श्रीमती अनुराधा फाटक
☆ विविधा ☆ खार! ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
‘लहान सुंदर गोजिरवाणी अशी दिसे ही खार, लुसलुशीत हे अंग तिचेच शेपूट गोंडेदार!’
अशा वर्णनाची बालगीतात कुतूहलाचे स्थान निर्माण करणारी खार आजची नसून रामायणकालापासून तिची सर्वांना ओळख आहे .
रावणाच्या तावडीतून सीतेला सोडविण्यासाठी लंकेत प्रवेश करता यावा म्हणून वानरसेनेच्या मदतीने श्रीरामानी सेतू बाधंण्याचे
काम सुरु केले त्यावेळी एक खार सतत समुद्रातील वाळूत लोळून सेतूबांधावर येऊन आपले शरीर झाडत असल्याचे प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आले. खारीचे हे काम पाहून त्यांनी कौतुकाने तिच्या पाठीवरून हात फिरविला. त्याची निशाणी अजूनही समस्त खार जमातीवर दिसते.खारीच्या शरीरावर असणारे पट्टे म्हणजे खारीच्या पाठीवर हात फिरविलेले श्रीरामांच्या बोटांचे ठसे समजले जातात. आपल्या कुवतीप्रमाणे दुसऱ्यांना मदत करणारी, स्ततःच्या इच्छेनुसार, कोणाचीही बळजबरी नसताना काम करणारी माणसे दुसऱ्यांच्या कामात खारीचा वाटा उचलताना दिसतात.
सतत वृक्षावर राहणारा, प्रत्येक वस्तू कुरतडून खाणारा सर्वसंचारी असा निरुपद्रवी प्राणी म्हणजे खार! काही मुले एखादी वस्तू दाताने कुरतडत। बसतात तेव्हा खारीसारखा कुरतडत बसू नको असे म्हणतात. स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी खारीला झुपकेदार शेपूट उपलब्ध झाली असावी. खारीसारखी चपळ वृत्तीची मुले पाहिली की,सर्वांना आनंद होतो. खारीचा वाटा उचलून सर्व मुलांनी काही चांगले उपक्रम केले तर राष्ट्र उभारणीच्या कार्याचे उद्याचे चित्र नक्कीच आशादायक असेल. आज अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या समाजात चेतना निर्माण करण्यासाठी खारीसारख्या कार्यक्षम प्रवृत्तीच्या माणसांची गरज आहे.
झरझर झाडावर, सरसर खाली पळणारी खार महत्वाचीच आहे.
© श्रीमती अनुराधा फाटक
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
लेख आवडला.बालपणीच्या आठवणी जाग्या केल्यात.