सौ शालिनी जोशी

 

☆ गीता जशी समजली तशी… – गीतेचे वैशिष्ट्य – भाग – ३ ☆ सौ शालिनी जोशी

गीतेचे वैशिष्ट्य

पारंपारिक शब्दाना नवीन अर्थ देणे हे गीतेचे एक विशिष्ट्य आहे.

१) धर्म — येथे धर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्म असा अर्थ नाही. यांना धर्म पेक्षा संप्रदाय म्हणणे योग्य. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.’धृ- धारयति इति धर्म:l’ धर्म म्हणजे समाजाची तर धारणा करणारा विचार किंवा कर्म . धर्म म्हणजे मार्ग किंवा सहज स्वभाव किंवा कायदा, नियम. तसेच धर्म म्हणजे कर्तव्य. तोच अर्थ गीतेला अपेक्षित आहे. त्यालाच गीता स्वधर्म म्हणते. प्रत्येक माणसाचा त्या त्या वेळचा स्वधर्म असतो. त्या त्यावेळी तो करणे कर्तव्य असते. उदाहरणार्थ पित्रुधर्म, क्षत्रिय धर्म, या दृष्टीने आई-वडिलांचे सेवा करणे हा मुलांचा तर मुलांचे पालन करणे त्यावेळेचा आईचा धर्म असतो.आणि राष्ट्रप्रेम हा प्रत्येक नागरिकाचा धर्म.प्रजा रक्षण हा अर्जुन क्षत्रिय होता म्हणून त्याचा धर्म होता. म्हणून गीतेच्या दृष्टीने स्वतःचे कर्तव्य म्हणजेच स्वधर्म .

२) यज्ञ– यज्ञ म्हटले की समोर येते आणि कुंड, तूप, समिधा इत्यादी साहित्य आणि हवन, स्वाहाकार अशा क्रिया. पण गीतेच्या दृष्टीने ममता व आसक्ती रहित असलेले, सर्व काळी सर्वांच्या कल्याणासाठी केलेले कर्म हाच यज्ञ. ‘इदं न मम’ या भावनेने केलेले कर्म हाच यज्ञ. यज्ञात आहुती देताना त्याच्यावरचा हक्क सोडून ते देवतेला अर्पण केले जाते. कर्माचे बाबतीत आसक्ती व ममता सोडून ईश्वरार्पण बुद्धीने केकेले कर्म हाच यज्ञ. मग अन्नपदार्थाबाबत अनासक्तीने केलेले अन्नग्रहण हे यज्ञ कर्मच, ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’.असा हा निस्वार्थ कार्याला प्रतिष्ठा मिळवून देणारा यज्ञ.

३) पुजा– येथे पुजेसाठी हळद-कुंकू, फुले, निरांजन, नैवेद्य, पाणी कशाचीच गरज नाही. ही पूजा स्वकर्मानी करायची आहे. गीता म्हणते, ‘स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानव:l ‘शास्त्रविधिने नेमून दिलेले कर्म कर्ता भाव सोडून भगवंताला अर्पण करणे म्हणजेच कर्माने भगवंताची पूजा करणे.म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात तुझ्या सर्व क्रिया, खाणे, दान, तप सर्व कर्तुत्वभाव सोडून माझ्यासाठी कर. हीच पूजा, येथे पान, फुल, फळ कशाची गरज नाही. अशी ही शुद्ध कर्माने केलेली पूजा गीतेला अपेक्षित आहे. कर्म हे साध्य नसून ईश्वराची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याचे साधन आहे. ईश्वरावर जो प्रेम करतो त्याची सर्व कर्मे पुजारूपच होतात.

४) संन्यास — गीता म्हणते, ‘ज्ञेय:स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षतिl’ जो कोणाचा द्वेष करत नाही, कशाची इच्छा करीत नाही तो नित्य संन्याशीच जाणावा. म्हणजे गीतेला अपेक्षित असलेल्या संन्यास हा घरदार सोडून वनात जाण्याचा आश्रम संन्यास किंवा भगवी वस्त्रे घालून यज्ञादि कर्माचा त्याग करण्याचा नाही. हा वृत्ती संन्यास आहे. त्यासाठी वासना कामनांचा, फलाशेचा त्याग अपेक्षित आहे. निष्क्रिय होणे नाही. हा बुद्धीत आहे. कर्म सोडणे या बाह्यक्रियेत नाही. गीतेचा संन्यास हा कर्माचा नसून मी, माझे पणाचा आहे. कर्तुत्वमद आणि फलेच्छा टाकण्याचा आहे. असा संन्यासी लोकसंग्रहासाठी कार्य करतो. घरात राहूनही हा साधणे शक्य आहे.

५) अव्यभिचारी भक्ती– भक्ती म्हणजे भगवंताविषयी प्रेम, त्याची पूजा, नामस्मरण, प्रदक्षिणा करणे एवढा मर्यादित अर्थ नाही. ही भक्ती स्थळ, काळ, प्रकार यांनी मर्यादित आहे. ती संपते व सुरू होते. स्वकर्म आणि कर्मफळ त्या सर्वात्मकाला अर्पण करणे हीच भक्ती. विश्वाच्या रूपाने श्रीहरीच नटला आहे हे जाणून आपल्या सकट सर्व ठिकाणी त्याला पाहणे हेच अव्यभिचारी भक्ती. तेव्हा प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत भगवंत आहे हा अभेदभाव पटला की प्रत्येक व्यवहार हा भगवंताशीच होतो.’ जे जे देखे भूतl ते ते भगवंत’l हा भाव हीच ईश्वर भक्ती. अशा प्रकारे भक्तीचे व्यापक रूप जे विहितकर्मातून साध्य होते ते गीता दाखवते. प्रत्येकांत देव पाहून केलेला व्यवहार शुद्ध होतो. व्यवहार व भक्ती दोन्ही एकच होतात.

६) अकर्म– व्यवहारात आपण सत्य -असत्य, धर्म -अधर्म या विरोधी अर्थाच्या जोड्या म्हणतो. त्या दृष्टीने कर्म -अकर्म ही जोडी नाही. अकर्म म्हणजे म्हणजे कर्म न करणे नव्हे, तर सामान्य कर्मच यावेळी निरपेक्ष बुद्धीने फलाची अपेक्षा न ठेवता कोणताही स्वार्थ न ठेवता, ईश्वरार्पण पद्धतीने केले जाते.त्यावेळी ते फळ द्यायला शिल्लक राहत नाही. करून न केल्यासारखे होते. त्यालाच अकर्म म्हणतात. म्हणजे इंद्रियांच्या दृष्टीने कर्म होते पण फळाचे दृष्टीने ते अकर्म. कर्माशिवाय माणूस एक क्षणभरही राहू शकत नाही. अशावेळी स्वस्थ बसणे हे ही कर्म होते. म्हणून निष्काम, सात्विक कर्म म्हणजेच अकर्म. थोर लोकांचे कर्म अकर्मच असते. लोकांना ते कर्म करतात असे वाटत असले तरी फलेच्छा व कर्तृत्व भाव नाही आणि लोकहिताचा उद्देश. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने फल रहित बंधरहित क्रिया म्हणून अकर्म.

७) समाधि– गीतेतील समाधी व्यवहारातील समाधी पेक्षा वेगळी आहे. व्यवहारात साधू पुरुषांना गतप्राण झाल्यावर खड्ड्यात पुरतात त्याला समाधी म्हणतात. गीता समाधी सांगते ती कर्म करत असतानाच प्राप्त होते .कर्म होत असतानाही आत्मस्थितीचे समत्व बिघडत नाही. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. तेव्हाची योगस्थिती म्हणजे परमेश्वराशी ऐक्य तीच समाधी. अष्टांग योगातील शेवटची पायरी ही समाधी. अशाप्रकारे नेहमीच्या व्यवहारातील धर्म, यज्ञ, पूजा, संन्यास, समाधी, भक्ती, अकर्म या शब्दाला वेगळे अर्थ देऊन गीतेने क्रांतीच केली आहे. येथे कोणतेही कर्मकांड नाही. श्रद्धा एकमेव परमात्म्यावर. या सर्व क्रिया कोणत्याही भौतिक साधनाशिवाय केवळ कर्मातून साध्य होतात. हे दाखवणे हेच गीतेचे वैशिष्ट्य. १८व्या अध्यायात भगवंत सांगतात, ‘ स्वे स्वे कर्मण्यभिरत:संसिद्धि लभते नर:l’ विहित कर्म तत्परतेने व उत्कृष्टपणे केल्याने साधकाला आत्मसिद्धी प्राप्त होते. अशाप्रकारे गीता हे आचरण शास्त्र आहे. आचरण्याची वेगळी वाट दाखवते.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments