सौ शालिनी जोशी
☆ गीता जशी समजली तशी… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी ☆
गीतेचा पहिला श्लोक आणि शेवटचा श्लोक यांची संगती…
गीता हा चार पात्रांमधील संवाद ! धृतराष्ट्र, संजय, अर्जुन, आणि श्रीकृष्ण. गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने आणि शेवट संजय याच्या उत्तराने. त्यामुळे यातील संगतीचा विचार महत्त्वाचा ठरतो.
धृतराष्ट्र बहि:चक्षुनी आंधळा आहेच पण, पुत्र प्रेमामुळे अंत:चक्षुनेही अंध आहे. त्याला युद्धाचे वर्णन सांगणार संजय हा धृतराष्ट्राचा एकनिष्ठ सेवक व सारथी. त्याला व्यासांनी दिव्यदृष्टी दिली होती. तो व्यासांचा शिष्य होता. राजमहालात आपल्या स्वामींच्या पायाशी बसून रणांगणावरील युद्धाचे वर्णन सांगण्यासाठी त्याची योजना. अर्जुन पंडूपुत्र श्रेष्ठ धनुर्धर आणि श्रीकृष्ण त्याच्या रथाचा सारथी तसेच अर्जुनाचा मित्र, सखा, बंधू, प्रत्यक्ष परमात्मा.
गीतेचा पहिला श्लोक म्हणजे धृतराष्ट्राने संजयाला विचारलेला प्रश्न. धृतराष्ट्र उवाच,
“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव:l
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जयll” (१/१)
हे संजया, धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या व पंडूच्या पुत्रांनी काय केले? गीतेत हा एकमेव श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. आणि तो त्याचा स्वभाव, इच्छा व्यक्त करायला पुरेसा आहे. पुत्रप्रेमात गुंतलेला धृतराष्ट्र त्यांच्या जयाची वार्ता ऐकायला उत्सुक आहे. भिष्म, द्रोण, कर्ण दुर्योधनाच्या बाजूला आणि सैन्यही पांडवांच्या सैन्यापेक्षा दीडपट. त्यामुळे कौरवच युद्ध जिंकणार असे वाटत आहे. ‘ मामका:’ हा शब्दच आपल्या मुलांचे प्रेम आणि पंडूचे मुलगे असा परकेपणा निर्माण करतात. हे युद्ध होणारच. पण निर्णय ऐकायला तो उत्सुक आहे. बाहेरून शांत पण अंतस्थ तणावग्रस्त असे व्यक्तिमत्व.
गीतेत पुढे संजयाने केलेले युद्धाच्या तयारीचे वर्णन, अर्जुनाला झालेला मोह, त्याचा युद्ध न करण्याचा निश्चय, कृष्णाने त्याचे केलेले मतपरिवर्तन, त्यासाठी सांगितलेले तीन योग, स्वधर्माची- स्वकर्माची जाणीव, आत्म्याचे अविनाशित्व इत्यादी उपदेशाने अर्जुनाचा मोह दूर होऊन त्याचे युद्ध करायला तयार होणे हे विषय येतात. हे सर्व तत्त्वज्ञान ऐकून संजयाला आत्मिक आनंद मिळाला होता. धृतराष्ट्राच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी संजय याची. युद्धभूमीवर पांडवांचा जय होणार याची खात्री संजयाला आहे. पण तसे सांगितले तर आपल्या स्वामींना रुचणार नाही आणि खोटे बोलावे तर आपल्या मनाला पटणार नाही. म्हणून मोठे खुबीदार उत्तर मोठ्या चतुर्याने, आडपडद्याने संजय देतो. प्रत्यक्ष तोंडाने कौरवांचा पराजय होईल असे न सांगता,
” यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर :l
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममll ” (१८/७८)
जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ तेथे श्री, विजय, भूती आणि निती असे माझे निश्चित मत आहे. प्रत्यक्ष युद्ध घडायच्या आधीच आपले मत सांगून संजय मोकळा झाला. एक सर्वत्र, सर्व काळी योग्य असे सत्य त्याने सांगितले. श्रीकृष्ण स्वतः योगेश्वर सर्व योग जाणणारे आणि तसा मार्ग दाखवणारे, तत्त्वज्ञानी, सर्वज्ञ आणि त्यांना साथ पार्थ म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणारा, धनुर्धारी अर्जुन. म्हणजेच बुद्धीला ज्यावेळी पराक्रमाची जोड मिळते तेव्हाच विजय आणि वैभव प्राप्त होते. जे दुर्योधनाकडे नव्हते. त्यामुळे अर्जुन म्हणजे त्याचा भाऊ युधिष्ठिर जिंकणार आणि त्याला सर्व वैभव प्राप्त होणार. असे आपले ठाम मत सांगण्याचे धैर्य संजयला प्राप्त झाले, ते श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेले बोधामृत ऐकून. अशा प्रकारे पहिल्या आणि शेवटच्या श्लोकाची संगती. म्हणून गीता ही संजयाच्या भावाने ऐकण्यासाठी, अर्जुनाच्या भूमिकेतून आचरण्यासाठी आणि श्रीकृष्ण बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि आंधळ पुत्र प्रेम नसावं हे दाखवण्यासाठी आहे. श्रीकृष्ण म्हणजे तत्वज्ञान आणि अर्जुन म्हणजे कर्म यांची सांगड आहे.
हे युद्ध एकाच कुटुंबातील दोन भावांच्या मुलांमध्ये, दोन वृत्तीं मधील आहे. आसूरी आणि दैवी. तेव्हा असुरी वृत्ती कडून दैवी वृत्तीकडे वाटचाल करणे महत्त्वाचे. आपल्यामध्येही दोन्ही प्रकारचे गुण असतात. शरीराच्या रणांगणावर लढाईसाठी एकत्र आलेले. तेव्हा अंत:करणातील श्रीकृष्णाचे स्मरण करून अर्जुन रूपाने साधना करावी आणि दुर्गुणांवरती विजय मिळवावा.
गीतेची सुरुवात ‘धर्म’ या शब्दाने आणि शेवट ‘मम’ या शब्दाने म्हणून ‘धर्ममम ‘ म्हणजे माझा धर्म. म्हणजेच स्वधर्म- स्वकर्तव्य सांगणारी गीता. त्याचे आचरण हेच गीतेचे सार. अशा आचरणाने कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र करता येते. कुरु म्हणजे कर आणि क्षेत्र म्हणजे शरीर. धर्माधिष्ठित विहित कार्याला शरीर लावणे म्हणजेच कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र करणे. पलायनवाद सोडून समर्थपणे प्रसंगाला तोंड द्यायला शिकवणे हेच गीतेचे वैशिष्ट्य. दुर्गुणावर सद्गुणांचा हा विजय. त्यासाठी गरज बुद्धीची आणि साधनेची मग सुखच सुख. हे जाणणे हीच गीतेच्या पहिल्या व शेवटच्या श्लोकाची संगती.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈