प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण ! प्रत्येक कवीचा आवडता विषय ! अगदी बालकवींच्या ” श्रावणमास “ या कवितेपासून तर आजच्या अगदी नवोदित कवी पर्यंत पिढी दरपिढी अनेक कवितांमधून श्रावण रसिकांच्या भेटीला येतोच आहे. मग गझलकार तरी याला अपवाद कसा असणार ? कारण आधी गझलकार हाही कवीच आहे ! फक्त त्याने गझलेच्या तंत्राकडे म्हणजेच शरीरशास्त्राकडे अतिशय गंभीरपणे बघायला हवे ! केवळ मंत्राच्या मागे लागून जर गझलेच्या आकृतीबंधाकडे दुर्लक्ष झाले तर ती कविताही राहत नाही आणि गझलही होत नाही , हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करीत आहे. गझलेतील लय , यती आणि एकूणच आकृतीबंध सांभाळून वाचकाला आवडणारी रचना / गझल देणे हे साधे सोपे नसते ! यासाठी प्रचंड मोठा शब्दसाठा , किमान व्याकरणाची माहिती , शुद्धलेखन याची गरज असतेच . पण त्याच बरोबर भौगोलिक / प्रादेशिक जाणीवा असणे हे सुद्धा गरजेचे असते ! अन्यथा आषाढात रिमझिम पाऊस आणि श्रावणात कोसळधारा कवितेतून बरसतात ! काही गझलांमधे उन्हाळ्यात प्राजक्त फुलतो तर पावसात पानझड होते . हे हास्यास्पद प्रकार होऊ नयेत याचीही काळजी गझलकाराने घ्यायला हवी !

सध्या आणखी एक प्रकार बघायला मिळतो की , हवी तेवढी सूट घेऊ नवोदित गझलकार गझल लिहितात ! अगदी एक शेर झाला की त्यात भरीचे ४ शेर घालून गझल पूर्ण करून समाज माध्यमावर पोस्ट करतात ! बरं त्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर ” अमुक तमुक प्रस्थापित गझलकाराने ही सूट घेतली होती म्हणून मीही घेतली !” हे सांगतात . यावर काय बोलणार ? आम्हीच आमची जबाबदारी ढिसाळपणे वापरत असू तर नवीन लोकांना कां दोष द्यायचा ?

गझल तंत्राधिष्ठीत पण काव्यात्म लेखन प्रकार आहे ! गझल असते किंवा नसतेच ! त्यात ” गझले सारखे किंवा गझलवजा ” म्हणण्याचा प्रघात आताशा रूढ होत आहे. याच्याशी अनेक कारणे निगडीत आहेत , त्यातील ” गझलगुरू ” हाही प्रकार महत्वाचा आहे. ते गझलतंत्र तर सोडाच , पण चक्क गझल शिकवतात . (?) त्यामुळे आज गझलेची संख्यात्मक वाढ होत आहे , पण गुणात्मकतेची काळजी वाटते ! अष्टाक्षरी , ओवी , अभंग , गवळण , भावगीत , भक्तीगीत , भारूड , पोवाडा , पाळणे , आरत्या , श्लोक , आर्या , दिंडी असे अनेक प्रकार मान्य करणाऱ्यांना गझलचे तंत्रच तेवढे का खटकते / का खुपते हा अभ्यासाचा विषय आहे ! त्यावर कृत्रिमतेचाही आरोप होतो . असो !

हीच बाब विषयांशीही निगडीत आहे . आज जुने , नवे जेवढे हात गझल लिहू लागले आहेत , त्या गझलेतला श्रावण शोधावाच लागतो . समाज , सुधारणा , भूक , दारिद्रय यांच्याच परीघात रमलेली गझल प्रेम , माया , निसर्ग यापासून दूर जाते आहे की काय ही भिती वाटते . पण तेव्हाच काही दादलेवा शेर वाचले की कळतं ” पेला अर्धा भरला आहे “.

मिठीत होती अधीरता अन् दिठीत होता साजण

सायंकाळी . ढगात आला श्रावण

हा श्रावणाचा माझाच एक शेर आहे ! अस्ताचलास जाणारा सूर्य , त्याची ढगावर पडलेली किरणे आणि उमटलेलं इंद्रधनुष्य , ही श्रावणाची ओळख चट्कन पटते ती सायंकाळी .

तुझ्या फुलांचा सडा पहाया रोज अंगणी

श्रावण येतो मज भेटाया रोज अंगणी

कोल्हापूर येथील श्री .नरहर कुलकर्णी यांचा हा राजस शेर मनाला भावतो !

हासरा नाचरा श्रावण कुसुमाग्रज दाखवतात ! तर ” ऋतू हिरवा ऋतू बरवा या ओळीनी श्रावण वेगळाच भासतो !

समीक्षक प्रकाश क्षीरसागर त्यांच्या एका शेरात म्हणतात ,

गझलेस भावलेला श्रावण किती निराळा

सृष्टीस भाळलेला श्रावण किती निराळा

श्रावण सुरू झाला की कवीच्या प्रतिभेला धुमारे फुटू लागतात , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . नयनरम्य श्रावण , रंगाने , गंधाने आपल्याला मोहून टाकतो . अशाच अर्थाचा प्रसाद कुलकर्णी यांचा एक शेर बघा !

तनही बरवा मनही बरवा श्रावण हिरवा

धुंद करी ही बेधुंद हवा श्रावण हिरवा

श्रावणावर अनेक कविता आहेत पण गझल मात्र मोजक्याच आहेत . त्यातही तुरळक शेर सापडतात . नवोदित आणि जेष्ठ गझलकारांना असे सुचवावेसे वाटते की सृष्टीतला कण न् कण आपल्या काव्याचा विषय होऊ शकतो . फक्त ती दृष्टी हवी ! त्यामुळे त्याच त्या विषयांच्या रिंगणात फिरण्यापेक्षा नवनवे विषय घेऊन आपली गझल पूर्ण करावी ! आज नवोदित गझलकारांमध्ये काही आश्वासक हात नक्कीच आहेत . त्यामुळे तंत्र सांभाळून गझलेचा मंत्र सांभाळला जात आहेच . एवढेच नाही तर नाण्याला जशा दोन बाजू असतात , आणि दोन्ही खणखणीत असाव्या लागतात , तीच गोष्ट गझलेची आहे . तंत्र मंत्र योग्यच असायला हवे एवढेच नाही तर नाण्याला एक तिसरी बाजू म्हणजे एक कडापण असते . अत्यंत गरजेची ! तशीच मराठी गझलेची कडा म्हणजे , मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन सांभाळून , निर्दोष तंत्रात आलेली  गझलेतली गझलियत .

या तीनही बाजुंचा सारासार विचार करून गझलेकडे वळणारे बघितले की ,

” विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही “

ही भट साहेबांची ओळ सार्थ झाली असे वाटेल .

विस्तारभयास्तव इथेच थांबते माझ्या एका गझलेसह !

 घरात आला श्रावण ☆

संध्याकाळी मी जपलेला घरात आला श्रावण

मृद्गंधाची हाक ऐकुनी नभात आला श्रावण

 

या हळदीच्या देहावरती सोनरुपेरी आभा

केस मोकळे पाठीवरती मनात आला श्रावण

 

सायंकाळी शुभशकुनाच्या आज पाहिल्या रेषा

इंद्रधनूला झुला बांधुनी ढगात आला श्रावण

 

उत्साहाची घरात माझ्या अवघी पखरण झाली

ओलेती तू समोर येता क्षणात आला श्रावण

 

मल्हाराचे गूज उकलले वर्षत अमृत धारा

कूजन सरले तरी कुणाच्या स्वरात आला श्रावण

 

लयतालाने येत समेवर मैफल जिंकत गेले

गुणगुणताना गझल मनीची सुरात आला श्रावण

 

ओठावरती पुन्हा उमटली मेघसावळी नक्षी

पहाट होता प्रणयाची मग भरात आला श्रावण

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments