्वर एक ज्ञानेश्वर. आधी एकाचे विस्तारणे आणि नंतर दुसऱ्याचे मूळ होऊन येणे, की आधी एकाने ज्ञानाचे मूळ लावून दुसऱ्याने त्याचा अर्थविस्तार करणे? जणू एकाने सर्व शक्तीनिशी समुद्र मंथन केले आणि दुसऱ्याने त्यातले अमृत आपल्या मुखी आणून घातले.

किंवा पहिल्याने स्वभावतः, सहजपणे जे केले ते दुसऱ्याने हळुवारपणे उलगडून दाखवले.

गीतेला मऱ्हाठीचा साज चढवताना ज्ञानदेवांनी जो अर्थविस्तार केला, तो अद्भुत आहे. गीतेचे मर्म सांगताना ते स्वतः विविध भूमिका जगले आहेत. ते अर्जुन होतात तेव्हा आपल्याच मनातल्या शंका स-विस्तार विचारतात. स्वतःकडे अडाणीपण घेतात. ते संजय होतात तेव्हा त्यांनाच रोमांच अनावर होतात.

ते भाष्यकाराच्या भूमिकेत जातात तेव्हा स्वतःकडे सानपण घेतात.

गुरूच्या कृपेला, व्यासांच्या प्रतिभेला अन श्रोत्यांच्या जाणतेपणाला श्रेय देऊन मोकळे होतात.

ते कृष्ण होतात तेव्हा मात्र त्याला कुरुक्षेत्रावर जे करता आले नाही ते करतात. ते अर्जुनाला खेंव देतात, त्याच्या चित्ताच्या आरशात कृष्णाला स्वतःला पाहू देतात. होरपळलेल्या अर्जुनाच्या चित्तावर उदार कृष्णमेघ होऊन बरसतात. त्याचा निर्मोही निळा शेला अर्जुनाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेत गुंतू देतात. ते कृष्ण होतात तेव्हा त्याच्या अमानवी, दैवी वाटाव्या अशा कृतीमागचे मानवीपण आपल्याला उलगडून दाखवतात.

त्यांच्या कोवळ्या शब्दांत केवढे समंजस पौरुष दडले आहे!स्त्रीत्वाचा सन्मान, तिचे दुःख, त्यावरचा उतारा, सारं त्या बालयोग्याला किती नीट कळलं आहे! 

अचाट पराक्रमाच्या गाथा, उत्कट प्रीतीच्या कथा आणि रणभूमीवरची गीता यातले कृष्ण जणू वेगवेगळेच असतात आपल्यासाठी.

आपल्यासाठी कालियामर्दन म्हणजे केवळ त्याचा अजून एक पराक्रम.

यमुनेच्या डोहात ठाण मांडून बसलेला कालियासर्प गोकुळवासियांचा काळ ठरत होता. यमुनेचे पाणी दूषित झाले होते.. कृष्ण कुठेही नेऊ शकला असता गोकुळाला!किंवा करू शकला असता तह कालियाशी.

पण त्याच्यासाठी यमुना निव्वळ नदी नाही. त्याच्या गोपालांना, त्याच्या गोधनाला पोसणारी त्यांची ती माता आहे. प्रत्यक्ष कृष्णाची तर ती सखी-सहचरी आहे.

कालिया तिच्या जलदेहाला तर विटाळतो आहेच, तिच्या पवित्रतेला नासवतो आहे. तिच्यासाठी हे अपमानजनक आहे. गोकुळाच्या लोकांसाठी तिचं पाणी म्हणजे अमृत होतं. तेच आता विषमय झालं होतं.

त्यामुळे गायी वासरं, मुलं लेकरं तिच्या तीरावर येईनात. पक्षीही तिच्यावरून उडेनात. मग कालियाचा नाश, विषाचे निर्मूलन आणि पुन्हा यमुनेने नांदते होणे. बालरूपातील कृष्णाचा अचाट पराक्रम.. इतके आपल्याला कळते.

पण ज्ञानेश्वर याच्याही पुढे जातात..

काळी सावळी कालिंदी. जीवनाने भरभरून वहाणारी, तिच्या जळांत उत्कट इच्छांची कमळे आणि तिच्या पात्रावरून मुक्त विहरणारे तिच्या स्वप्नांचे पक्षी. त्यांना तिच्यात जणू ‘कृष्णा’ दिसते. मुक्त, आत्मनिर्भर, सतत पुढे जात राहणारी मनस्वी युवती.

तिच्या मुक्ततेला बांध बसलाय कालियाचा, त्याच्या दुष्ट वासनांनी विळखा घालून तिला जखडलं आहे एका जागी. तिच्या वस्त्राला हात घातलाय इतकंच नव्हे, तर तिच्या

स्वाभिमानाला, तिच्या सन्मानाला डंख आहे हा. तिच्या मनात शल्य आहे या अवहेलनेचे. तिला दुःख आहे तिच्या अपमानाचे.

कृष्ण मानवापेक्षा संवेदनशील आहे. सहृदय आहे. त्याला तिची वेदना कळते. शरीराचीच नाही, मनाचीही.

तिच्या उरात काय सलते आहे हे त्यालाच कळते आहे फक्त.

‘हे असंच चालायचं’ म्हणून पाहत बसलेलं गोकुळ, ‘या क्रूर विषारी सर्पाला मारायला कोण धजावेल’ म्हणून मूकपणाने ती वाटच टाळणारे गोकुळ.. या भरल्या गोकुळात तो एकटाच आहे, ज्याला हे जाणवलं.

म्हणून कालिया मर्दनाचं वर्णन ज्ञानेश्वर केवळ पराक्रमाच्या अंगाने करत नाहीत. पराक्रम आणि पराभव या इतकंच महत्वाचं आहे ते प्रयोजन.

कृष्णाने पराक्रम करून कालियाचा पराभव केला त्यामागचा त्याचा हेतू गोकुळाचा पाण्याचा स्रोत शुद्ध करणं इतका मर्यादित असू शकत नाही, हे ज्ञानदेवांना जाणवलं. कालिंदीला दुःखमुक्त करणं, तिच्या हृदयातला सल काढून टाकणं हे कृष्णाचं प्रयोजन आहे.

म्हणूनच असा कृष्ण कृष्णेला तिचा सखा वाटतो. कारण त्यालाच हे समजतं..

 

तिला वाहू देणं, तिला निर्धास्तपणे उचंबळता येणं हे त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे!

गोकुळाला निर्धास्तपणे पाणी-धुणी करता येणं यापेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं ! 

त्यामुळेच ज्ञानेश्वर लिहितात,

 

कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । 

जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।

वासरुवांसाठी लाविलें । 

विरंचीस पिसे ।।

समस्त स्त्री जातीचं ऋण फेडणं सुचवतात ज्ञानेश्वर. तिचं दुःख संपवणं हे तिला मुक्त करणं नाही, तर तिचं ऋण फेडून आपण मुक्त होतो आहोत हे ज्ञानदेवांचा कृष्ण दाखवून देतो.

स्त्रियांबाबत अशी संवेदनशीलता ही आमची परंपरा आहे, ही प्रवाहित व्हायला हवी. असे कान्होबा-ज्ञानोबा जर पावलोपावली उभे रहातील तर हे शल्य मुळापासून उपसून टाकणं अशक्य नाही! 

लेखिका : सुश्री विनीता तेलंग

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments