सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ खाद्यसंस्कृती ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
दिवाळी तशी आटोपून गेली तरी अजून फराळाचे डबे गच्च भरलेले आहेतच. आम्हां बायकांची एक गम्मतच असते एकीकडे वजन वाढतयं म्हणून काळजीत पडतो आणि एकीकडे खाद्यपदार्थांच्या डब्यांची शीग उतरु मुळी देत नाही. खरचं आपली खाद्यसंस्कृती आहे मोठी विलक्षण.
ह्या खाद्ययात्रेत दोन गट पडतात . एक गट तब्येतीनं खाणा-यांचा आणि एक गट भरभरून खाऊ घालणा-यांचा. आग्रहाने खाऊ घालणा-या तमाम लोकांना सलाम आणि त्यांच्या पदार्थांना न्याय देणा-या, अन्नदात्यांना “सुखी भव”असा आशिर्वाद देणा-यांनांपण सलाम.
एक नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस,पहिली तारीख. ही एक तारीख पुर्वी नोकरदारांसाठी फार महत्त्वाची असायची. आजचा हा दिवस “जागतिक शाकाहार दिन” म्हणून ओळखल्या जातो.
कुठल्याही व्यक्तीची आहाराविषयी आवडनिवड ही त्याच्या रहिवासाच्या भोवताली असणारी भौगोलिक परिस्थिती, हवामान तसेच आजुबाजुचे वातावरण, लहानपणापासूनच्या सवयी,मनावर असलेला पगडा ह्यावर अवलंबून असते. खरं सांगायचं तर ज्या गावातून, घरातून, संस्कृतीतून,संस्कारांमधून आम्ही मोठे झालो, घडलो त्यात लहानपणी तर शाकाहाराशिवाय दुसरा कुठला आहार असतो हे आमच्या गावीही नव्हंतं.किंबहुना शाकाहाराशिवाय दुसरा कुठला सामिष आहार असतो ही गोष्ट लहानपणीच्या आकलनशक्ती पलीकडील बाब होती.
पुढे हळूहळू वयाची शाळकरी फेज पार करतांना विज्ञानाचा अभ्यास करतांना “जीवनसाखळी”ची संकल्पना वाचनात आली, आणि मग सामिष आहार हा आपण घेत नसलो तरी तो आहार निषीद्ध नसून उलटपक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक सुद्धा असतो ही नवी बाब कळली. जीवनसाखळी सुरळीत सुरू राहण्यासाठी मी जरी शाकाहारी असले तरी सामिष आहार घेणारे पण भरपूर लोक असतात हे मैत्रिणींच्या बरोबर गप्पांच्या ओघातून कळले.
आपली शाकाहारी खाद्यसंस्कृती होते पण एक अफाट खाद्यसंस्कृती आहे हे नक्की. खरतरं फक्त शाकाहारी आणि दोन्ही प्रकारचा आहार घेणाऱ्यांमध्ये कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नसतो मुळी.कारण मानवाला नुसते उदरभरण म्हणून अन्न सेवन करायचं नसतं तरं त्याचबरोबर “जिव्हा”याने की “रसना”तिलापण प्रसन्न, तृप्त ठेवायचं असतं.आणि प्रत्येक व्यक्तीचे जीभेचे चोचले हे वेगवेगळे असूच शकतात. फक्त खाणं असो वा बोलणं, आपली जिव्हा ही आपल्याच ताब्यात हवी हे मात्र नक्की.
मी स्वतः संपूर्णपणे शाकाहारी असले तरी वेगवेगळे सामिष, पौष्टिक पदार्थ खाणा-या दर्दी मंडळींचं मला प्रचंड कौतुक वाटतं.खरी दर्दी मत्स्यप्रेमी,मांसाहारी मंडळी डोळेमिटून कुठल्या प्राणीजातीचा आहार आपण घेतोय हे छातीठोक सांगू शकतात त्यांच्या खव्वैयेगिरीला आणि अभ्यासाला सलाम.
शाकाहारी मंडळींमध्ये एकच प्रकार असतो परंतु मासांहारी मंडळींमध्ये वेगवेगळे प्रकार असतात,एक बेधडक सामिष आहार घेतो हे सांगणारे आणि दुसरे लपूनछपून खाणारे. असो
पु.ल.देशपांडे ह्यांची खाद्यसंस्कृती वाचली की शाकाहाराचा आवाका किती मोठा,प्रचंड आहे ह्याची कल्पना येते.मी तर पु.ल.चं खाद्यसंस्कृती वाचल्यानंतर प्रत्येक वाचनानंतर मला काहीतरी दरवेळी वाचन हाती लागतं.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈