श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ त्याग… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
मावळताना दिवस मन उगाच कातर होतं. का ? कसं ? कशासाठी ? आजवर कधीच कळलं नाही . जगण्याच्या चाकोरींची गतिमानता थांबवणे अवघड काम .
ते -हाटगाडग्यासारखं,सतत फिरत रहातं पोटासाठी , प्रतिष्ठेसाठी ,नात्यागोत्याच्या गुंत्यासाठी आणि भूतकाळात उपभोगलेल्या लाघवी स्वप्नांच्या स्मरणासाठी. सारंच कसं खूप धुसर झालेलं असतं काळाच्या पडद्याआड. वर्तमानात त्याची दखलही घेता येत नाही. टाळताही येत नाही त्याला . आठवण पाठपुरावा करणंही काही केल्या सोडत नाही. करायचं तरी काय ? हा यक्षप्रश्न भेडसावतो सारखा . मग लागीर झालेलं झाड घुमत रहाव तसंआपणही धुमसत रहातो आतल्याआत, हिम्मत हरवलेल्या मांत्रिका सारखं . इथंच डोकावतो मनोनिग्रह . स्थितप्रज्ञ होण्यासाठी सावरायला . ओळख त्याला. जवळ कर . सगळं काही काळजात बंदिस्त करून तूच चौकीदार हो मनाचा. ठणकावून सांग त्याला, बलदंड पुंडासारखा वागलास तर याद राख. आता देहाचा वारु थकलाय , त्याला गरज आहे विश्रांतीची . ती दिली नाहीस तर मीच परागंदा होईन इथून . मग मला नको विचारूस. ज्याला आत्मा म्हणतात तो तूच काय ? म्हणून म्हणतोय तुला शांत हो. निरभ्रांत हो. लगाम घाल मनाला. वाच चार ओळी अध्यात्माच्या, संत महंतांच्या , भारतीयांच्या थोर परंपरेच्या आणि वानप्रस्थ हो योग्या सारखा .
त्याग करून तुझाच तू. अरे, मी हे सगळं सगळ्यांसाठी सांगतोय. तू कोण टिकोजीराव लागून गेलास माझ्यापुढे ?
त्याग हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे आत्मशांतीचा. म्हण ॐ शांती शांती.
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈