श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
?विविधा?
☆ खरी श्रीमंती…भाग 1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
खरी श्रीमंती म्हणजे मनाचे समाधान
श्रीमंतीचं दुसरं नाव म्हणजे समाधान होय.माझ्या मते ‘श्रीमंती’ ही फक्त बाह्यांगावरच अवलंबून नसून ती मनाच्या अंतरंगावर व मोठेपणावर जास्त अवलंबून आहे. घर,फर्निचर, भरपूर पैसा, इस्टेट, दागदागिने म्हणजे श्रीमंती का? आई-वडील, जेष्ठ मंडळींची हेडसाळ, भावंडामधे एकाच तोंड पुर्वेला तर दुसऱ्याचं पश्चिमेला अशी विरुद्ध परिस्थिती चालेल का? संस्कारहिन तरुण मंडळी चालतील का? घरात देवाची पूजा नाही,एकही सुंदर पुस्तक नाही. मग ते श्रीमंत कसे?या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सुज्ञ माणूस नकारार्थीच देईल हे निश्चित. याचा अर्थ श्रीमंती ही पैशांशी निगडीत नसून ती व्यक्तीच्या मनाशी निगडीत आहे. माणूस पैशांपेक्षा मनाने/विचाराने श्रीमंत हवा त्याचे जगणे सुसंस्कारित हवे. संस्कृतीचा सन्मान करणारे हवे. घाम व श्रम यांची पुजा करणारा माणूस खरा श्रीमंत असे माझे मत आहे.
षडरिपुंना थारा नसणाऱ्या मोठ्या मनाच्या माणसाचे आचरण शुद्ध असते. तेथे व्यसनांना थारा नसतो. माणसाच्या घरात व मनात पवित्र देवघर हवे. त्याचबरोबर सुसंस्कारासाठी ग्रंथ व त्या ग्रंथाचे सार जाणणारा माणूसही घरात हवा. नुकताच अर्थ प्राप्त असून उपयोग नाही तर तसे आचरणही हवे. श्रीमंतीचं दर्शन पवित्र वाटणे ती पाहून मनाला प्रसंनता वाटणे आवश्यक आहे. जिथे माणसामाणसातले संवाद हरवत चालले आहेत तेथे पैशांची श्रीमंती काय कामाची? आजच्या काळात समर्थपणे उत्तर द्यायला मनाच्या श्रीमंतीशिवाय दुसरा पर्याय नाही हेच खरे.
घरात रोज ताजी फुले/फळं असणं म्हणजे श्रीमंती. आज अवचित पाहुणा घरी आल्यावर त्याला मी पोटभर जेवू घालू शकलो आणि तो समाधानाने जेवला तर मी श्रीमंत होय. एखादी वस्तू, गोष्ट माझ्याकडे हवी त्यावेळी नक्की मिळणार हा विश्वास म्हणजे श्रीमंती. मदतीसाठी तेवढ्या विश्वसाने मित्राचा/नातेवाईकांचा फोन येणं याचाच अर्थ ती माझी श्रीमंती. कोण अडचणीत असेल तर त्याला आपली आठवण आली तर मी श्रीमंत.
भर उन्हात घराच्या अंगणात फुललेला गुलमोहोर/गार सावलीचा डेरेदार व्रुक्ष दिसावा ही नजरेची श्रीमंती. एखाद्याच्या चांगल्या गुणांचे मनापासून कौतुक करणं, त्याला त्याची कला वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे ही उदार मनाची श्रीमंती. थंडीत अंगणभर बुचाची फुले पडावीत तर कधी प्राजक्ताच्या सड्याने अंगण व वातावरण भरून जावं ही खरी श्रीमंती.
होय मला अशीच श्रीमंती हवी.एखादी गोष्ट केल्यानंतर आठवण ठेवून एखाद्या विशिष्ठ व्यक्तिसाठी राखून ठेवणे व आठवणीने देणे ही वेगळीच श्रीमंती होय.एखादे सुंदर द्रुश्य किंवा भगवंताचे रुप पाहील्यावर त्याचे कवितेत, सुंदर शब्दात वर्णन करता येणे ही बुद्धिची श्रीमंती. यशाचा आनंद सर्वांनी एकत्र मिळून लुटणे हीसुद्धा श्रीमंतीचं. दुसऱ्याच्या आनंदात आपले दुःख बाजूला ठेवून विसरून त्यांचा आनंद द्विगुणित करणे ही श्रीमंती. दुःखी माणसाचे दुःख कमी करणे, श्रीमंताने गरीबांची गरीबी कमी करणे ही श्रीमंती. चांगल्या गोष्टींची योग्य पारख ही श्रीमंती.
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈