सुश्री ज्योत्स्ना डासाळकर
विविधा
☆ गणोबा… ☆ सुश्री ज्योत्स्ना डासाळकर ☆
श्रावण अमावास्या झाली की कोल्हापूरच्या गल्ल्यातून आवाज घुमू लागतो भावल्या घ्या गनुबं…. हा आवाज ऐकला की घरच्या आयाबाया लगबगीने बाहेर येतात आणि आवाज देणाऱ्या कुंभार मावशीला थांबवून त्यांच्या डोक्यावरची जड बुट्टी उतरून खाली घेतात. वर झाकलेला मेणकापड, त्याखालचं सुती कापड बाजूला सरकवली की डोळे दिपून जातील अशा बाहुल्या म्हणजे हरतालिकांचे रंगीत जोड दिसतात. त्याच्याबरोबरच असते ती निव्वळ काळ्या मातीची अनाकर्षक अशी पाच ते सहा इंचाची एक आकृती. लांबून बघितलं तर एखादा पंचकोन वाटावा अशी, पण उचलून घेतल्यावर लक्षात येते की, तळपायाला तळपाय जुळवून घातलेली इवलीशी मांडी जमिनीला समांतर पसरलेले इवले हात, त्यातला उजवा हात रिकामा, डाव्या हातात मसुराएवढी गोळी ( तो म्हणजे लाडू म्हणे) आणि त्या मूर्तीचा चेहरा बघितला की एवढा वेळ अनोळखी वाटणाऱ्या आपल्या नजरेत अचानक ओळख दिसते. नुसती ओळख नाही तर वात्सल्याची भावना दाटून येते– कारण तो चेहरा असतो गजमुख, त्याचे छोटेसे सुपासारखे कान, डोक्यावर किरीट — ओळख पटते — गणोबा!
होय गणोबाच ! हा गणपती विघ्नहर्ता- मंगलमूर्ती- वरद विनायक- वगैरे सगळ्या विशेषणांच्या पलीकडचा. कारण हा गणोबा असतो तो गौरीचा बाळ. गणू हे त्याचं नाव, पण माहेरी येणाऱ्या लेकधनिणीचा पोरगा, त्याला नुसतं नावाने कसं बनवायचं म्हणून आदरार्थी लावलेला ज्योतिबा खंडोबा यांच्याप्रमाणे बा नावाचा प्रत्यय म्हणून तो ‘ गणोबा. ’
वास्तविक भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव म्हणजे पार्थिव गणपती व्रत. या व्रताची मूळ देवता म्हणजे हा गणोबा, कारण पूर्णब्रम्ह ओमकार आपल्या उदरी पुत्ररूपाने यावा यासाठी माता पार्वतीने श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अशी रोज मातीची गणरायाची मूर्ती घडवून व्रत केले आणि त्याचे फलस्वरूप म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गिरीजात्मज अवतार झाला. याची स्मृती म्हणून दरवर्षी आपण हे पार्थिव गणपती व्रत करतो. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला. आपले सगळे सणवार हे निसर्गाशी, पर्यावरणाशी मिळतेजुळते असे आहेत. नुसते मिळतेजुळते नव्हे तर एकरूप आहेत. जे सृष्टीत घडतं आहे त्याची संपूर्ण जाणीव आणि सृष्टीच्या बदलाबद्दलची कृतज्ञता यांचा समन्वय म्हणजे आपले सण.
गणोबा हा नेहमी काळ्या मातीचा घडवतात. हा गणोबा गणेशाच्या जन्माच्या कथेचे रहस्य देखील उलगडतो. आपणा सर्वांना माहिती आहे की, पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून (अर्थात हा मळ म्हणजे अंगावरच्या त्वचेचा घाणीचा थर नव्हे, तर स्नानापूर्वी लावलेल्या केशर चंदनाच्या उटीचा थर)– तर त्या थरापासून पार्वतीने स्वतःचा गण तयार केला. गणोबासाठी वापरली जाणारी माती ही नदीच्या गाळाची असते. श्रावण भाद्रपद म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ संचित झाल्याचे दिवस. हा गाळ शेतीसाठी किती उपयुक्त असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. या गाळाच्या मातीतच गणेशाची जन्मकथा उलगडते. पृथ्वी म्हणजे साक्षात जगन्माता पार्वती. या पार्वतीच्या अंगावरचा मळ पावसाच्या धारांनी धुवून निघतो आणि मैदानी प्रदेशात स्थिरावतो. हा गाळ जणू संपन्नता घेऊन येतो. म्हणूनच की काय, कुंभार बांधव याच गाळापासून या पार्थिव गणपतीची निर्मिती करतात.
खरंतर व्रत-विधीप्रमाणे यजमानाने स्वतःच्या हाताने असा मातीचा गणपती घडवणे अभिप्रेत आहे. पण मूर्ती शास्त्रानुसार गणरायाची मूर्ती घडवणे हे सगळ्यात अवघड काम आहे, कारण त्याची सोंड- हात- पाय- लंबोदर यांचा समन्वय साधणे नवख्या माणसाला शक्य होत नाही. बरेचदा सोंड गळून पडते आणि गणपतीचा मारुती होतो. म्हणूनच ‘ करायला गेलो गणपती झाला मारुती ‘ अशी म्हण प्रचलित झाली असावी. म्हणून या कामात कुंभार बांधवांचे सहाय्य घेण्याची पद्धत निर्माण झाली आणि हा पार्थिव गणपती कुंभार वाड्यातून येऊन आपल्या घरामध्ये विसावू लागला.
माणसाला मुळातच सौंदर्याचे आकर्षण. या आकर्षणापोटी आणि कुंभार बांधवांच्या अंगभूत कलेमुळे पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये फरक पडत गेला. हाताच्या ओंजळीत मावणाऱ्या काळ्या गणोबापेक्षा चित्रकारांनी चितारलेला, मंदिरात मूर्तिकारांनी घडवलेला गणपती भक्ताच्या मनाला भुरळ पडू लागला आणि मग चतुर्भुज सिंहासनाधिष्ठित अशा गणरायाच्या मूर्तींची निर्मिती सुरू झाली. मग वेगवेगळे रंग आले आणि या रंगात देवाची वस्त्रं, अलंकार, शरीर रंगवलं जायला लागले. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आलं तसं मूर्तींचे आकार वाढत गेले. पुढे जशी नैसर्गिक माती कमी पडू लागली, किंवा मूर्तीच्या भंग पावण्याच्या भीतीमुळे टिकाऊ मूर्तीची मागणी वाढू लागली, तशा साच्यातून घडणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्माण व्हायला लागल्या. मूर्तिकारांचे, भक्तांचे काम सोपे झाले.
पण नकळत मूळ व्रताचा उद्देश बाजूला पडत चालला. पण त्याची स्मृती म्हणून आजही कितीही मोठी मूर्ती आवडली तरी या मूर्तीच्या उजव्या हाताला या काळ्या गणोबाचं स्थान असतंच. त्याचं स्थान उजव्या हाताला असतं, हे तो या व्रताचा मूळ अधिकारी असल्याचं खरे लक्षण आहे. वास्तविक गणोबा गणपती दोन नाहीत. गणोबा ही व्रताची शास्त्रोक्त मूर्ती, तर मोठी मूर्ती आपल्या हौसेची. आजही गौरीपूजनादिवशी याच गणोबाला गौरीच्या पदरात ठेवला जातो. संचारी गौर अपत्यप्राप्तीचा अभिलाष असणाऱ्या स्त्रीच्या ओट्यात याच गणोबाला देते. तिच्या दृष्टीने जिला गणोबा खेळवता आला तिला आई होण्याचा सन्मान मिळाला, कारण गौरीचं हे अवखळ बाळ सांभाळणं किती अवघड आहे हे फक्त गौरीलाच माहिती आहे. — असा हा काळा सावळा पण जिव्हाळ्याचा लाडका गणोबा !
“ श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः “
माझं माहेर खानदेशातलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादे !! लग्न करून कोल्हापूरला आल्यावर गणेशचतुर्थीच्या २-३ दिवस आधीच * गणूबा घ्या ओ गनुबा… भावल्या घ्या हो भावल्या * अशी तार स्वरात हाक कानी पडली.. मला आश्चर्य वाटलं- ‘ अगंबाई गणपती असे दारावर विकायला येतात?’ सहज कुतुहल म्हणून त्या बाईला बोलावलं आणि पहिल्यांदाच या गनुबाचं– नव्हे गणोबाच दर्शन घेऊन झालं. कारण मला वाटतं महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर- सांगली भागातच *गणोबा” ची मूर्ती पूजण्याची पद्धत असावी. खूप मोठमोठ्या मूर्तींबरोबर तर गणोबा फुकट मिळतो म्हणे !! आणि तो गणोबा पण मोठ्या गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान होतो.. उत्सवमूर्ती होऊन !
आणि मग हा गणोबा गौराई पुत्र.. गौरीजागरणाच्या गाण्यातून अधिक बाळरूपात भेटला- गन्या गन्या गनेशा !! गणानं घुंगरू हरवलं…. किंवा गण्या हटून का बसला? — अशासारखी ती गाणी — खास “ गणोबा “ साठी म्हटली जाणारी.
© सुश्री ज्योत्स्ना डासाळकर
एडवोकेट
मो. नं. ९५१८७७८८२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈