डॉ गोपाळकृष्ण गावडे
विविधा
(जन्म – 11 अप्रैल 1827 — मृत्यु 28 नवम्बर 1890)
☆ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले… ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆
एवढे अनर्थ एका अविद्येने केले
विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले!”
वरील माहिती लहानपणी अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने समोर आली होती. काल महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती होती. त्यानिमित्ताने ती परत समोर आली. त्यांच्या कार्याविषयी लिहावे असे दिवसभर वाटत होते. पण दिवसा व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. आता रात्री बसून हा लेख लिहितो आहे.
वरील ओळींमधून ज्योतिराव फुलेंना नक्की काय म्हणायचे होते ते लहानपणी कधी नीट कळले नाही. पण या ओळींनी मनात कुतूहल निर्माण केले होते. नंतर जरा वाचन वाढल्यावर या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही गोष्टी उमगल्या. त्या तुमच्या समोर मांडतो आहे.
विद्या अर्थात शिक्षण नसल्याने मती अर्थात बुद्धी नष्ट होते. बुद्धी म्हणजे प्राप्त परिस्थितीचे योग्य आकलन करून चांगले दुरोगामी परिणाम देणारे निर्णय घेण्याची क्षमता.
दैनंदिन काम उत्तम दर्जाने आणि वेगाने करण्यासाठी नीती (रणनीती) आखावी लागते. पण त्यासाठी मति/बुद्धी/योग्य निर्णयक्षमता आवश्यक असते. पण मति तर आधीच अविद्येने नष्ट केलेली असते. अशा प्रकारे शिक्षणाच्या अभावामुळे दैनंदिन कामातील गती म्हणजे प्राविण्य नष्ट होते.
दैनंदिन कामातील गतीच आपल्याला वित्त अर्थात पैसे मिळवून देते. अशा प्रकारे अविद्येने (शिक्षणाच्या अभावाने) मनुष्याची आर्थिक परिस्थिती खराब होते.
तात्कालिक समाजव्यवस्थेत शूद्रांना शिक्षण देण्याची व्यवस्था नव्हती. त्या काळी शूद्रांनाही शिक्षणाची गरज वाटत नव्हती. शिक्षणाने मनुष्यात काय बदल होतात हेच मुळी त्यांना माहित नव्हते. शिक्षणाच्या अभावाने शूद्रांची आर्थिक परिस्थिती खराब झालेली होती. आर्थिक स्थिती खराब झाल्याने शूद्रांची सामाजिक स्थिती खराब झालेली होती. ज्योतीरावांनी तात्कालिक समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून वरील ओळींच्या स्वरूपात आजारी समाजव्यवस्थेचे निदान केलेले होते.
जगातील कुठल्याही समाजात बलवान आणि कमजोर असे दोन गट तयार झाल्यास बलवान गटाकडून कमजोर गटाचे शोषण सुरू होते हा इतिहास आहे. असे शोषण होऊ लागल्यास सामाजिक न्याय नष्ट होतो. समाजातील काही दुर्बल घटकांवर अन्याय झाल्याने त्यांच्यामध्ये बलवान गटाविरुद्ध आणि एकंदरीत समाजव्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होते. असा समाज गटातटात विभागाला जातो. भारतात तर जातीच्या मडक्यांची उतरंड मांडलेली होती. या उतरंडीतील प्रत्येक मडके वरच्या मडक्याकडून होणाऱ्या अन्यायामुळे त्याच्यावर चिडलेले होते मात्र त्याच वेळी आपल्यापेक्षा खालच्या मडक्याला हलके समजत त्याच्यावर अन्याय करत होते. जेव्हा समाजातील एक गट दुसऱ्या गटाला दुखावतो तेव्हा दुसरा गट प्रतिक्रियेत पहिला गट दुखावला जाईल असे काही तरी करतो. हिंसेच्या क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणून हिंसाच परत मिळते. हा प्रकार चालू राहिल्याने गटागटामध्ये टोकाचे शत्रुत्व निर्माण होते. अशा गटातटात विभागलेल्या समाजातील प्रत्येक गट दुसऱ्या गटाला सत्ता मिळू नये म्हणून प्रयत्न करत असतो. गटागटामध्ये शत्रुत्व इतके टोकाला जाते की ते एक वेळ परक्या व्यक्तीची सत्ता स्वीकारायला हे गट तयार होतात पण आपल्याच समाजातील दुसऱ्या गटाला सत्ता मिळू द्यायला ते तयार नसतात. असा विघटित समाज ‘फोडा झोडा आणि राज्य करा’ नीती वापरणाऱ्या परक्या लोकांकडून सहज गुलाम होतो. म्हणून गटातटात विभागले जाणे ही गुलामांची मानसिकता आहे असे म्हणतात. परक्या लोकांकडून गुलाम झाल्यावर नव्या राज्यकर्त्यांकडून कुठल्या एका गटाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे शोषण चालू होते. प्रथम राजकीय सत्ता जाते. मग आर्थिक शोषण सुरू होते. शेवटी धार्मिक शोषण चालू होते. गुलामगिरीत गेलेला संपूर्ण समाज रसातळाला जातो.
अविद्येमुळे अर्थात शिक्षणाचा अभाव असल्याने इतका मोठा अनर्थ निर्माण होतो.
युगसुत्रानुसार अविद्येचा अर्थ वेगळा आहे. स्वतःचे खरे अस्तित्व आत्मा असताना स्वीकारलेले अहंकार /आयडेंटिटी यात आत्मभाव शोधणे म्हणजे अविद्या. देहधर्म आणि चरितार्थ चालवण्यासाठी आपण काही रोल/ भूमिका स्वीकारतो. आपल्या एखाद्या रोलची आपल्या मनात निर्माण झालेली प्रतिमा म्हणजे अहंकार. अहंकारात आत्मभाव ठेवणे म्हणजे अमिताभ बच्चनने आयुष्यभर विजय दीनानाथ चौव्हान होऊन जगल्यासारखे आहे. असत् म्हणजे अहंकारांना सत् म्हणजे आत्म/स्वयं समजणे म्हणजे अविद्या. योगसुत्रानुसार विद्येचा अर्थ शिक्षणाहून वेगळा असला तरी परिणाम तोच होतो. समाज गटातटात विभागाला जाऊन शेवटी गुलामगिरीत जातो.
ज्योतीरावां इतकी सामाजिक समस्यांची खोलवर जाण आजवर खचितच कुणाला झालेली असेल.
पण सामाजिक समस्येची नुसती जाण असून उपयोग नसतो. सामाजिक समस्येचे कारण समजल्यावर त्यावर उपाय करणे आवश्यक असते. कृतीविना वाचाळता व्यर्थ ठरते. पण मग कृती का घडत नाही? कळतंय पण वळत नाही असे का घडते?
समाजाचे रहाटगाडगे एक ठराविक वेग धरून चालू असते. समाजाच्या प्रत्येक घटकाला समाजाकडून काहीतरी फायदे मिळत असतात. समाजव्यवस्थेत बदल करायचा म्हटले की आपले हक्क हिरावले जातील या भीतीने समाजातील लाभार्थी त्याला विरोध करतात. फिरणाऱ्या चाकाची गती बदलायच्या प्रयत्न करणाऱ्या पहिल्या व्यक्तीला चाकाकडून सर्वात जास्त विरोध होतो. त्याप्रमाणे सर्वप्रथम जो समाज सुधारणेचा प्रयत्न करतो त्याला समाजाचा सर्वात जास्त विरोध सहन करावा लागतो. समाजाच्या दुरोगामी हितासाठी तात्कालिक समाजाचा विरोध पत्करून सामाजिक समस्येवर प्रत्यक्ष कृतीतून उपाय करणे हे म्हणजे दिव्य करण्याप्रमाणे असते. 19 व्या शतकाच्या सुरवातीचा भारतीय समाज तर आजपेक्षा खूप जास्त अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारांचा होता. तरी समाज सुधारणेचे दिव्य करायला सुरुवात करणारे पहिले समाज सुधारक म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले (1827-1890).
गटागटात विभागलेली मराठेशाही संपून आणि इंग्रजांचे संपूर्ण भारतावर राज्य प्रस्थापित होऊन केवळ 9 वर्ष पूर्ण झालेले असताना जोतीराव फुलेंचा पुण्यात जन्म झाला. ज्या काळी शिक्षणाला निरोपयोगी समजले जाई त्या काळात त्यांनी मिशन शाळेत जाऊन इंग्रजी शिक्षण घेतले. मुलाला इंग्रजी शिक्षण देण्यात त्यांच्या आई वडिलांचा सुज्ञपणा दिसतो. या शिक्षणामुळे केवळ भारतात नव्हे तर जगात घडलेल्या घटनांची ओळख ज्योतिरावांना झाली. अमेरिकन क्रांतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या थॉमस पेणच्या विचारांचा त्यांच्या मनावर विशेष प्रभाव पडला. अमेरिकेला ब्रिटिश सत्ते विरुद्ध उठाव करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या त्याच्या Common Sense (1776) या लेखाचा, फ्रेंच क्रांतीचे समर्थन करणाऱ्या त्याच्या The Rights of Man (1791) या पुस्तकाचा आणि धर्मातील अंधश्रद्धांवर टीका करणाऱ्या त्याच्या The Age of Reason या पुस्तकांचा त्यांच्या मनावर गहिरा परिणाम झाला. राजेशाही, धर्माधिकार आणि विषम सामाजिक रचना यांच्या दुष्परिणामांच्या विषयी त्यांच्या मनात गाढ समज निर्माण झाली. माणसाच्या नैसर्गिक आणि सामाजिक हक्कांचे समर्थन करणारे विचार त्यांच्या मनात जागृत झाले. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिकता यांचे समर्थन करणारे विचार पक्के झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शिक्षणा मुळे त्यांना इतके अफाट ज्ञान मिळाले होते त्या शिक्षणाचे महत्व त्यांना पटले. आपल्या प्रमाणे सर्वांना हे ज्ञान मिळावे आणि आपला गुलाम देश परत वैभवशाली व्हावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पण त्यासाठी समाजात खुप बदल करणे आवश्यक आहेत याची जाणीव त्यांना झाली.
प्रथम स्वतः व्यवसाय करत त्यांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली. पुणे नगरपालिकेत बांधकाम, रस्ते, पाणीपुरवठा आदी कामांची कंत्राटे ते घेऊ लागले. सोबत पिढीजात आलेला फुलांचा व्यवसाय आणि शेती सुद्धा होती. आपली वित्तीय स्थिती चांगली नसेल तर समाजात आपल्या शब्दाला आणि कृतीला काडीची किंमत नसेल याची जाणीव त्यांना होती. म्हणून त्यांनी आपली वित्तीय स्थिती सुधारली. परंतु त्यांच्या उत्पन्नाचा बहुतांश भाग नंतर समाजसुधारणेच्या कामावर खर्च होई.
शिक्षण मनुष्यात किती बदल घडवू शकतो हे जोतिरावांना स्वतःच्या अनुभवावरून समजले होते. संपूर्ण स्त्री जमात म्हणजे अर्धा समाज त्या काळी शिक्षणापासून वंचित होता. स्त्रिया फक्त चूल आणि मूल करत होत्या. अर्थ आणि संरक्षण यासाठी स्त्रिया पुरुषावर अवलंबून असल्याने त्या समाजाचा कमजोर घटक बनल्या होत्या. ज्या समाजात पुरुष प्रबळ आणि स्त्रिया दुर्बल असतील त्या समाजात स्त्रियांचे शोषण झाले नाही तर नवल!
त्या काळी प्रथम इंग्रजांची राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी, मग जातिभेदाची सामाजिक गुलामगिरी आणि शेवटी प्रत्येक घरात स्त्री-पुरूष भेदातून निर्माण झालेली घरगुती गुलामगिरी सुरु होती. सर्वत्र अन्याय आणि शोषण सुरू होते. जोतिरावांनी सर्वप्रथम शिक्षणाचे आणि खास करून स्त्रीशिक्षणाचे महत्व ओळखले. पण त्या काळी मुलींना शिकवणार कोण? स्त्री शिक्षका अस्तित्वातच नव्हत्या. पुरुष शिक्षक असलेल्या शाळेत मुलींना पाठवेल इतका तात्कालिक समाज प्रगत विचाराचा नव्हता. मग त्यांनी स्वतःच्या बायकोला आधी घरी शिकवले. पहिली शिक्षिका निर्माण करून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. 1848 साली बुधवार पेठेत तात्यासाहेब गोवंडेंच्या भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. आपण ज्योतिबा फुलेंचे पोक्तपणातील फोटो पाहतो. पण ज्योतीरावांनी हे पहिले दिव्य वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी केले होते. अर्थात सावित्रीबाई तर त्याहून लहान होत्या. तात्यासाहेब गोवंडे तर स्वतः ब्राह्मण होते. तरी फुले दांपत्याच्या या समाजोपयोगी कामाचे महत्व समजून ते पुण्यातील कर्मट ब्राह्मणाच्या विरोधात गेले. सावित्रीबाई पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. पुरुषांना आपले हक्क हिरावले जातील अशी भीती वाटू लागली. अशी भीती केवळ सवर्ण नव्हे तर सर्व जातीतील पुरुषांना वाटत होती. त्यामुळे या पहिल्या मुलींच्या शाळेला तात्कालिक पुरुषप्रधान समाजातील प्रत्येक स्तरातून टोकाचा विरोध झाला. जाता-येता लोकांकडून शेण-अंडे खात अतिशय तरुण फुले दांपत्याने निर्धाराने त्यांचे काम चालू ठेवले.
त्या काळी दलितांवर होणारे अन्याय समाज उघडया डोळ्यांनी पाहत असे. हे अन्याय पाहून ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘हिच समाजाची रित आहे’ असे म्हणणारे तर समाजात होतेच, पण ‘यांची लायकीच ही आहे’ असे म्हणणारे निर्लज्ज पण तात्कालिक समाजात होते. त्यावर उपाय म्हणून जोतिरावांनी दलितांना शिक्षण देवून त्यांना सक्षम करण्याचे ठरवले. पण त्यात अस्पृश्यतेची मोठी अडचण होती. त्यावर तोडगा काढत त्यांनी 1852 साली बुधवार पेठेत फक्त दलित मुलांसाठी शाळा काढली. भारतात दलितांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली.
ज्योतीरावांनी समाजातील जातीभेदावर कितीही टीका केली असली तरी ते ब्राह्मण वा सवर्ण विरोधी नव्हते. उलट समाजातील अनेक सुज्ञ ब्राह्मण वा सवर्णांच्या मदतीने त्यांनी ही चळवळ उभी केली होती. त्यांच्या टीकेचा रोख नेहमी भेदाभेद पाळणाऱ्यांवर असे. लिंग, पंथ, जाती, प्रांत, भाषा, खानपान, रूढी परंपरा यांच्या अहंकारातून असे भेदाभेद निर्माण होतात. ‘मनुष्याने सर्व प्रकारचे अहंकार सोडले पाहिजेत’ असे योगसुत्र, सांख्ययोग, गीता, वेदांत या सारखे हिंदू ग्रंथ ओरडून ओरडून सांगतात. सगळ्या जीवांचे खरे अस्तित्व केवळ आत्मा असल्याने सर्व जीव एकच आहेत ही मानवतावादी शिकवण भारतीय विसरून गेले होते.
कुठलाही अहंकार बाळगणे हा आत्मघात असतो. अहंकारातून अपेक्षा निर्माण होतात. अपेक्षांमधून चित्तविक्षेप निर्माण करणारे राग-द्वेष आदी व्यवधान निर्माण होतात. त्यातून हिंसेसारखे अधर्म घडतात. हिंसेची प्रतिक्रिया हिंसा असल्याने भय-चिंता निर्माण होऊन अजून चित्तविक्षेप निर्माण होतो. चित्तविक्षेप एकाग्रतेचा नाश करून कर्मनाश करतात. कर्मनाशामुळे वैयक्तिक हानी होते. लोकांच्या अहंकारामुळे समाज गटातटात विभागाला जाऊन धूर्त स्वकीय किंवा परकीय लोकांच्या गुलामगिरीत जातो. अशा प्रकारे अहंकार बाळगणे हा वैयक्तिक आणि सामाजिक आत्मघात आहे.
ज्योतिरावांचा समाजातील भेदाभेद सोडण्याचा आग्रह हिंदू धर्मग्रंथांच्या शिकवणीच्या अनुरूपच होता. पण तात्कालिक समाजातील जातीच्या उतरंडीतील प्रत्येक मडके इतके स्वार्थलोलुप झालेले होते की बहुतेकांना हे विचार कधी समजले नाही. किंबहुना आपल्या खालील मडक्याच्या शोषणातून मिळणाऱ्या स्वार्थाच्या आड हे विचार येत असल्याने त्यांना ते समजूनच घ्यायचे नव्हते. सगळे शिकले तर आमच्या शेतात आणि घरात कोण राबेल? त्यासाठी समजातील बहुतेक लोकसंख्येला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. यात सवर्ण स्त्रियांचाही समावेश होता.
समाजातील काही स्वार्थी घटकांनी फुले दांपत्याला अनेक प्रकारे त्रास दिला. पण त्याच समाजातील काही सुज्ञ आणि निस्वार्थी लोकांनी त्यांना तितकीच मदत सुद्धा केली. तात्यासाहेब गोवंडे, कृष्णाशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, महादेव रानडे यांच्या सारखे ब्राह्मण, बहुजन समाजातील अनेक लोक आणि उस्मान-फातिमा शेख दाम्पत्या सारखे मुस्लिम लोक सुद्धा फुले दांपत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. काही चांगल्या इंग्रजांनी सुद्धा त्यांना मदत केली. अशा चांगल्या लोकांच्या मदतीने पुढे फुले दांपत्याने मुलींसाठी आणि दलित मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या.
त्या काळी लहानपणी लग्ने होत. तसेच स्त्री आणि पुरुषाच्या लग्नाच्या वयात अंतर पण फार असे. अगदी लहान मुलींचे म्हाताऱ्या वरासोबत लग्न होई. वैद्यकिय सुविधा अभावी मृत्युदर प्रचंड होता. बायको मेली तर बाप्या लगेच पुढील लग्न करून मोकळा व्हायचा. पण नवरा मेला तर विधवेला पुर्णविवाह करण्याची परवानगी नसे. तिच्या शारीरिक गरजांशी कुणाला काही देणे घेणे नसे. पण प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रकृतीने शारीरिक गरज हा निसर्गधर्म निर्माण केला आहे. जसे शरीर संवर्धन करणारे अन्न वा पाणी टाळल्यास व्याकुळता येते तसाच हा निसर्गधर्म टाळल्यास मनुष्य अगतिक आणि व्याकुळ होतो. त्यातून काही तरुण विधवांचे घरातील जवळच्या नातेवाईकांशी वा शेजारीपाजारील पुरुषांशी शरीरसंबंध येई. बऱ्याचदा घरातील जवळच्या लोकांकडून त्यांच्यावर जबरदस्ती सुद्धा केली जाई. असे जबरदस्तीचे प्रकार आजच्या समाजात सुद्धा सर्रास घडतात. त्या काळी गर्भनिरोधनाच्या कुठल्याही पद्धती उपलब्ध नसल्याने त्या बिचाऱ्या तरुण मुली गर्भवती होत. त्या काळी गर्भपाताची सुद्धा सोय नव्हती. काही दिवसांनी ती गर्भार असल्याचे समोर येई. मग जननिंदेच्या भितीने घरातील लोक तिलाच दोषी ठरवून तिच्यासोबत असलेले सर्व नाते संपवून टाकत. तिला घराबाहेर काढण्यात येई. अशा निराधार स्त्रीयांचे समाजात आणखी शोषण होई. तात्कालिक समाजात हे अतिशय विदारक चित्र अनेकदा पहायला मिळे. चांगल्या घरातील मुली रस्त्यावर येत आणि समाजातील कोल्हे-कुत्रे त्यांचे लचके तोडत. अशा बहुतेत स्त्रीया बाळ जन्मल्यावर त्याला टाकून देत. आई अभावी अशी मुले जगत नसत. सर्व जातीतील विधवा स्त्रियांचे असे हाल चालले होते. पण या समस्येवर कुणी बोलायला सुद्धा धजत नव्हते. जोतीरावांनी सर्वप्रथम याविरुद्ध आवाज उठवला. परिस्थितीने अगतिक झालेल्या अशा निराधार मुलींचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेल्या कोल्ह्या-कुत्र्यां पासून त्यांचे रक्षण करण्याचा निर्णय फुले दांपत्याने घेतला. अशा स्त्रियांना होणाऱ्या बाळांना आधार दयायचे ठरवले. त्यांच्यासाठी फुले दांपत्याने 1863 मध्ये एक होस्टेल सुरू केले. ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ असे त्याचे नाव ठेवले. आपले बाळ रस्त्यावर टिकणे बालहत्याच आहे असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे गर्भार स्त्रियांवर आपले बाळ रस्त्यावर न टाकण्याचे नैतिक दडपण निर्माण झाले. त्या या संस्थेत दाखल होऊ लागल्या. सावित्रीबाईंनी या निराधार मुलींचे रक्षण तर केलेच पण त्यांच्या डिलिव्हरी सुद्धा केल्या. बाळांना याच्या सानिध्यात ठेऊन या बाळांचे जीव वाचवले. यापैकी एका ब्राह्मण विधवा मुलीचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. त्याचे नाव त्यांनी यशवंत ठेवले. फुले दांपत्याच्या नावे हे एकमेव मूल आहे. हा यशवंत पुढे मोठा डॉक्टर झाला. जोतीराव आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे मुलगा डॉ यशवंत आणि सून राधाबाईने चालवला.
जसे फुले दांपत्याचे वय आणि कार्य वाढत चालले तसे ज्योतिराव-सावित्रीबाईंना आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी पुढील फळी तयार करणे गरजेचे झाले. कार्य मोठे झाले तसे अनेक लोक त्यांच्या या कार्याशी जोडले गेले. ज्योतिराव-सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारी तरुणांची फळी निर्माण झाली. 1873 साली फुलेंनी तरुणांच्या या फळीला सत्यशोधक समाज असे नाव दिले. या दुसऱ्या फळीत 316 सदस्य तयार झाले होते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विषमता दूर करणे, सर्वांना समान अधिकार मिळवून देणे आणि अंधश्रद्धा दूर करणे हे होते. दुसऱ्या फळीत 316 सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी जाऊन सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. दुसऱ्या फळीने ज्योतिरावांचे प्रबोधनाचे कार्य खेड्यापाड्यापर्यंत नेऊन पोहचवले.
स्त्री शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निवारण, दलितांसाठी पाणी पुरवठा, विधवा पुनर्विवाह, कुमारी गर्भवती आणि गर्भवती विधवांसाठी हॉस्टेल, अन्य जातीच्या मुलांना दत्तक घेणे, सत्यशोधक समाजाची स्थापना अशा क्रांतिकारी बदलांचा त्या काळात समाज विचारसुद्धा करू शकत नव्हता. मात्र अशा काळात समाजाचा सर्व प्रकारचा विरोध पत्करून जोतीराव आणि सावित्रीबाईंनी हे दिव्य केली.
एका मनुष्याच्या कार्याने त्याच्या आयुष्यात संपूर्ण समाजाला बदलण्याइतके किंवा समाजात दृष्य परिणाम समोर येण्या इतके मोठे बदल घडणे अवघड असते. ‘या जन्मात असा चांगला बदल घडणे शक्य नाही’ हा विचार मनात आल्यास बहुतेक जाणते लोक हातोत्साही होऊन निष्क्रीय होतात. बहुतेक लोक सुरुवात सुद्धा करत नाहीत. काही लोकांनी सुरुवात केली तरी इच्छित बदल लवकर न दिसल्याने त्यांचा उत्साह मावळतो. मग ते कार्य मध्येच बंद पडते. क्रांतिकारी बदल करण्याची सर्वप्रथम सुरुवात करणाऱ्यांवर समाजातील काही घटकांकडून सर्वात मोठा आघात होतो. तो सहन करण्याची ताकद भल्याभल्यांमध्ये नसते. सामाजिक अधःपतन झाल्याने नुकत्याच गुलामगिरीत पडलेल्या भारतात कुणीतरी कुठेतरी सुरुवात करून समाजसुधारकांच्या पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत होणे गरजेचे होते. आपल्या नावाला जगात ज्योतीरावांनी क्रांतीची ज्योती पेटवण्याचे हे महत्वाचे काम केले. त्यांनी ही ज्योत नुसती पेटवली नाही, तर आयुष्यभर समाजाचे आघात सहन करत तिला तेवत ठेवली. याच ज्योतीच्या उजेडात भारतातील समाजसुधारकांच्या पुढील पिढ्यांनी आपले मार्गक्रमण केले. हळूहळू समाज सुशिक्षित होऊ लागला. या *विद्ये* मुळे समाजात योग्य निर्णय क्षमता म्हणजे *मती* आली. गटातटात विभागलेल्या समाजाने संघटीत होऊन गुलामगिरी विरुद्ध आंदोलन करण्याची *नीती* स्विकारली. भारतात अहिंसक आणि क्रांतिकारी असे दोन्ही आंदोलन उभे राहिली. सुशिक्षित लोकांच्या पाठींब्याने या आंदोलनाला खरी *गती* मिळाली. त्यातून शेवटी 1947 साली भारत स्वतंत्र झाला. जनतेच्या शिक्षणामुळे अर्थव्यवस्थेला *गती* मिळून भारताकडे आता पुन्हा *वित्त* जमा होते आहे. त्यामुळे अनेक वर्षे गुलामगिरी आणि शोषण सहन करूनही केवळ 70-80 वर्षात आज भारत पुन्हा आर्थिक महासत्तेच्या आणि विश्वगुरु होण्याच्या दिशेने समर्थपणे वाटचाल करतो आहे.
राष्ट्राची कोसळली इमारत पुन्हा उभी करण्यासाठी पायाभरणी करणाऱ्या या क्रांतिसूर्याची काल जयंती होती!
यांचे किती आभार मानवेत?
यांच्यासमोर किती कृतज्ञ व्हावे?
यांचे कसे पांग फेडावेत?
© डॉ गोपाळकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈