सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगवेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष , कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष, एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण गुढीपाडवा असे म्हणतो.
याला वर्षप्रतिपदा तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी एक गोष्ट समान आहे .ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचेच आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:। ” असे वेदाने प्रथम सांगितले .आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.
नैसर्गिक आणि भौगोलिक—- गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपात आवर येतो.( संपात बिंदू, क्रांती वृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांना छेदतात, तो बिंदू.) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्यावेळी उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने, तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायी असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात करणे योग्य आणि आदर्शही आहे.
गुढीपाडवा या सणाला पौराणिक असाही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, तो हा दिवस. महाभारताच्या आदिपर्वात उपरीचर राजाने, त्याला इंद्राने दिलेल्या कळकाची काठी त्याने जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून गुढी पूजन केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर-पार्वती यांचे लग्न चैत्र शुद्ध प्रतिपदेला ठरले. आणि तृतीयेला झाले .म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.ऐतिहासिक दृष्टीने विचार करता शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने , मातीचे सैन्य केले .आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने क्षात्र तेज संपलेल्या समाजात ,आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रूवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक तेव्हापासून सुरू झाले.
अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर ,या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात .त्यामुळे तो हा दिवस. वर्षा. रंभाचा मानला जातो.
व्यावहारिकदृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका हि शुभ मुहूर्त असल्याने ,वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही.” गणेशयामल ” या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की 27 नक्षत्रां पासून निघालेल्या लहरीं मध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी,चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे योग्य आहे.
क्रमशः…
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈