डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर☆ 

\गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात “मौजमजेसाठी युवाईकडून ‛वाट्टेल ते’ …”ही बातमी आली होती.  काही अल्पवयीन मुले डुप्लिकेट चावी वापरुन एका व्यक्तीची रेल्वेस्टेशनवर दिवसभर पार्किंग केलेली गाडी फिरवायचे व संध्याकाळी पुन्हा जागेवर नेऊन ठेवायचे. शिवाय हल्ली काही तरुणांमध्ये अशा डुप्लिकेट चाव्या वापरुन गाड्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे असेही त्यात  म्हटले होते. परंतु या बातमीतच चौकटीमध्ये मांडलेला विचार मला जास्त महत्वाचा वाटला . “अशी कृत्ये करणाऱ्या मुलांच्या  पालकांवर आधी गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा या मुलांना अल्पवयीन असूनही योग्य ती शिक्षा झाली झाली पाहिजे.”

मुळात मुलांना योग्य वयात आल्याशिवाय हातात गाडी देणे ही चूक आहे हेच  पालकांना पटत नाही. आज अनेकदा बऱ्याच पालकांना आपली मुले “लहान वयात उत्तम गाडी चालवतात” ही आत्मप्रौढी मिरवण्यात धन्यता वाटते. वास्तविक ज्यावेळी 18 वर्षे ही स्वयंचलित गाडी चालवण्याचे वय ठरवले आहे त्यामागे काहीतरी शास्त्रीय  अभ्यास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. समजा तुमच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला हातात पैसे देऊन संपूर्ण घरखर्च चालवायची जबाबदारी दिली तर ते योग्य होईल का ?  तीच गोष्ट गाडी चालवण्याच्या बाबतीत आहे. कदाचित या मुलांची शारीरिक क्षमता परिपूर्ण असेल , पण मानसिक क्षमतेचे काय? सिनेमात बघून ‛धूम’ स्टाईल गाडी चालवणे इतकाच मर्यादित अर्थ वाहन चालवण्याच्या बाबतीत त्यांच्या दृष्टीने असतो. त्याच्या परिणामांची पर्वा या वयात त्यांना नसते.

अगदी दोन दिवसांपूर्वीच माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग घडला. रहदारीच्या रस्त्यावरुन एक स्कुटर सरळ जात होती. त्याच वेळी एका 15 ते 16 वर्षाच्या मुलाने एका दुकानासमोर पार्क केलेली आपली स्कुटर काढली. त्याच्या कानाला हेडफोन होते व तो गाणी ऐकत होता. त्या नादात समोरुन येणारी गाडी त्याला दिसली नाही व दोन्ही गाड्या एकमेकींवर आपटल्या. सुदैवाने दोन्ही गाड्यांचा वेग जास्त नसल्याने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. पण असे काही घडले असते तर ? हा त्या वयातील मानसिकतेचा, अपरिपक्वतेचा परिणाम नाही काय?

एकंदरीतच पालक म्हणून सर्वच गोष्टींमध्ये आपले मूल प्रवीण असावे अशी आपली धारणा झाली आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपोटी आपण शिक्षण, क्रीडा, कला किंबहुना सर्वच क्षेत्रात आपल्या मुलांना घुसमटून टाकत आहोत का? किंवा अकाली त्यांच्या हातात स्वयंचलित वाहने, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप यासारखी उपकरणे देत आहोत का? हल्ली एखादे पाच- सहा महिन्यांचे मूल सुद्धा मोबाईल हातात घेण्यासाठी हट्ट करते.त्याने नीट खावे म्हणून मोबाईल दाखवला जातो. त्यामुळे काहीही भरवताना तो मोबाईलशिवाय तोंडात घास घेत नाही. ही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. वास्तविक सुरवातीला आपणच ही सवय लावल्यामुळे हे होत असते. त्यामुळे जे साध्य व्हावे असे आपल्याला वाटते त्याऐवजी  बूमरँगसारखी ती आपल्यावरच उलटत आहेत. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ ही उपकरणे मुलांनी वापरु नये असा नसून ती क्षमता त्यांच्यात निर्माण झाल्यावर जर ती त्यांना दिली तर  ते हाताळण्याची प्रगल्भता त्यांच्यात येईल.

अर्थात काहीजण असेही समर्थन करतील की आमची मुले लहानपणापासून या गोष्टी हाताळत आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण नियमाला अपवाद असतोच. झी टीव्हीच्या संगीत कार्यक्रमात एखादा आठ वर्षाचा चिमुरडा इतके अप्रतिम गाऊन जातो की दिग्गज कलाकारसुद्धा तोंडात बोटे घालतात. पण म्हणून सर्वच आठ वर्षांची मुले इतके अप्रतिम गाऊ शकतील असे नाही. कारण ती क्षमताच त्यांच्यात नाही. एवढेच सत्य जरी लक्षात घेतले तरी आज ज्या अनेक समस्यांना पालक म्हणून आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments