सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ ग्रीष्माकडून वर्षेकडे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सरत्या मे महिन्याचे दिवस ! आभाळात हळूहळू ढगांचे येणे सुरू झाले आहे. घामाच्या धारा वाहत आहेत ! असं वाटतंय, यावी एकदा पावसाची मोठी सर आणि भिजून जावे अंगभर ! पण अजून थोडी कळ काढायला हवी ! मृगाच्या आधीची ही तृषार्तता ! ग्रीष्माच्या झळांनी तप्त झालेल्या सृष्टीला आता ओढ लागली आहे ती नवचैतन्य देणाऱ्या वर्षेची ! कायम आठवतात ते बालपणापासूनचे दिवस ! एप्रिलमध्ये कधी एकदा परीक्षा संपते आणि मोकळे होतोय याची वाट पहायची ! आणि मग दोन महिने नुसता आनंदाचा जल्लोष ! सुट्टीत कधी मामाच्या घरी जायचं तर कधी काकाच्या घरी जायचं ! कधी आत्याकडे मुक्काम ठोकायचा ! उन्हाच्या वेळी घरात पंखा गरगर फिरत असायचा,उकाडा असायचा, पण तरीही खेळण्या कुदण्यात बाकीचं भान नसायचं ! आंबे, फणस, काजू, कलिंगडं, खरबूज, जांभळे अशा फळांची लयलूट सगळीकडे त्या त्या प्रदेशानुसार असे ! सगळ्याचा आनंद घ्यायचा ! अगदी आईस्क्रीमच्या गाडीवरील आईसकांडीचा सुद्धा ! उसाचा थंड रस प्यायचा, भेळ खायची..असे ते उडा- बागडायचे दिवस कधी सरायचे कळायचे सुद्धा नाही ! नेमेची येतो मग पावसाळा, तो जसा येतो तशीच शाळा सुरू व्हायची वेळ येते.. 

आमच्या वेळची सुट्टी अशी जात असे आणि जून महिना येत असे. त्याकाळी अगदी नवी पुस्तकं मिळायची नाहीत. सेकंड हॅन्ड पुस्तके गोळा करायची .काही पुस्तकांना बाइंडिंग करून घ्यायचं, जुन्या वहीचे उरलेले  कोरे कागद काढून त्या पानांची वही करायची. दप्तर धुऊन पुन्हा नव्यासारखं करायचं आणि शाळेच्या दिवसाची वाट पाहायची ! नवीन वर्ग, नवीन वर्ष असले तरी मैत्रिणी मात्र आधीच्या वर्गातल्याच असायच्या !

कधी एकदा सर्वांच्या भेटी गाठी घेतो असं वाटे.

गेले ते दिवस म्हणता म्हणता आमची लग्न होऊन मुले बाळे झाली. काळ थोडा बदलला. मुलांसाठी नवीन पुस्तके, नव्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग अशा खरेद्या होऊ लागल्या. आणि जून महिन्यात छत्र्या, रेनकोट यांनी पावसाचे स्वागत होऊ लागले…… अशा या सर्व संधीकालाचे आम्ही साक्षी. स्वतःचं बालपण आठवताना मुलांचं बालपण कसे गेले ते आठवते. आणि आता नातवंडांचे आधुनिक काळातील बालपणही अनुभवतो आहोत !

काळ फार झपाट्याने बदलला.. मजेच्या संकल्पना बदलल्या. हवा तीच ! सुट्टी तशीच ! पण ती घालवण्याचे मार्ग बदलले. बऱ्याच मुलांना आजोळी जाणे माहित नाही. स्वतःच्या गावी जात नाहीत, जिथे आठ पंधरा दिवस विसावा घ्यायला जाता येईल असं ठिकाण उरले नाही.. उद्योग धंदा, नोकरी यात आई-वडील बिझी, त्यातून काढलेले सुट्टीचे चार दिवस मुलांना घेऊन जातात थंड हवेच्या ठिकाणी ! भरपूर पैसा असतो, खर्च करून येतात आणि मुलांना विकतचं मामाचं गाव दाखवून येतात. आईस्क्रीम, पिझ्झाच्या पार्ट्या होत असतात. हॉटेलिंग, खरेदीची मजा चालू असते. कारण प्रत्येकाला आपली स्पेस जपायची असते. संकुचित झाली का मनं असं वाटतं ! पण तरुण पिढीच्या मर्यादाही कळतात. त्यांचं वेळेचं भान वेगळं असतं .आल्या गेलेल्यांच्या स्वयंपाकाची सरबराई करणारी गृहिणी आता सगळा दिवस घराबाहेर असते. त्यामुळे कशी करणार ती आदरातिथ्य ! यंत्रवत् जीवनाचा एक भाग बनतात जणू सगळे ! असं असलं तरी मुलांचा सुट्टीचा मूड थोडा वेगळा असतो. त्यांना दिलासा देणाऱ्या काही गोष्टी आता आहेत. मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना नेणं- आणणं हा एक आधुनिक काळातील बदल आहे .संस्कार वर्ग, स्विमिंग, नाट्य, गायन असे वेगवेगळे वर्ग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उघडलेले असतात !  जमेल त्या पद्धतीने मुलांचा विकास व्हावा म्हणून हे क्लासेस जॉईन करण्याचा पालकांचा उत्साह असतो. काहीतरी नवीन शिकवण्याचा अट्टाहास असतो. पुन्हा एकदा शाळेच्या चाकोरीला जुंपण्याआधीचे हे मे अखेरचे आणि जूनचे पहिले काही दिवस असतात !

आता आगमन होणार असते ते पावसाचे ! नव्याच्या निर्मितीसाठी आतूर सृष्टी आणि होणार असते पावसाची वृष्टी ! छत्री, रेनकोट घेऊन चालणार माणसांची दुनिया ! मग कधी पाऊस करतो सर्वांची दाणादाण ! कुठे पाणी साचते तर कुठे झाडे पडतात. सृष्टीची किमया तिच्या तालात चालू असते. माणसाची पुन्हा एकदा ऋतुचक्रातील महत्वाच्या ऋतूला- पावसाला तोंड देण्याची तयारी झालेली असते. मेच्या अखेरचे आणि जूनच्या सुरुवातीचे दिवस विविध अंगाने आणि वेगळ्या ढंगात येत असतात. परमेश्वरा ! तुझ्या अनंत रुपातील हे सृजनाचे रूप मला नेहमीच भुरळ घालते. आकाशातून वर्षणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरीची मी चातकासारखी वाट पाहत राहते. तन शांत, मन शांत अशी ती अनुभूती मनाला घ्यायची असते. सरता मे आणि उगवता जून यांच्या संधीकालातील ही तगमग आता वर्षेच्या आगमनाने शांत होणार असते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments