सौ. सुचित्रा पवार
☆ गुळभेंडी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
नाव वाचून कुणाला तर वाटेल की हा भेंडीच्या भाजीचा गोड प्रकार असावा पण ग्रामीण भागातील लोक चटकन ओळखतील की हे झाड आहे. होय! पिंपळासारखी पण तळहाता एवढी रुंद, साधारण हृदयाच्या आकाराची पाने असणारे, रंगीबेरंगी फुलांचे आणि पिंपळासारखी घनदाट सावली देणारे गुळभेंडीचे झाड. लहानपणीचा आमचा सवंगडी.
उत्तर दक्षिण दरवाजे असणाऱ्या आमच्या कौलारू घराच्या प्रवेशद्वाराजवळ आत येताना उजवीकडे गुळभेंडीचे झाड आणि डावीकडे विलायती चिंचेचे झाड होते. घरात प्रवेश करण्या अगोदर भल्या मोठ्या अंगणातून पायवाट होती अगदी अंगणाच्या मधोमध. अंगण या पायवाटेने दुभागले होते. दोन्ही बाजूला हिरवाई आणि मध्ये पाऊल वाट जी कट्टयाशी येऊन थांबायची. घराच्या समोर जवळ जवळ बारा बाय बाराचा दगड, माती मुरूम टाकून ठोकून ठाकून गुळगुळीत केलेला, सडा सारवण केलेला सुरेख कट्टा अन मग घर अशी रचना होती. अंगणातून घराकडे येताना दगडी पायऱ्या, नंतर कट्टा आणि मग घरासमोर एक पायरी व मग प्रवेश असे स्वरूप होते. हिरवाईत लपलेल्या एखाद्या चित्रातल्या कौलारू घरासारखेच आमचे घर होते त्यामुळं रस्त्यावरून येणाऱ्या जाण्याऱ्या लोकांना ते आकर्षित करायचे. भलं मोठं अंगण, त्याला काट्यांचे कुंपण, भली मोठी वेगवेगळी झाडं, फुले, वेली, भाज्या, गवत आणि भिरभिरणारी विविध रंगी फुलपाखरे!पावसाच्या पाण्यावर आमचं अंगण असं हिरवंगार दिसायचं. तर असंच एकदा आईने कुठूनतरी, मला वाटते मामाच्या गल्लीतून गुळभेंडीचे एक मजबूत दोन हात लांबीचे खोड आणले. एक छोटासा खड्डा खणून त्यात ते खोड लावलं आणि वर शेणाचा गोळा ठेवला. दररोज थोडं थोडं पाणी घालत राहिलो आणि एक दिवस इवलासा एक अंकुर बाहेर दिसला. लवकरच त्याचे रूपांतर पोपटी छोट्या पानात झाले. मग दुसरा तिसरा असे करत पाठोपाठ अंकूर फुटत राहिले. पावसाळ्यात मग छोट्या छोट्या फांद्या फुटत गेल्या आणि बघता बघता त्याचे उंच रोप झाले. त्या रोपाचं पुढं डेरेदार झाड झालं, बुंधा भक्कम झाला आणि भक्कम दाट सावली पडू लागली. शेतातून लांबून येणारे जाणारे वाटसरू बरेचदा झाडाखाली क्षणभर बसून पुढं जात. पावसात झाडाचा आडोसा घेत. उन्हातान्हाचे भारे घेऊन येणाऱ्या बायका चवळी, उडीद, मुगाच्या वेलींचे, गवताचे भारे झाडाखाली टाकून विश्रांती घेत. चेहऱ्यावर साचलेला घाम पदराने पुसत. तांब्याभर पाणी पीत, थकवा गेल्यावर मग भारा उचलून वाटेला लागत. अशी आईची न रस्त्यावरून येणाजाणाऱ्या बायकांची ओळख झाली. मग त्यातल्याच एकजणीला युक्ती सुचली. आमच्या शेळ्या बघून गावातील परटीन मावशी म्हणाल्या, “ही वज इतक्या लांब डोक्यावरन नेस्तोवर हितच झाडाखाली बसून आम्ही शेंगा तोडून घरी नेतो आणि वेल खातील तुमच्या शेळ्या. ” आईने पण होकार दिला. मग दरवर्षी त्या मावशी अशीच युक्ती करून डोक्यावरील भारा झाडाखाली टाकत. सावलीला बसून शेंगा तोडून भार हलका करून जात. अशा प्रकारे गुळभेंडीने अनोळखी माणसे जवळ आणली. भिकारी आकारी आला तर तिथंच सावलीत बसून आणलेलं सगळं शिळं पाकं मन लावून खायचा, त्याचे जेवून होईतोवर आम्ही त्याचे निरीक्षण करत असू. जेवल्यावर आम्हाला तो पाणी मागायचा पाणी पिऊन वाटेला लागायचा.
गुळभेंडीचा हिरवा आणि पिकला पाला, फुले जनावरे खात. पावसाळ्यात दावणीला चिकचिक झाली की ती जागा वारसांडेपर्यंत म्हस गुळभेंडीला बांधत असू. उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढला की थंडगार सावली म्हणून सावलीत म्हस बांधायची. म्हस बोडून घ्यायची असल्यावर पण तिथेच बांधत असू कारण दावणी जवळ म्हस बोडली की थोडे तरी केस तिथंच राहणार आणि परत जनावरांच्या पोटात जाणार.
कावळ्या- चिमण्यांचे तर हक्काचे झाड होते गुळभेंडीचे. पर्णसंभार जास्त असल्याने पानात लपणे त्यांना सोपे असायचे. बरेचदा कावळे तिथं घरटे बांधायचे. बरेचदा इकडून तिकडून चोचीत काहीतरी घेऊन तिथं फांदीवर बसून निवांत खात राहायचे. त्यावेळी हमखास कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट आठवायची. गुळभेंडीचे किती प्रकार आहेत?मला माहित नाही पण दोन प्रकारची गुळभेंडी मी पाहिली आहे. एक रुंद पानांची आणि एक लांबट हृदयाच्या आकाराच्या पानांची. याचे खोड खरबरीत असते. लाकूड टणक आणि टिकाऊ असते त्यामुळं छपराला मेडकी करायला एकदम उपयोगी.
गुळभेंडीची फुले एकदम पिवळीजर्द आकर्षक असतात. सुकली की ती तांबूस होतात. गुळभेंडीच्या लंबगोल कळ्या आम्ही खेळायला घेत असू. कळीचा लांब देठ तोडून छोट्याश्या देठाला गर्रकन फिरवून गोल गोल भोवऱ्यासारखे फिरवायचो. दुसरी एक मज्जा करायचो. भोवऱ्याचा पाठीमागील देठ हळूच काढून मधला दांडा अलगद उपसायचो, तो ओलसर पिवळा असायचा, त्या रंगांच्या टिकल्या कपाळावर लावायचो. गंधाची बाटली म्हणून त्या भोवऱ्याचा उपयोग करायचो. फुलं गळून गेली की त्यातून फळे येत त्याला टेंभर म्हणतात. ती टेंभरं सुकली की वाऱ्याने खाली पडायची. जनावरानी तुडवून किंवा गाडीखाली येऊन ती चिरडायची आणि त्यातून अंगावर मलमल असलेले चॉकलेटी बी बाहेर निघायचे. ते आकर्षक बी उगीचच वेचत बसायचो. बरेचदा त्या पानांची पिपाणी करून वाजवायचो. असं हे गुळभेंडीचे सर्वांगाने उपयुक्त आणि बहुगुणी झाड आमच्या सवंगड्यासारखंच होतं. त्याच्या घनदाट सावलीत तासनतास मातीत खेळत बसायचो.
परवा वाचनात आलं की गुळभेंडीची पानं, फळं औषधी आहेत. तसेच ते पंचप्लक्ष पैकी एक आहे. (१. वड, २. पिंपळ, ३. पिंपरी, ४. औदुंबर५. पारोसा पिंपळ अर्थात गुळभेंडी. )आणि मला गुळभेंडीने थेट आमच्या अंगणात सोडले. तिथून थेट मामांच्या परड्यात सोडलं. मामांच्या परड्यात तरी गुळभेंडीचा केवढा मोठा विस्तार होता!मामांच्या परड्यात चिंचेची न गुळभेंडीची सावली दिवसभर हटायची नाही त्यामुळं सगळ्यांची जनावरं रात्रंदिवस तिथंच बांधलेली असायची. आजीसुद्धा कायम त्या सावलीत बसलेली असायची. अजूनपर्यंत ते डेरेदार झाड परड्यात होतं. आता मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे संसार आणि गुराढोरासाठी अडचण वाटायला लागल्याने ते तोडले.
आमच्याही अंगणातले कधीच तोडले, हेच की आकर्षक घर बांधायला!
आमच्या आई-वडिलांना शेतीची हौस होती म्हणून त्यांनी रोजगार करत आपलं अंगण शेतासारखं जपलं. अंगणात उगवलेल्या प्रत्येक झाडाला आपलंसं केलं, त्याला हवं तसं मुक्त वाढू दिलं, ते बाभळीचे असो की लिंबाचे, भेदभाव नाही केला की त्यांचा द्वेष सुद्धा. म्हणूनच की काय झाडांचे ते प्रेम माझ्या मनाच्या तळात झिरपत झिरपत गेलं. प्रत्येक झाडाचं ऋण आज मोठं झाल्यावर कळत आहे. ती झाडं तिथं नाहीत पण आठवणी जिथं तिथं सांडलेल्या, त्या मात्र कितीही गोळा केल्या तरी ओंजळ भरत नाही.
रस्त्यावर एखादे गुळभेंडीचे झाड दिसले की म्हणूनच मला किती आनंद होतो म्हणून सांगू!(तुम्ही म्हणणार त्यात काय आनंद होण्यासारख?)पण तुम्हाला कळणार नाहीच माझ्यातलं आणि झाडातलं ते गूढ हळवं नातं!!
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈