विविधा
☆गीतांजली… ☆ सौ. मुग्धा रवींद्र कानिटकर ☆
(रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त लेख)
रवींद्रनाथ टागोर हे जगप्रसिद्ध भारतीय कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार, संगीतकार, कलावंत, तत्त्वचिंतक, शिक्षणतज्ज्ञ,नाटककार, चित्रकार, नट, निबंध लेखक आणि समीक्षक होते. त्यांच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या कथा हे बंगाली साहित्याचेच नव्हे, तर भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे. रवींद्रनाथ टागोर अनुभूती शब्दात पेरतात. बालपणी ते लिहितात..
..जाॅल पाॅडे पाता नाॅडे… (म्हणजे-पाणी पडे-पान झुले)…
‘अभिलाष’ ही कविता ,१२व्या वर्षी त्यांनी लिहिली आणि प्रसिद्ध झाली. या कवीचे प्राण्यांवर अतिशय प्रेम होते. मूकजनावरांमधील स्वाभिमान आणि शांतीने त्यांना प्रेरणा मिळाली . बर्फाच्या कणांबरोबर सुद्धा त्यांचे तादात्म्य पावून “छोटयाशा गोष्टी सुद्धा जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात” अशा आशयाची एक सुंदर कविता त्यांच्या कडून लिहिली गेली.
निसर्गतःच त्यांना रूपसौंदर्य लाभलं.तसेच त्यांना मधुर आवाजाची देणगी होती.त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालीची विविधता आढळून येते.रवींद्रनाथ टागोर हे नाव ‘ रवींद्र संगीत’ म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची मातृभाषेत बांग्ला भाषेत रचित, अखिल विश्वाकडून प्रशंसित झालेली,सर्वाधिक वाचली गेलेली, गेयात्मक,पद्यात्मक, साहित्यकृती म्हणजे नोबेल पुरस्काराने सन्मानित अशी ‘गीतांजली’ . गीतांजली स्वतंत्र कलाकृती आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह आशावादी आहे.रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेची साक्ष देणारी सर्जनशील निर्मिती म्हणजे गीतांजली हे काव्य.यात त्यांचं भाषाप्रभुत्व , परमेश्वर प्राप्तीची ओढ,उत्कट इच्छा काव्य रसिकांच्या अंतःकरणाला हात घालते.१९१३ साली महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली ‘ ह्या काव्यसंग्रहाला आशियातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. या संग्रहामध्ये गीतांजली,गीतिमाल्य, नैवेद्य,शिशू, चैताली,स्मरण, कल्पना,उत्सर्ग,अचलायतन या काव्यसंग्रहातून घेतलेल्या निवडक कवितांचा समावेश आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या साधारण १०४ सर्वोत्कृष्ठ कलाकृतींचे संकलन गीतांजली रूपाने काव्यरसिकांना अनमोल भेट मिळाली आहे.
आपल्या देशबांधवांमधील अज्ञान,निरक्षरता, फूट,आळस आणि संकुचित वृत्ती पाहून टागोर अस्वस्थ होत. हा कवी विचारवंत तसेच दार्शनिक असल्याने आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्याच्या स्वर्गात नेण्यासाठीच वैविध्यपूर्ण अशा असंख्य साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत असे वाटते. डिसेंबर १८८६ मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ‘आमरा मिले छि आज मात्र डाके’ ह्या कवितेचे लेखन आणि गायन ही केलं होतं.
१८९०साली ”विसर्जन’ या नाटकाचे लेखन आणि प्रयोग केले.१८९६ ला कलकत्ता येथे काॅंग्रेस अधिवेशनात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदेमातरम्’ या देशभक्तीपर गीताला चाल लावली आणि त्यांनी स्वतः ते गायले.१९११च्या राष्ट्रीय सभेच्या वेळी ‘जन गण मन’ हे गीत लिहून संगीतबद्ध केले. स्वतः ते त्यांनी गायले . पुढं हे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.
१९०१ मध्ये त्यांनी’ शांतिनिकेतन, आश्रम शाळा’ स्थापन केली. या अभिनव प्रयोगाने जीवनशिक्षण कार्य सफल करून दाखवले.
तसेच १९१८ला ‘ यत्र विश्वं भवत्येक नीडम्’ या भावनेने त्यांनी ‘ विश्वभारती’ संस्थेची पायाभरणी केली.
ब्रिटिश सरकारने दिलेला ‘ सर’ हा किताब प्रखर देशभक्त अशा टागोरांनी १९१९ ला परत दिला.
आशा-निराशेवर हिंदकळणारं टागोरांचे मन कवितांमधून प्रकट होते.काही कविता वाचकांना गूढ वाटतात.
काव्यामध्ये रस व गती असणाऱ्या प्रत्येकाला गीतांजली रूपी काव्यचंद्राचे कधी ना कधी दर्शन घ्यावे असे वाटतेच.
‘ चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर ‘ …
(या सदा मुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे..)
ही त्यांची सुप्रसिद्ध प्रार्थना सारे जीवन समजावून घेण्याचा ध्येयवाद प्रकट करते.
या काव्यसंग्रहातून एक हळुवार कवी,नितळ मनाचा माणूस उलगडत जातो.टागोरांची वैविध्यपूर्ण शैली, विविध विषय, असंख्य प्रसंग आणि मनोभाव यांचा यथार्थ परिचय या दिव्य , अलौकिक कलाविष्काराच्या माध्यमातून वाचकांना होतो.यातील काव्यरचनांचे भाषांतर अनेक अभ्यासकांनी त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत केले आहे .
‘जाबार दिने एई कथाटि बोले जेनो जाई।’ या कवितेतील आरंभिक पंक्तिंचे हिंदी रूपांतर – ‘जाने के दिन यह बात मैं कहकर जाऊं। यहां जो कुछ देखा-पाया, उसकी तुलना नहीं। ज्योति के इस सिंधु में जो शतदल कमल शोभित है, उसी का मधु पीता रहा, इसीलिए मैं धन्य हूं।’ असं वाचताना प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचारांना चालना मिळते.
समर्पक शब्दांत जीवनविषयक मांडलेले तत्वज्ञान,प्रतिमांचा समर्पक वापर,सहज सुलभ भावाविष्कार अशा वैशिष्ट्यांसह टागोरांची कविता व्यक्त होते.
गीतांजली हा १५६ ते१५७ मूळ बंगाली कवितांचा संग्रह , त्यांनी इंग्रजी मध्ये Songs of Offspring असं केलेलं भाषांतर काव्य रसिकांना खुप भावले.पहिल्या महायुद्धाच्या काठावर उभ्या असलेल्या पाश्चात्य कवींना ऐन अशान्त युगात शीतरस देणारा हा कवी काही अपू्र्वच वाटला.गीतांजली कविता वाचकाला वेगळ्याच भावविश्वाची सफर घडवून आणते.टागोरांची कविता वाचल्यावर एक प्रकारची शांती दरवळत राहते.
‘गीतांजली’ तील कविता या ईश्वराबद्दलच्या कविता नाहीत तर ‘ईश्वरपणा’ बद्दलच्या आहेत.एझ्रा पाउंड ला गीतांजली मधील अपूर्व अशी मनस्थिती आवडली.त्यामुळेच तो म्हणतो,” There is in Tagore the stillness of nature.” सर्व जगात आधुनिक तरीही ऋषितुल्य कवी म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.
गीतांजलि’ च्या कवितांचं क्षेत्र खुप विस्तृत आहे. त्यांत प्रेम, शांति आहे. दलितांच्या विषयी ‘अपमानित’ शीर्षक असलेली कविता सुद्धा आहे. ‘अपमानित’ में रवींद्रनाथांनी जातिगत भेदभावाचा तीव्र प्रतिकार केला आहे – ‘हे मोर दुर्भागा देश, जादेर करेछ अपमान, अपमानेर होते होबे ताहादेर सबार समान।’ ‘ ‘अपमानित’ सारख्या कविता लिहून रवींद्रनाथ दलितांच्या प्रति उच्च जातिंना संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ‘भारत तीर्थ’ या कवितेत रवींद्रनाथ सांगत आहेत कि भारताचा समस्त मानव समाज एक कुटुम्ब, एक शरीरा सारखं आहे. -‘आर्य, अनार्य, द्रविड़, चीनी, शक, हूण, पठान, मुगल सर्व इथं एका देहात लीन झाले आहेत.हा देहच भारतबोध आहे.’
१९४० ला रवींद्रनाथ टागोरांना ‘डाॅक्टरेट’ पदवी प्रदान करून आॅक्सफर्ड विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात आले.
“तू सतत माझ्याबरोबर असतोस. मला नवजीवन देतोस. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या समवेत असतोस. मला आशा देतोस. माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणासाठी मी तुझा आभारी आहे.” …असं म्हणत .
१९४१ ला ‘ जन्मदिने ‘ हा त्यांचा शेवटचा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला.
७आॅगस्ट१९४२ या दिवशी आपल्या जीवन देवतेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य कृती आणि उक्ती यातील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्या उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रम्हांडी पाहणाऱ्या साहित्य, संगीत, कला आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्या या विश्वकवीची प्राणज्योत मावळली.
जीवनमूल्यांचा ऱ्हास, असुरक्षितता आणि स्पर्धा यांच्या अंधारात भरकटलेल्या समाजासाठी ‘गीतांजली’ तील प्रेम, सत्यम्, शिवम्, सुंदरम् वरील श्रद्धा व मानवी जीवनाला अर्थ असतो, हा विश्वासच मला दीपस्तंभ वाटतो.
© सौ. मुग्धा रवींद्र कानिटकर
सांगली
फोन 9403726078
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈