प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
विविधा
☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
ll वसुधैव कुटुंबकमं ll
… कुटुंब हा शब्दच एक व्यापक अर्थ घेऊन येतो. कोणत्याही देशाची प्रगती ही कुटुंबाच्या प्रगतीवरच अवलंबून आहे. अनेक कुटुंबाची गल्ली, अनेक गल्यांचं गाव किंवा शहर. अनेक शहरांचे राज्य आणि अनेक राज्यांचा देश.
मुळात मी वैयक्तिक कुटुंबाचा विचार न करता, मला वसुधा म्हणेज सृष्टी कुटुंबाचा विचार करावा वाटतोय!
श्री समर्थानी लहानपणी म्हटले होते, , , ” चिंता करतो विश्वाची !” आणि ते खरेही आहेच. भारतीय संस्कृतीत
सर्व संतांनी विश्वाची गणना कुटुंब म्हणूनच केली !
वैयक्तिक कुटुंबाबद्दल न बोलणे हेच श्रेयस्कर वाटते. कुटुंब व्यवस्थेचा ढसाळता पाया बघून, काळजी दसपट वाढली आहे. ह्या व्यवस्थेला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले आहे. त्याचा उहापोह नकोच. जीवन हेच यांत्रिकी झालं आहे. इलेक्ट्रॉनिक युगात सोशल मीडियाने पूर्ण कुटुंब व्यवस्थेला ग्रहण लागले आहे. एकत्र कुटुंब पद्धती केव्हाच नामशेष झाली आहे.
माणूस हाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे ! गरज ही शोधाची जननी, असं जरी असलं तरी, कुटुंबाच व देशाचं पर्यावरण ढासळले आहे. माणसाचा वाढलेला, शहराकडील ओढा … त्यामुळे अनेक शहर नुसती फुगत चालली आहेत. जीवन हे आता संघर्षमय झाले आहे. जो तो स्वार्थी झाला आहे. आपुलकी, सहानभूती हे शब्द फक्त पुस्तकात दिसून येतात !
प्रत्येक देशात चढओढ लागली आहे. ग्रोथ रेट हे करन्सीमध्ये मोजलं जात आहे! कुटुंबाचा व त्याच्या आपुलकीचा प्रश्न मोडीत निघाला आहे. मोबाईल, लॅपटॉप, वायफाय सिग्नल हे परवलीचे शब्द झालेत! माणूस पुढे गेला म्हणून त्याची प्रगती होते का ? त्याच्या भावभावनेच काय!
हल्ली सगळीच नोकरीं करतात, त्यामुळे दुपारचं जेवण ऑफिस मध्ये. तर रात्रीच जेवण हे टी व्ही किंवा मोबाईलसह! लहान मुलांना पाळणाघर तर वृद्धाना वृद्धाश्रमात! मुलांच्यावर संस्कार करणारे वाड वडील आजी आजोबा घरात नसतील तर, त्यांच्यावर संस्कार कसे होणार! रविवारी घरातील कामे. लहान मुलावर कसे संस्कार होणार. सतत अठरा तांस घराबाहेर, झोपायला भाड्याच्या घरात!
गेली दोन वर्षे बघतोय युक्रेन व रशिया युद्ध कांही थांबेल असं वाटतं नाही. मध्य पूर्व एशियात हुती हिजबुल्ला हमास इराण एकीकडे आणि इस्त्राईल एकीकडे. जो तो आपल्या शस्त्र अस्त्र बाहेर काढून आपण किती श्रेष्ठ आहोत याची चढा ओढ पाहायला मिळते. तुमचं सगळं काही कबूल. पण अगणित कुटुंबाची वाताहत ही उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते त्याच काय!!
मानवताच नसेल तर, तो देश त्या देशातील कुटुंब संस्था प्रगतीचे बळी ठरत आहेत, असं नाही काय तुम्हाला वाटतं?? अगणित कुटुंब बेचिराख झाले. लांब नको आपल्या जवळच असलेल्या बांगलादेशच काय चाललंय हे आपण बघत आहोतच. आपले शेजारीच जर आजारी असतील तर आपले कुटुंब सुरक्षित राहील काय ? असं असंख्य प्रश्न, मंजूषेतून निघतात.
… सुसंस्कारच जर कुटुंबात नसेल तर तो देश टिकेल का?
सुखी कुटुंब सुखी देश, कुटुंबच हा जीवनातील व जगण्यातील खरा पाया आहे, असं नाही का तुम्हाला वाटतं. तसे अनेक मुद्दे उहापोह करण्यासारखे आहेत. पण विस्तार भयास्तव मी इथेच थांबतो व आपली रजा घेतो.
llसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ll
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈