डाॅ. मीना श्रीवास्तव
विविधा
☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(…अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत?)
लताने गायलेली माझी आवडती गाणी आठवण्याचा प्रयत्न केला असता, हातातून बहुमोल मोती घरंगळून जावेत असेच होत होते. त्यातील कांही पेश करायचा मोह अगदीच आवरत नाही. मला लताचा १९५० ते १९५५ चा अगदी कोवळा आवाज फारच प्रिय आहे. म्हणून गाणी तशीच… ‘उठाए जा उनके सितम’ – (चित्रपट – ‘अंदाज’, १९४९, मजरूह सुल्तानपुरी – नौशाद), ‘सीने में सुलगते हैं अरमाँ’ – (चित्रपट – ‘तराना’, १९५१, प्रेमधवन – अनिल बिस्वास), ‘साँवरी सूरत मन भाई रे पिया तोरी’ – (चित्रपट – ‘अदा’, १९५१, प्रेमधवन – मदनमोहन), ‘ये शाम की तनहाइयाँ’ – (चित्रपट – ‘आह’, १९५३, शैलेन्द्र – शंकर जयकिशन), ‘जाने वाले से मुलाकात ना होने पायी’ -(चित्रपट – ‘अमर’ – १९५४, शकील बदायुनी – नौशाद). अर्थात प्रत्येकाच्या आवडीला कांही परिमाण नाही हेच खरे!
कानांत प्राण एकवटून ऐकत राहावे असे हे आनंदघन बरसतात अन मन चिंब होते, कितीही भिजले तरी परत ते मखमली अन नर्म मुलायम स्वरतुषार झेलावेसेच वाटतात. अमृतलता असेल तर जितके अमृतपान करा, तितकी अतृप्ती वृद्धिंगत होतच जाते. मित्रांनो! ही अतृप्ती शाश्वत आहे, कारण लताचा ॐकारस्वरूपी स्वरच मुळी चिरंतन आहे, त्याचे अनादी अनंत रूप अनुभवल्यावर स्वाभाविकपणे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ मला आचार्य अत्रेंचे लताविषयीचे एक वाक्य फार आवडते, ‘सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपूरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीचा नाद, हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे.’
आचार्य अत्रे यांनीच लताला २८ सप्टेंबर १९६४ साली (अर्थात तिच्या वाढदिवशी) ‘दैनिक मराठा’ या त्यांच्या वृत्तपत्रात अजरामर झालेले असे त्यांचे मानपत्र अर्पण केले होते! संपूर्ण लेखच वाचनीय आहे, पण त्याची झलक म्हणून लताच्या अद्भुत, अनमोल अन अनुपम स्वराविष्काराचे वर्णन करतांना अत्र्यांनी किती नाजूक आणि मखमली शब्दांची आरास उभारली आहे बघा, ‘स्वर्गीय स्वरमाधुर्याचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताचे केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर, अभिनंदन करणे म्हणजे स्वरसम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिचा चरणाखाली जाड्याभरडया गोणपाटांच्या पायघड्या अंथरण्याइतकं विशोभित आहे. लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सुवर्णकिरणं दवबिंदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतं तूच्या लेखणीने आणि वायूलहरीच्या हलक्या हातानं, फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंड्यातून तिला अर्पण करायला हवं!’
इतके मानसन्मान, प्रसिद्धी, ऐश्वर्य आणि चित्रपटसृष्टीतला झगमगाट हे सर्व असूनही तिचा रियाज चुकला नाही अन पाय जमीनीवर होते ते तिथंच राहिले. जागतिक कीर्तीच्या प्रतिष्ठित अल्बर्ट हॉल मधील तिला आंतरराष्ट्रीय गायिका म्हणून प्रस्थापित करणाऱ्या कार्यक्रमाची तारीफ करावी की, सर्वश्रेष्ठ असे दादासाहेब फाळके अन भारतरत्न पुरस्कार मिळाले तरी लताची विनम्रता कमी कशी झाली नाही याचे नवल करायचे?
स्वरलता या विषयावर रकान्यांवर रकाने, ऑडिओ, विडिओ, पुस्तके, सर्व कांही भरभरून उपलब्ध आहेत. पण आपण सागराला त्याच्याच जलाने अर्ध्य देतो ना, तसेच माझे हे अर्ध्य आहे! या स्वरदेवतेने स्वरसुमने भरभरून दिलीत! ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था झालीय, ओंजळ कवाच भरली फुलांनी, डोळे बी भरले पाण्यानी, अन हृदय भरलं ‘हृदया’ च्या (लताचे हे नाव मला अतिप्रिय) स्वरमौक्तिकांनी! आता ‘हेचि दान देगा देवा’ की, फक्त लताचा निर्मोही, निरंकारी अन निरामय स्वर असावा, तिच्या सप्तसुरांच्या चांदण्यांच्या पायऱ्या चढत जावे आणि पारलौकिक संगीतअवकाशातील ध्रुव ताऱ्यासमान चमकणारी आमची लाडकी स्वरलता अनुभवावी फक्त तिच्या स्वरलहरींतून, अगदी याचि देही अन याचि जन्मी! प्रिय वाचकांनो, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशा लताच्या स्वराविष्काराला तूर्तास विराम देऊन या अजरामर स्वरशारदेच्या चरणी नतमस्तक होते!
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈