श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – एम.ए. एम.एड. व्यवसाय – अध्यापन , क.ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यकेशन, ३० वर्षे अध्यापन, सद्य: निवृत्त

प्रकाशित पुस्तके –  एकूण – ६५  बालवाङ्मय – एकूण २९ पुस्तके – कविता संग्रह – २, नाटिका -४, चरित्र – १,बाल कादंबरी – १ भौगोलिक – 1, बालकथा – १२ प्रौढ वाङ्मय –  मौलिक एकूण ८ पुस्तके कथासंग्रह –४, कविता संग्रह – २   संकीर्ण –  २ अनुवादित – अनुवाद हिंदी भाषेतून – एकूण २७ पुस्तके लघुतम कथासंग्रह – एकूण – ६ , लघुकथा  (हिंदीतील कहानी)  संग्रह – अनुवादित – १३  कादंबर्‍या – ६, व्यंग रचना -२ , तत्वज्ञान -अध्यात्म – ५  पुरस्कार –     बालकविता, बालकथा, बालनाटिका आणि एकंदर बालसाहित्याचे लेखन यांना पुरस्कार  अनुवादासाठी – स्पॉटलाईट, त्रिधारा या पुस्तकांना, एकंदर लेखनासाठी पंजाब साहित्य कला अकादमीचा विशिष्ट पुरस्कार  अन्य – सांगली जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार  अनुवाद  (हिंदी मध्ये)- काही लघुतम कथा व कही कथा यांचा हिंदी मध्ये अनुवाद व समकालिन भारतीय साहित्य, भाषा पत्रिका, मधुमती, हिमप्रस्थ इ. मासिके व कथा आणि लघुतम कथा संकलाच्या पुस्तकात प्रकाशित गणवेश कथा हिंदी, तेलुगु, कन्नड तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित

सन्मान- कोटा – शब्दसरोज, जबलपूर – डॉ. श्रीराम दादा ठाकुर संस्कारधानी

आकाशवाणी प्रसारण – 1. प्रतिबिंब- कौतुंबिक श्रुतिका – १००च्या वर श्रुतिकांचे लेखन, २. नभोनाट्य – ५ नभोनाट्यांचे लेखन

शोध प्रकल्प – २ – १. किशोर मासिकातील प्रकाशित साहित्य, २. सांगली संस्थातील स्त्री शिक्षणाचा विकास – १८७५ ते १९५०

 

☆ विविधा : गणरायांचं आगमन – श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर 

पार्वती मातेची परवानगी घेऊन, गणेशोत्सवासाठी गणराय महाराष्ट्रात आले आणि  घरोघरी नि विविध मंडळात अंश रुपाने स्थानापन्न झाले. या वर्षी त्यांना थोडं  बरं वाटत होतं. गर्दी फारशी नसल्याने मोकळा श्वास घेता येत होता. एरवी मिरवणुकीने येताना तो लोकांचा गोंधळ, आवाजाचा कल्लोळ यामुळे ते पार शिणून जायचे. स्वस्थपणे स्थानापन्न झाल्यावर त्यांना पार्वती मातेशी झालेला संवाद आठवला आणि त्यांच्या ओठांवर हसू फुटलं.

पार्वती माता म्हणाली होती, ‘यंदा जगभर सगळीकडे कोरोना… कोरोना…  ऐकू येतय. महाराष्ट्रात तर कोरोनाचा कहर आहे म्हणे… सांभाळून रहारे बाळा॰..’

आई माणसाची असो,  की देवाची, तिची काळजी आणि काळीज सारखच.

‘आई, लोक मला ‘सुखकर्ता… विघ्नहर्ता’ मानतात. कोरोनाचा कहर कमी कर, असं ते मला साकडं घालणार आणि कोरोना… कोरोना… म्हणत तूच मला घाबरवून टाकतीयस….’

‘तसं नाही रे… पण …’

‘कळलं … कळलं … आईचं काळीज…!’

‘मी पण तुझ्या पाठोपाठ २५ तारखेला येतेच आहे. लोकं मला माहेरवाशीण मानतात. तिच्यासारखं माझं कौतुक करतात पण मी जाणार घराघरातून. तुझा  वावर घरी.. दारी. यत्र… तत्र.. सर्वत्र.’

माता पार्वती आणि गणरायांचा संवाद चालू असताना, बाप्पांचा सारथी अर्थात उंदीर मामा यांचीही लगबग सुरू झाली.  बाप्पाला ब्रह्मदेवाकडे जाऊन E- पास घेण्याची त्यांनी आठवण केली. एका गोष्टीने मात्र उंदीर मामा खुश होते की यंदा लॉकडाऊनमुळे, मुळातच रस्त्यावर वाहतूक कमी झाल्याने रस्त्यावर खड्डे जरा कमी असतील.  त्यामुळे बाप्पांची स्वारी घेऊन जायला त्रास होणार नाही. यंदा मिरवणूक नसल्याने लांबत जाणारी पूजा नाही, त्यामुळे प्रसादाचे मोदक अगदी दुपारीच म्हणजे अगदी वेळेवर मिळणार. मामा आत्तापासूनच मनाचे मोदक खाऊ लागले.

यंदा ध्वनीप्रदुषण फारसे नसल्याने कानात घायलाला बोळे नकोत.  हा,  फक्त सॅनीटायझरची बाटली  आठवणीनं बरोबर घ्यायला पाहिजे, असं ठरवून उंदीर मामा पुढच्या तयारीला लागले आणि त्यांना एकदम मास्कची आठवण झाली. आपल्याला चिंधीही पुरे पण बाप्पांच्या मास्कचं काय करायचं? कोण शिवून देईल त्यांना मास्क, याची त्यांना विवंचना पडली.

गणरायांना एकीकडे  थोडं स्वस्थ, निवांत, वाटत होतं. यंदाचा उत्सव आपल्याला खरोखरच आरामदायी होईल, अशी त्यांना खात्री वाटू लागली होती पण दुसरीकडे आपल्या भक्तांविषयी कणवही त्यांच्या मनात… हृदयात दाटून आली होती. त्यांचा आनंद, उत्साह, जोश याच्यावर विरजण पडलं होतं. आता जाता जाता पहिलं काम म्हणजे धन्वंतरींना कोरोंनावर लस तयार करायला सांगणे.

आणखी काय अपेक्षा असेल बरं भक्ताची?  हां! येता येता लोक म्हणत होते, ‘कोरोंनात आता आणखी महापुराचं संकट तेवढं नको.’  मंडप आता रिकामा होता. गणरायांनी विचार केला आणि इंद्रदेवांना त्यांनी दूरध्वनी म्हणजे आकाशध्वनी लावला आणि त्यांच्याशी ते ऑन लाईन बोलू लागले. म्हणाले,  ‘इंद्रदेवा सांभाळून बरं! गोवर्धन पर्वतावर तू  कृष्णकाळात पाऊस पाडला होतास, तसा पाऊस गेल्या वर्षी पाडलास. केवढी तरी मालमत्तेची हानी झाली. माणसं, गुरं – ढोरं दगावली. यंदा देवा, पाऊस पाडा, नद्या-तळी- धरणं भरू देत. पण महापूर घेऊन येऊ नका. आताच्या काळात पुराचं पाणी अडवणारा कुणी शिष्योत्तम अरुणीही उरला नाही.’

मंडपात चार-सहा जण आरतीचं तबक घेऊन येताना त्यांना दिसले. मग त्यांनी आपला आकाशध्वनी बंद केला आणि ते सुहास्य मुद्रेने वरदहस्ताची नेहमीची पोझ घेऊन बसून राहिले.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments