सुश्री शीला पतकी
🌸 विविधा 🌸
☆ “गुरुपौर्णिमा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी आपल्या भाषणात सांगितलेले हे वाक्य आहे ” शिक्षकानो लक्षात ठेवा कृष्णाला अष्टमी आहे रामाला नवमी आहे पण गुरूला मात्र पौर्णिमा आहे कारण तो पूर्ण आहे” त्याच्यावर समोरच्या विद्यार्थ्यांची अफाट श्रद्धा असते आणि मग भगवंता इतकीच आपल्यावर श्रद्धा असेल तर आपण परिपूर्ण होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व शिक्षकांनी गुरु पदापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञान वाढवले पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकाराने ते दिले पाहिजे त्याचबरोबर त्याची आई होऊन त्याला संस्कार दिला पाहिजे बाप होऊन त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे तर तो खरा परिपूर्ण शिक्षक
मित्र-मैत्रिणींनो परिपूर्ण कोणीच नसतो भगवंता शिवाय ..!आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय तर आपल्या जवळ जे काही आहे ते ते समोरच्याला पूर्णत्वाने देणे आणि आपल्याजवळ जर काही कमी असेल तर ते पूर्णत्वाला येण्यासाठी सतत घेत राहणे. खरं तर आपला पहिला गुरु आई असते कारण ती आपल्यावर प्रेम करून प्रेमाने सर्व गोष्टी शिकवत असते आणि आपण त्या शिकत असतो पण ती सहज प्रक्रिया असते गुरुकडे जेव्हा तुम्ही शिकायला येता तेंव्हा जाणीवपूर्वक ज्ञान देण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे गुरूला वेगवेगळ्या भूमिकेतून जावे लागते अर्थात शिक्षकाला जर आपण गुरु समजत असू तर त्याला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात हे आधी जाणून घ्या. त्यानंतर तो ज्ञान देतोच माहिती देतो संस्कार पेरतो प्रोत्साहन देतो चुका करायची संधी देतो कारण चुकल्याशिवाय चांगलं शिकता येत नाही. त्या चुका दुरुस्त करतो पाठीशी उभा राहतो आधाराचा हात कुठपर्यंत ठेवायचा आहे त्याला बरोबर कळतं तो उत्तमच समुदेशक असतो… अशा अनेक भूमिका शिक्षकाला कराव्या लागतात फक्त शिकवून चालत नाही प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या असतो त्याला जाणून घेऊन त्याच्यावर काम करावे लागते त्याच्या समग्र कुटुंबाची माहिती घ्यावी लागते त्याची मानसिक अवस्था जाणून घ्यावी लागते त्याची सुख दुःखे जाणून घ्यावी लागतात. त्याच्या कमतरता जाणून घ्याव्या लागतात त्यात नेमकं काय कमी आहे ज्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही हे जाणून घ्यावे लागतं इतकं सगळं शिक्षक करत असतो. तो फक्त मराठी हिंदी त्याच भूगोल शिकवत नाही आणि हे सगळं करता आलं तर तुम्हाला गुरुपद मिळतं हे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही शिक्षक असता फक्त! अभ्यासाच्या गोष्टीचीच दखल घेणे इतकं काम शिक्षकाचा नसतं तर जीवनामध्ये त्याला काय अडचणी येतात आणि त्या त्यांनी कशा सोडवाव्या हे नकळत त्याला सांगावे लागते त्याच्या कमतरतांची जाणीव त्याच्या भावना न दुखावता करून द्यावी लागते हे सगळे शिक्षक का करू शकतो तर विद्यार्थ्याचे त्याच्याकडे शिकण्याचे जे वय असते ते कच्चे असते अद्यात त्याचा स्वतःचा विचार नसतो. जे आवडतं त्याच्यावरती तो भाळतो शिक्षक आवडले की त्याच्यावरती तो प्रेम करायला लागतो ते सांगतील ते त्याला करावसं वाटतं त्यांच्यासाठी काय पण.. ही वृत्ती निर्माण होते …मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेत जे आपल्या शिक्षकावरती विलक्षण प्रेम करतात. … माझी एक विद्यार्थिनी होती तिला माझ्याबद्दल विलक्षण आकर्षण होतं. बाईने आपल्याला काम सांगावं.. बाईंच्या समोर आपण सतत राहावं.. बाईनी आपल्याला प्रश्न विचारावेत.. असं तिला नेहमी वाटत राहायचं ती आसपास घोटाळत राहायची तीला मी गणित विषय शिकवत होते त्यामध्ये साधारणपणे वर्गात विसाव्या नंबर पर्यंत तिचा नंबर असायचा पण मी जसं तिला वर्गात शिकवायला लागले तसं तिने माझ्यासाठी जोमान अभ्यास सुरू केला आणि मी वर्गात एकदा पेपर वाटण्यापूर्वी मुलींना विचारले होते कोणाला खात्री आहे की या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील …पाच सहा विद्यार्थ्यांनी हात वर केला त्यात भीत भीत तीने हात वर केला सगळ्या मुली हसल्या कारण तिला आजवर तेवढे मार्क कधी पडले नव्हते आणि मी पेपर वाटले कमाल म्हणजे तिला एकटीला 30 पैकी 30 मार्क पडले होते सगळ्या मुली या चमत्काराने आश्चर्यचकित झाल्या कारण एकच होतं बाईंसाठी केलेला अभ्यास तोपर्यंत मलाही हे ठाऊक नव्हतं की ती माझ्यावरती एवढं प्रेम करते आज ती विद्यार्थिनी साठ वर्षापेक्षा अधिक आहे पण पुढे सातत्याने हा अभ्यास तीने टिकवला आणि मराठी विषयात विद्यापीठात पहिली आली एम ए झाली आपल्या राहत्या गावात संत चिंतन हे एक चॅनेल चालवत आहे आणि ती आजही कृतज्ञतेने मला सांगते बाई मी तुमच्यामुळे एवढी पुढे गेले किंवा तुमच्यामुळे माझ्यात हा बदल घडून आला खर तर मी काहीच केलं नाही फक्त पाठीवरती हात ठेवला…!
विद्यार्थ्यांची तुमच्यावर एवढी श्रद्धा असते की तुम्ही सांगाल ते प्रमाण वाक्य..! माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी आठवीमध्ये होती तेव्हा ती घरी जेवत नसे मधल्या सुट्टीत डबा नाही तिचे पालक येऊन मला भेटले आणि म्हणाले बाई खूप अभ्यासू हुशार आहे पण खात पीतच नाही सगळ्या डॉक्टराना दाखवून झाले पण काही उपयोग होत नाही खूप कृश होती मग मी तिला बोलावले आणि चौकशी केली आणि तिला सांगितलं की उद्यापासून डबा आणायचा व्यवस्थित डबा असला पाहिजे तो मैत्रिणींबरोबर बसून खायचा डब्यातला पहिला घास मी घेणार मला रोज डबा दाखवायचा आणि तो संपलेला ही मला दाखवायचा एका ग्रुप वर ही जबाबदारीच टाकून दिली मी .मुली काय बाईने काम दिले म्हणजे चोख बजावणार दुसऱ्या दिवशीपासून तिने डबा आणायला सुरुवात केली मी एक घास घ्यायचा मग ती मुलींच्या घोळक्यात बसून डबा खायची आणि हळूहळू रोज ती डबा व्यवस्थित खायला लागली. तिची तब्येत पुढे चांगली झाली पुढे ती इंजिनियर झाली
तिचे लग्न झाले तिच्या लग्नात तिच्या आई-वडिलांनी मला मुद्दाम घरी येऊन निमंत्रण केले होते आणि मी लग्नाला गेल्यानंतर भर मांडवात त्यांनी माझ्या हातात एक चार थाळी भरलेला डबा जावई आणि मुलींच्या हस्ते मला दिला आणि जावईबापूंना सांगितले की बाईंमुळे आमची मुलगी जेवायला शिकली त्यामुळे आज तुम्हाला सुदृढ पत्नी मिळत आहे …आहे की नाही गंमत किती छोटी गोष्ट ही काय अभ्यासात नाहीये पण तिच्या आयुष्यासाठी ती अतिशय गरजेची होती आणि हे शिक्षकाला करावे लागते!
विद्यार्थ्याला प्रोत्साहन वेळेवर मिळाले नाही तर त्याचे काय होते याची एक गोष्ट आहे एक मोठा चित्रकार गावात आला आणि त्याने आपला कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये भरवला चित्र कलेचे मार्गदर्शन केले त्यांची चित्रे फारच सुंदर होती त्यानंतर एक आजोबा त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी काही चित्र त्यांना दाखवली एक अ संच होता अन एक ब संच होता चित्रकार म्हणाले अ संचातील चित्रे चांगली आहेत हा मुलगा खरं म्हणजे खूप मोठा चित्रकार होईल त्याला जरूर आपण चित्रकलेची जाणीव करून द्या आणि शिकवा ब संचातील चित्र जी आहेत ती मात्र अगदी टुकार आहे त्याने चित्रकला न शिकलेलीच बरी आजोबांना त्यांनी कुतूहल्याने विचारले कोणाची चित्रं आहेत तुमच्या नातवाची आहेत का? आजोबांनी उत्तर दिले नाही नाही अ संच जो आहे तो माझाच आहे पण मला शाळेत प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे माझ्यातली कला वाढली नाही सुधारली नाही आणि ब संच्यातली चित्र आत्ता मी काढतोय ती आहेत तिची अवस्था अशी झाली आहे शाळेत मला वेळेवर प्रोत्साहन मिळाले असते तर कदाचित मीही आज तुमच्या जवळपास असलो असतो आजोबांच्या हातात असलेली चित्रकलेची कला केवळ प्रोत्साहन न मिळाल्यामुळे बहरू शकली नाही तेव्हा केवळ प्रोत्साहनने सुद्धा विद्यार्थी खूप काही काम करतात आणि ही किमया म्हणजेच पाठीवर हात ठेवणे.आदरणीय कुसुमाग्रजानी म्हंटले तेअगदी खरे आहे त्यांचा कणा ताठ राहील अशी शिकवण देणे हे गुरुचे काम आहे आणि मग विद्यार्थी आपोआपच म्हणतो पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा
विद्यार्थी हा सुरुवातीला गुरुचे अनुकरण करत असतो आणि मग सुरुवात होते अनुकरणापासून अनुसरणापर्यंत! आपल्या पद्धतीने त्यांनी राहावं हा भाग वेगळा पण आपल्या पद्धतीने विचार करून आत्मविश्वासाने जगावे म्हणजे तुमचे अनुसरण करावे असे वाटत असेल तर शिक्षकाला फार सतर्कपणे वागावे लागते आणि आपल्या विद्यार्थ्यांसमोर खऱ्या अर्थाने आदर्श उभे करावे लागतात.आपल्या वर्तनातून! आत्ताच्या विद्यार्थ्यांना पुस्तकातले शिकवलेले आदर्श फारसे पटत नाहीत पण समोर दिसणाऱ्या गोष्टी वरती मात्र त्याचा खूप विश्वास असतो आणि त्यातली पहिली व्यक्ती असते त्यांचे शिक्षक म्हणून शिक्षकांवर जबाबदारी आहे आपले वर्तन आपले विचार हे कोणीतरी अनुसरणार आहेत हे लक्षात ठेवून समाजात वागत राहा तर तुम्हाला गुरु पद मिळेल ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतःकरणात असेल त्यासाठी त्यांचे फोन यावे लागतात मेसेजेस यायला लागतात असं अजिबात नाही भेटलेल्या प्रत्येक क्षणाला ते झटकन आपलं मस्तक तुमच्या पायावरती ठेवतात कारण आपण त्यांच श्रद्धास्थान असतो अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवणारे असंख्य शिक्षक महाराष्ट्रात आहेत आम्हालाही ज्यांनी या पद्धतीने घडवलं त्यांचे आदर्श आमच्यासाठी मार्गदर्शक ठरले त्या असंख्य गुरूंना आजच्या दिवशी मनःपूर्वक नमन!
वाचक हो हा लेख वाचल्यानंतर आपल्यालाही आपल्या शिक्षकाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनाच मनोमन नमस्कार करा आणि आजची गुरुपौर्णिमा साजरी करा सर्वांना पुनश्च एकदा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈