श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ गूढ असं बरंच कांही… ☆ श्री अरविंद लिमये ☆

स्वप्न म्हंटलं किं ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ आठवणं सहाजिकच आहे.पण ‘स्वप्न’ म्हणजे फक्त तेवढंच नव्हे.मुंगेरीलालसारखे दिवास्वप्ने पहाणारे जसे आहेत तसेच आयुष्यातलं नेमकं उद्दीष्ट ठरवून त्यादिशेने प्रदीर्घकाळ अथक, प्रयत्न न् कष्ट करीत ध्येय प्राप्तीनंतरचा स्वप्नपूर्तीचा कधीच न विरणारा आनंद मिळवणारे आणि जपणारेही आहेतच. दिवास्वप्नं पहात स्वप्नरंजनात मश्गूल रहाणाऱ्यांबाबतची किंव आणि स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करणाऱ्यांबद्दलचा कौतुकमिश्रित आदर यांना निमित्त होणाऱ्या स्वप्नांच्या या दोन रुपांमधे गूढ असं कांहीच नाहीय.पण प्रत्येकालाच सुप्तावस्थेत दिसणाऱ्या स्वप्नांमधे मात्र कधीच थांग न लागणारं गूढ ठासून भरलेलं आहं.ती स्वप्ने हेच एक गूढ विश्व आहे. जाणवतं, दिसतं.. पण ते जसंच्या तसं इतरांना त्याचवेळी दाखवता मात्र येत नाही. ते खास ज्याचं त्याचंच असतं. त्या क्षणांपुरतं त्याच्यासाठी अगदी खरं..तरीही तो एक भासच.भास-आभासाचा चकवा देत रहाणारा एक खेळ!

‘स्वप्न’ मला एखाद्या भरकटत गेलेल्या नाटक किंवा सिनेमासारखं वाटतं.बघताना त्यात गुंतत जात असलो तरी त्यातून बाहेर पडल्यावर न पटणारं, असंबद्ध, अविश्वसनीय सगळं कृत्रिम,तद्दन काल्पनिक, कशाचा कशाला मेळ नसणारं असं काहीसं वाटत रहाणारं..!

खरंतर स्वप्न एखाद्या नाटक किंवा सिनेमातल्या प्रसंगांच्या विखुरलेल्या तुकड्यांसारखंच तर असतं.आपल्या मन:पटलाच्या रंगभूमीवर दिसणारं नाटक किंवा मन:पटलाच्या पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमासारखं..!स्वप्न आपण समोर बसून नाटक-सिनेमासारखं पहातही असतो आणि अकल्पितपणे त्याचाच एक भाग बनून स्वतः त्यात भूमिकाही करत असतो. तरीही आपला स्वतःचाच मन:पटलावरचा आपलाच वावर समोर बसून पहावा तसं पाहूही शकत असतो.सगळंच गूढ.. अतर्क्य..!

हे स्वप्न पडणं जसं तसंच त्यांचं विरणंही तितकंच गूढ!त्याचा थांगच लागू नये असं.मला स्वतःला आजपर्यंत पडलेल्या असंख्य स्वप्नांपैकी अगदी मोजकीच स्वप्ने आज आठवतात हे जसे , तसेच इतर न आठवणाऱ्या स्वप्नांचे विरुन जाणेही मला अनाकलनीय वाटतं आलंय हेही खरेच.स्वप्न पहात असताना त्यातले सगळेच घटना-प्रसंग एखाद्या वास्तव क्षणांसारखे अनुभवत असताना त्या क्षणी मनाला झालेल्या त्या स्वप्न-घटनादृश्यांच्या स्पर्शांची जाणिव, त्या स्पर्शांमधला त्या त्या वेळचा दिलासा,आनंद किंवा दुःख, वेदना,थरारही लख्ख जाणवत राहिलेला पुढे बराच वेळ. पण दचकून जाग येताच कुणालातरी ते स्वप्न, तो अनुभव सांगावं असं उत्कटतेने वाटत असतानाच जादूची कांडी फिरावी तसं सगळंच विरून गेलेलं..! हे विरुन जातंच कसं आणि कुठे हे प्रश्नही स्वप्ने कां आणि कशी पडतात या प्रश्नांसारखीच अनुत्तरीत, अनाकलनीयच! या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे अखंडपणे सुरु आहेही.पण ‘आपल्या मनातल्या सुप्त इच्छा,भावनांचा कल्लोळ, दडपणं,नैराश्य,अस्वस्थ करणारे त्रासदायक विचार..असं सगळ्याचं आपल्या सुप्तावस्थेत चित्रभाषेत प्रकट होणं म्हणजे स्वप्न’ यासारखे आजवरच्या संशोधनाचे निष्कर्ष मला तरी अनेक शक्यतांपैकी फक्त एक शक्यता आहे असेच वाटते. एखाद्या हिमनगाचे टोक दिसावे तसे न् तेवढेच.स्वप्नाच्या गूढ अर्थांच्या एका सूक्ष्म कणाएवढे!कारण स्वप्नांच्या इतर अतर्क्य, सूचक,प्रेरणादायी,दृष्टांतसदृश स्वप्न-प्रकारांचा थांग या निष्कर्षानंतरही अद्याप कुणालाच लागलेला नाहीय.अगदी तो अनुभव,त्यातली उत्कटता ज्याने स्वतः अनुभवलीय त्यालाही नाही.

या अतर्क्य अशा सूचक स्वप्नांचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे.अतिशय उत्कट आनंदानुभव दिलेले ते क्षण आणि त्यातील बारकाव्यांसकट ते मोजके स्वप्नानुभवही मी इतक्या वर्षांनंतरही विसरु शकत नाहीय..!आणि तरीही त्यामागील गूढ मात्र अथक प्रयत्नांनंतरही मला उकललेलं नाहीय.निदान ते उकलेपर्यंततरी ‘स्वप्न’ म्हणजे अतिशय गूढ असं बरंच कांही.. असंच म्हणावं लागेल.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments