डाॅ. मीना श्रीवास्तव
विविधा
☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
२८ सप्टेंबर १९२९ चा अत्यंत मंगलमय दिवस! या दिवशी घडलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना! गंधर्वगायनाच्या पल्याड असलेले ‘लता मंगेशकर’ नामक सात अक्षररुपी चिरंतन स्वरविश्वाचे मूर्तरूप जन्माला आले. अक्षय परमानंदाची बरसात करणारी स्वरशारदा लता आज संगीताच्या अक्षय अवकाशात ध्रुव ताऱ्यासारखी अढळपदी विराजमान झाली आहे. तिचे सूर अवकाशात असे कांही विखुरलेले आहेत की, ती या नश्वर जगात नसल्याचे जाणवतच नाही. ‘शापित गंधर्व’ दीनानाथ मंगेशकरांचा वारसा घेऊन लता आयुष्याचा प्रत्येक क्षण काटेरी वाटचाल करीत संगीताला समर्पित करूनच जगली. एखादी मूर्ती घडत असतांना टाकीचे घाव सहन करते, तसेच तिच्या आयुष्याची सुवर्णसांगता होण्याआधी तिने अगणित घाव सहन केले. तिच्या संगतीने काम करणाऱ्या गायक, संगीतकार, गीतकार, सिनेसृष्टीतील अनेक व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरे तसेच गो नी दांडेकरांसारख्या दिग्गजांच्या सहवासाने तिच्या व्यक्तिमत्वाला अन मखमली स्वरांना दैवी सुवर्णकांती प्राप्त झाली. लता आयुष्यभर एक अनोखी अन अनवट सप्तपदी चालली, सप्तसुरांबरोबर!
मंगेशकर भावंडे म्हणजे आजच्या भाषेत मी म्हणेन, ‘मंगेशकर ब्रँड’ याला अन्य नसे उपमान! अन्य नसे पर्याय! दीनानाथ आणि माई (शेवंती) मंगेशकरांचे हे पंचप्राण होते, प्रत्येकाचा गुणविशेष निराळा. लताच्या या साफल्याचे रहस्य होते लहानपणापासून आपल्या पित्याकडून, अर्थात मराठी संगीत नाटकांचे प्रसिद्ध गायक अभिनेता ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ यांच्याकडून वारसाहक्काने आणि शिक्षणातून आलेली संगीतविद्या, तिची स्वयंस्वरप्रज्ञा आणि कठोर स्वरसाधना! अजाणत्या वयापासूनच लताचे हे संगीतज्ञान तिच्या पिताला जाणवले होते. तेव्हांपासूनच त्यांनी तिच्या गायकीला समृद्ध केले. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच ती रंगमंचावर गायला लागली. १९४२ मध्ये त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हां लता केवळ १३ वर्षांची होती. या कोवळ्या वयापासूनच ती भावंडांचा आधारवड झाली! संघर्षांची मालिका समोर होती, पण त्यांतूनच तिने हे काटेरी मार्गक्रमण केले.
प्रथम प्रसिद्धी मिळाली ती ‘महल'(१९४९) चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याला! तेव्हा लता वीस वर्षांची होती आणि या चित्रपटाची नायिका मधुबाला होती सोळा वर्षांची. या चित्रपटामुळे या दोघींची कारकीर्द बरोबरच बहरली, एक स्वरसम्राज्ञी अन दुसरी सौंदर्यसम्राज्ञी! गंमत म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डप्लेअरवर गायिका म्हणून नाव होते ‘कामिनी’ (तेव्हा रजतपटावर गाणे साकार करणाऱ्या पात्राचे नाव लिहीत असत)! नंतर लतानेच संघर्ष करून रेकॉर्डप्लेअर वर नावच नव्हे तर रॉयल्टी, तसेच गायक गायिका यांना वेगवेगळे फिल्मफेअर पुरस्कार इत्यादी मिळवून त्यांना त्यांचे श्रेय मिळवून दिले! लता आणि सिनेसृष्टीची अमृतगाथा समांतर म्हणायला हरकत नाही. १९४० पासून ते अगदी २०२२ पर्यंत जवळपास ८० वर्षांची असलेली ही सांगीतिक सोबत. तिच्या सोबतचे गायक, गायिका, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, तंत्रज्ञ, वादक, दिग्दर्शक, निर्माते असे हजारोंच्यावर लोक तिच्या बरोबर मार्गक्रमण करते झाले, कोणी अर्ध्या वाटेवर सोडून गेलेत. आता तर तीही त्यांच्या सोबत गेली आहे. आता हा स्वरामृताचा वेलू गगनाला भिडलाय!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं गाणं इतकं ऐकलं तरी असं कां होतं? ‘अगंबाई, अरेच्चा, हे सुंदर गाणे आजवर ऐकले कसे नाही! आई शप्पथ, हे असं कसं मिस झालं!’ मंडळी, ही कथा प्रत्येक रसिकाचीच असावी, इतके हे स्वरभांडार विशाल आहे. आणिक एक वेगळीच गंमत आहे हिच्या जादुई स्वरांत! ऋतूबदलाप्रमाणे आपल्या बदलत्या मूडनुसार आपल्यासाठी लताच्या आवाजाचे पोत बदलल्याचा आपल्याला भास होतो. खरे पाहिले तर एकदा ऐकून हा स्वरानंद आपल्या हृदयात झिरपत नाही असे असावे! बघा ना, आज जर माझा मूड ऑफ आहे, तर या अमुक गाण्यात लताचा आवाज मला जास्तच शोकविव्हल लागलाय असा फील येतो. काय म्हणू या बहुरंगी, बहुढंगी, फुलपाखरी आवाजाच्या कळांना, या स्वरांबद्दल बोलायचे तर संत तुकारामांची रचना आठवली, ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे’! तिला काय माहिती की, तिने आमचे आयुष्य किती अन कसे समृद्ध केले ते! तिच्या आवाजाने समृद्ध झालेल्या ३६ भाषांपैकी कुठली बी भाषा असू द्या, या एकाच आवाजात ती भाषाच धन्य होईल अशी गाणी, एकदम ओरिजिनल लहेजा आणि स्वराघात! लता तू वरून काय घेऊन आलीस अन इथे काय शिकलीस, याचा अचेतन हिशोब करणे म्हणजे तारे मोजण्यापेक्षा दुष्कर. त्यापेक्षा सच्च्या रसिकांनी एक ऍटिट्यूड (वर्तमान संदर्भात नव्हे) ठेवावा, ‘आम खाओ, पेड मत गिनो’. फक्त तिच्या गाण्यावर फिदा व्हायचे, की विषय तिथंच आटोपला!
तिने दयाबुद्धीने कांही प्रांत अगदी तिच्या आवाक्यात होते तरी सोडले, शास्त्रीय संगीत अन नाट्यसंगीत. (यू ट्यूब वर आहेत मोजके)! दत्ता डावजेकर यांनी नमूद केल्याप्रमाणे जिच्या नांवातच लय आणि ताल आहे, जिच्या गाण्याने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतात, जिने ‘आनंदघन’ या नावाने मोजक्याच (चार) चित्रपटांना संगीत देऊन तमाम संगीतकारांवर उपकार केलेत, जिने शास्त्रीय संगीताचे उच्चशिक्षण घेऊन, त्यात प्राविण्य संपादून देखील व्यावसायिकरित्या शास्त्रीय संगीताच्या बैठकी सजवल्या नाहीत (प्रस्थापित शास्त्रीय गायकांनी देखील तिचे याकरता जाहीररीत्या आभार मानलेले आहेत!), तिच्याबद्दल संगीतकार वनराज भाटिया म्हणतात, ’she is composer’s dream!’ कुठल्याही संगीतकाराची गाणी असोत, खेमचंद प्रकाश, नौशाद, अनिल बिस्वास, ग़ुलाम मोहम्मद, सज्जाद हुसैन, मदनमोहन, जमाल सेन यांच्यासारख्या दिग्गजांची कठीण चालींची, सलिलदा किंवा सचिनदांच्या लोकसंगीतावर आधारित असलेली, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन अन शंकर जयकिशन यांच्या अभिजात संगीताने नटलेली, की आर डी, ए आर रहमान, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजीची आधुनिक गीते असोत, त्या गाण्याला लताचा परीसरुपी स्वरगंधार लाभला की, त्याची झळाळी नवनवीन सुवर्ण उन्मेष घेऊन रसिकांच्या कलेज्याचा ठाव घ्यायची. अतिशय कठीण अन घनगंभीर चाली रचून लताकडून असंख्य रिहर्सल करून घेणारा संगीतकार सज्जाद हुसैन तर म्हणायचा, ‘फक्त लताच माझी गाणी म्हणू शकते!’
ही स्वरवल्लरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षा वरचढ! कुठलाही रोग असू देत, हिच्याजवळ गाण्याच्या रूपात औषध हाजिर है! बरे यात ‘औषध मजला नलगे’ चे बहाणे अजिबात चालायचे नाहीत. लहान मुलीचे ‘बच्चे मन के सच्चे’, १६ वर्षांच्या नवयौवनेचे ‘जा जा जा मेरे बचपन’, विवाहितेचे ‘तुम्ही मेरी मंजिल’, समर्पितेचे ‘छुपा लो यूं दिल में प्यार मेरा’, तर एका रुपगर्वितेचे, ‘प्यार किया तो डरना क्या’, एका मातेचे ‘चंदा है तू’, एका क्लब डांसरचे (आहे मंडळी) ‘आ जाने ना’ एका भक्तिरसाने परिपूर्ण अशा भाविकेचे, ‘अल्ला तेरो नाम’, एका जाज्वल्य राष्ट्राभिमानी स्त्रीचे, ‘ऐ मेरे वतन के लोगों’! अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत?
क्रमशः…
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈