सौ. ज्योती कुळकर्णी
🌸 विविधा 🌸
☆ गीतेतील मोक्ष कल्पना… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
गीता जयंतीच्या निमित्ताने थोडेसे चिंतन…
रंगबिरंगी नवरसांनी भरलेल्या जीवनात सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग येतात. ते चाकाच्या आऱ्या प्रमाणे निरंतर खाली वर फिरत असतात. कधी कधी तर काय करणे श्रेयस्कर होईल हे ठरवणे अवघड असते. अशा वेळी मार्गदर्शक ठरणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीता. गीतेचे महत्त्व सांगणारा एक सुंदर श्लोक आठवतो….
“सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:|
पार्थो वत्स:सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतम् महत्||”
अशी ही गीता केवळ मृत्यू नंतरच्याच मोक्षाचा मार्ग दाखविते असे नाही तर जगताना येणाऱ्या प्रश्नांमधून मिळणाऱ्या मोक्षाचा मार्गही दाखविते. अर्जुनाला कृष्णाने दाखविला त्याप्रमाणे.
मोक्ष म्हणजे मुक्ती. आपल्या धर्मात पुनर्जन्माचा सिद्धांत मांडला आहे. म्हणजे पूर्वीच्या जन्माच्या कर्मानुसार या जन्मात फळ मिळते व पुन्हा पुन्हा जन्मही मिळत राहतो. या कर्मबंधनातून सुटका पाहिजे असल्यास या जन्मात कर्माचे बंधन लागणार नाही असे कर्म करायला हवे. ते कसे असावे? याचा मार्ग गीतेत सांगितला आहे.
गीतेवर अनेक टीकाकारांनी निरनिराळा अर्थ लावून टीका सांगितली आहे. त्यात प्रामुख्याने शंकराचार्यांनी लिहिलेल्या गीता टिकेत गीतेत प्रामुख्याने ज्ञानयोग सांगितला आहे असे मत मांडले आहे. म्हणजेच आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच पिंडी तेच ब्रम्हांडी असल्याचे ज्ञान झाले की मग कर्म संन्यास घेतला की मगच मोक्ष मिळतो. म्हणजेच आत्मा परमात्म्यात विलीन होऊन मोक्ष मिळतो म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मत मांडले आहे.
तर भक्ती मार्ग हेच भगवंतापर्यंत जाण्याचे अत्यंत सुलभ साधन आहे म्हणून गीतेतील मुख्य प्रतिपाद्य विषय भक्तीयोग हा आहे हे सांगणारा आहे एक पंथ आहे. हा भक्तिमार्ग अतिशय उत्कृष्ट आणि रसाळ वाणी व सुंदर दृष्टांतांनी फुलवून सांगणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी.
त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी या दोन्ही ग्रंथांचा आधार घेऊनच पुढची वाट चोखाळली आहे. त्यांच्या मते युद्धभूमीवर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवल्यानंतर त्याला केवळ युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठीच भगवान कृष्णांनी गीता सांगितली आहे. त्याअर्थी गीतेचा प्रतिपाद्य विषय कर्मयोग हाच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या ग्रंथाला कर्मयोगशास्त्र अथवा गीता रहस्य असे नाव दिले आहे.
प्रत्येकाने आपापल्या काळात समाजाची गरज ओळखून व जे ठासून सांगण्याची गरज आहे ते ओळखून गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय कोणता आहे ते मांडले आहे असे मला वाटते.
शंकराचार्यांना त्यांच्या काळात समाजाला ज्ञानयोग सांगण्याची म्हणजेच ब्रह्मसत्य जगत् मिथ्या हे सांगण्याची मुख्यत्वे करून गरज वाटली. म्हणून त्यांनी समाजमान्य असलेल्या गीता या ग्रंथाचा आधार घेऊनच ज्ञानयोग सांगितला.
ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात कर्मकांडाचे अतिशय स्तोम माजले होते व त्यापायी समाजातील माणुसकीच नष्ट झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले. व
“अद्वेष्टा सर्व भुतानाम् मैत्र: करुण एव च |
निर्ममो निरहंकार: समदुःखसुख:क्षमी||”
याप्रमाणे कोणाचा द्वेष न करणारा व सर्व प्राणिमात्रांशी मित्र भावाने वागणारा असा भक्तच भगवंताला प्रिय असतो हा उपदेश करणे त्यांना आवश्यक वाटले. म्हणून त्यांनी गीतेवर प्रवचन करताना भक्तियोगाचे महत्त्व जनसमुदायाला पटवून सांगितले.
लोकमान्य टिळकांना वाटत होते की आपण पूर्वी मोगलाईत अत्याचार सहन केले. आता ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहोत व इकडे लोकांची प्रवृत्ती तर ईश्वराची इच्छा होईल तसे घडेल अशी आहे. अशा वेळी त्यांचा जो गीतेचा सखोल अभ्यास होता त्यावरून त्यांनी प्रकर्षाने मांडले की गीता अर्जुनाला शस्त्र हाती घेण्यासाठीच सांगितली आहे. तेव्हा गीतेत प्रामुख्याने कर्मयोग सांगितला आहे. त्या काळात, स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचीच आवश्यकता आहे आणि आपल्या मुख्य धर्मग्रंथातही तेच सांगितले आहे असे मत मांडले.
आपल्या तत्त्वज्ञानात मोक्षप्राप्तीसाठी निवृत्ती मार्ग व प्रवृत्ती मार्ग चोखाळावे असे निरनिराळ्या तत्त्वज्ञांनी मांडलेल्या मतातून दिसून येते.
निवृत्ती मार्ग म्हणजे संसाराचा त्याग करून संन्यास घ्यायचा व कर्म संन्यासच घेऊन तपश्चर्येला बसावयाचे. कर्म जळून खाक होतील तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल हे मत. पण एक असाही मतप्रवाह आहे की पूर्ण कर्मे कोणाला सुटूच शकत नाहीत. जीव जगवायला खावे लागणार. खाणे मिळण्यासाठी कमीत कमी का होईना परंतु कर्मे करणे आवश्यकच आहेत. संन्याशाची पण एक कुटी असतेच.
प्रवृत्ती पर मार्ग म्हणजे कर्म करावयाची पण निष्काम भावनेने करायचे. भगवंतांनी गीतेत म्हटलेच आहे…
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोsस्त्व कर्मणि”
भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की केवळ कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. फळ मिळणे तुझ्या अधिकारातच नाही. म्हणून तू फलाशा मनात धरून कर्म करूच नकोस. फलाशा न धरता कर्म केले तर कर्माचे बंधन न लागता मोक्ष मिळतो.
ज्याप्रमाणे कर्म करण्यापासून मनुष्य मुक्त होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सामान्य माणूस फलाशेपासून तरी मुक्त होऊ शकतो का? आपल्या मनात अनेक गोष्टींची तीव्र इच्छा असते. ती मनात धरूनच आपण आपल्या कामांची आखणी करतो. संपूर्णपणे वैराग्य आपल्यासारख्या सामान्यांना येऊच शकत नाही.
निष्काम कर्माचे महत्त्व सांगताना आचार्य विनोबांनी गीता प्रवचने मध्ये खूप सुंदर उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की लहान मूल खेळण्याची क्रिया करते त्यातून त्याला फक्त आनंद मिळतो. कुठलाही हेतू मनात ठेवून तो खेळत नाही. पण खेळण्याच्या व्यायामातून प्रकृती चांगली राहणे हे फळ त्याला आपोआप मिळते. त्याप्रमाणेच बालकाचे निरागस मन घेऊन आपण कर्म केले तर त्याचे चांगले फळ फलाशा मनात न धरता ही आपल्याला मिळतेच.
असेच आणखी एक उदाहरण! एक मानसशास्त्रज्ञ अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी समुपदेशन करताना विद्यार्थ्यांना ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हाच श्लोक सांगायचे. आणि म्हणायचे की अभ्यासानंतरच्या निकालात अमुक मार्क्स मिळतील याचाच विचार करशील तर निकालाच्या विचारांवरच तुझे मन केंद्रित होईल व अभ्यासावरून मात्र उडेल म्हणून तू चांगला अभ्यास कसा करायचा याचाच फक्त विचार कर. निष्काम कर्मयोगाचे महत्त्व या उदाहरणावरून लक्षात येते. रोजच्या जीवनात कर्मबंधनाची मुक्तता हीच नाही का?
आता इथे प्रश्न निर्माण होतो की कृष्णाला फक्त अर्जुनाला युद्ध करताच प्रवृत्त करायचे होते तर “अर्जुना फालतूपणा करू नकोस चल उठ धनुष्य हातात घे” एवढे जरी कृष्णांनी म्हटले असते तरी अर्जुनाने शस्त्र हातात घेतले असते. पण तो अर्जुन होता. श्रीकृष्णाची आज्ञा त्याने पाळली असती तरी मनापासून लढला नसता. कारण आपल्याच आप्तांना व वडीलधाऱ्यांना कसे मारू? ही शंका त्याच्या मनात होतीच. त्यासाठी भगवंतांना ज्ञान- भक्ती- कर्म ;या सर्वांचीच चर्चा करणे आवश्यक वाटले. अर्जुन एक एक शंका विचारत गेला. त्याचे निरसन करता करता प्रत्यक्ष भगवंताने ‘परिजनाला मारलेस तरी तू कर्तव्य कर्मच करतो आहेस म्हणून तू मोक्षालाच जाशील’ असे अर्जुनाला सांगितले.
सर्वप्रथमच आप्तांना समोर बघून यांना मारून स्वर्गाचे राज्य हे मला नको असे अर्जुन सांगतो. त्यावेळी आत्मा अमर असून तो फक्त हे शरीर मारणार आहेस. आत्मा कशानेही मारल्या जाऊ शकत नाही. हे कृष्णाने सांगितले व जन्म घेणाऱ्याला मृत्यू व मृत्यूनंतर पुन्हा जन्म निश्चित आहे. म्हणून तू त्याचा शोक करू नकोस. असे सांगितले आहे.
तरीदेखील अर्जुन तयार होत नाही त्यावेळी भगवान सांगतात;
“यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्||”
या श्लोकातून भगवान सांगतात की जेव्हा जेव्हा अनाचार माजतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. आताही हे आप्त असले व वंदनीय असले तरी ते अविवेकाने वागले आहेत. व आता तू माघार घेतलीस तर दुसऱ्यांवर अन्याय केला तरी काही कोणाचे बिघडत नाही. असे विचार समाजात प्रसार पावतील. थोडक्यात म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो असेच जणू भगवंतांना म्हणायचे होते. म्हणून ते अर्जुनाला सांगतात तू युद्धासाठी उभा राहा. तू क्षत्रिय आहेस म्हणून अन्यायाचे परिमार्जन करण्यास तुला स्थिर बुद्धीने तुझ्या क्षत्रिय धर्माला जागून युद्ध करावयाचे आहे स्थितप्रज्ञ बुद्धीने, म्हणजेच कुठलाही दुष्टभाव मनात न ठेवता सगळ्यांना सारखे मानून लढलास तर त्याचे पाप तुला लागणार नाही. “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय: ” असे कृष्ण वारंवार अर्जुनाला सांगतात.
आणि हे आत्म्याबद्दलच्या मी सांगितलेल्या ज्ञानामधूनही निष्काम कर्मयोगामधूनही तुला हे समजत नसेल तर तू माझा खरा भक्त आहेस म्हणून मला फक्त शरण ये आणि मी सांगतो त्यावर विश्वास ठेवून युद्ध करता उठ. कारण तुझ्याकरता योग्य तेच मी सांगतो आहे. परंतु तुझा कर्माबद्दलचा मोह नष्ट होऊ देऊन मगच मला शरण ये. ज्ञानानंतर स्थितप्रज्ञ होऊन तथा मला शरण येऊन केलेल्या या युद्धरूपी कर्तव्य कर्माने अखेरीस तुला मोक्षच मिळेल.
व्यवहारातही वडीलधारे पुष्कळदा समजावून सांगतात. तरीही न ऐकल्यास मोठ्यांना जीवनाचा अनुभव असतो. त्या आधारावर ते आपल्या मुलांना निश्चयाने सांगतात, ‘मी सांगतो तसे कर’. बहुतांश वेळा मुलांना त्याचा फायदाच होतो.
तसेच आपल्या मनात खूप गोष्टींचा संभ्रम निर्माण होतो त्यावेळी व. पु. काळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण अर्जुनच असतो. त्यावेळी कृष्णही आपल्यालाच व्हावे लागते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला कृष्णाच्या रूपात कोणी भेटेलच असे थोडीच असते! आपण आपले कृष्ण होतो त्यावेळी गीतेचा कुठलाही अध्याय मराठीतून वाचायला घेतला तरी काही ना काही मार्गही सापडतोच. व समोरच्या संकटातून मुक्ती पण मिळवता येते. म्हणजेच संकटातून मार्ग शोधता येतो. कृष्णाने ज्ञान -कर्म -भक्ती मधून सांगितलेली मोक्ष कल्पना मांडण्याची माझी योग्यता पण नाही. तेवढे माझे ज्ञान पण नाही. पण आजच्या गीता जयंतीच्या दिवशी केलेला तोकडा प्रयत्न गोड मानून घ्यावा.
सर्वांना नमस्कार व धन्यवाद!
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈