☆ विविधा ☆ ?️गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप?️ ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याला शतक सरूनही अनेक वर्षे लोटली. त्या काळात ती एक गरज होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जनमत तयार करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी स्वदेशी लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे हेही गरजेचे होते. गणपती आणि शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची दोन दैवते! आणि त्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात हे लोकमान्यांनी ताडले होते. म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याचा फार चांगला परिणाम दिसून आला. लोक एकत्र येऊ लागले. लोकमान्यांचा हेतू साध्य झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा हे दोन्ही उत्सव सातत्याने सुरूच राहिले.इंग्रजांना या धार्मिक भावनेत ढवळाढवळ करणे अशक्य झाले. परिणामी गणेशोत्सव महाराष्ट्रात तरी मोठ्या प्रमाणात सुरूच राहिला.
हे लोण नंतर सर्व देशभर पसरले. महाराष्ट्रातील गावोगावी गणेशोत्सव मंडळे स्थापन करण्यात आली. पुण्यात, मुंबईत तर शतक लोटलेली अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी चढत्या क्रमाने गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो.
स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत हे सगळे ठीक होते. नियमितपणे गणेशोत्सव शांततेत पार पडायचा. पण गेली साठ सत्तर वर्षे त्यात चढाओढ सुरू झाली. विजेची झगमगाट असणारी रोषणाई, हिडीस गाणी, मोठ्ठे लाऊड स्पीकर या गोष्टीचा अतिरेक झाला. त्यासाठी लागणारी वर्गणी ( काही वेळा जबरदस्तीने) गोळा केली जाऊ लागली. गणपती म्हटलं की लोक वर्गणी देतच होते.
नंतरच्या काळात तर या शांततेची जागा गडबड, गोंधळ, हुल्लडबाजीने कधी घेतली ते कळलेच नाही. लोकमान्यांचा मूळ उद्देश कधीच सफल झाला होता. आता गणेशोत्सवाच्या नावाखाली अहमहमिका, स्पर्धा, नाचगाणी सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात तर सिनेमातली गाणी स्पीकरवर लावून त्यावर हिडीस अंगविक्षेप करत नाचणे ही फॅशन झाली. हे प्रकार फार वाढले.
एकेका गावात अनेक गणेशोत्सव मंडळे आपापल्या मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करतात. पुण्यात मुंबईत तर गल्लोगल्लीत गणपतीचे मंडप उभारले जातात. वाहतुकीचा बोजवारा उडतो.आणि विसर्जन मिरवणुकीचे तर विचारायलाच नको. रात्र रात्र मिरवणूका निघतात. त्यात धार्मिक भावना कमी आणि दिखाव्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. हे कितपत योग्य आहे? हे दहा दिवस कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर प्रचंड ताण पडतो.हेही लक्षात घ्यायला हवे.
हे सगळे बदलायला पाहिजे हे आता हळूहळू लक्षात येत आहे. सगळीच मंडळे हुल्लडबाजी करणारी नव्हती. तेच आदर्श आहे. हे आता काही प्रमाणात ध्यानात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे .हे चांगले लक्षण आहे. बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवाचे पावित्र्य जपले जाते. हुल्लडबाजी फारशी होत नाही. कित्येक कार्यकर्ते म्हणविणारे लोक मंडपात, विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन यायचे. लोकांना आणि लोकमान्यांना हे स्वरूप तर नक्कीच अपेक्षित नव्हते. ते स्पृहणीय ही नाही.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आता धर्मभेद, भेदभाव काही राहिला नाही. सर्व जातिधर्माचे लोक बिनधास्त गणेशोत्सवात सहभागी होतात. ही खूप चांगली सुधारणा आहे. अजूनही काही ठिकाणी गोंधळ घातला जातोच. ते चूक आहे. स्पर्धा सुद्धा निकोप असावी. मुख्य म्हणजे गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे. खरोखरच लोकांनी त्यानिमित्ताने एकत्र यावे. विचारांची देवाणघेवाण करावी.
आता नवीन संकल्पनेनुसार एक गाव एक गणपती या कल्पनेचाही विचार पुढे येतो आहे. यात पर्यावरणाचा समतोल राखणेही महत्वाचे ठरते.गणेशोत्सवाचा मूळ उद्देश मर्यादित न राहता लोकमान्यांनी संकल्प केल्याप्रमाणे अधिक व्यापक असावा. त्यातून अखंड निकोप, निर्वैर, सुसंघटित समाजाचे प्रतिबिंब उमटावे. नवीन पिढीने काही चांगले संस्कार जतन करून चांगले संकल्प सोडावेत. त्यांचा राष्ट् उभारणीच्या कामात या गणेशोत्सवाच्या स्वरूपाचा चांगला उपयोग करून घ्यावा. हीच सदिच्छा.
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈