सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक – भाग – ४ ☆ सौ शालिनी जोशी

मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक

गीता हा अर्जुनाला पुढे करून सर्व मानव जातीला केलेला उपदेश आहे. ते आचरण शास्त्र आहे. त्यातील सर्वच श्लोक सारख्याच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यात सरस-निरस ठरवणे कठीण. तरीही ७०० श्लोकातून माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटलेले पाच लोक निवडण्याचा प्रयत्न मी केला. त्यातील पहिला श्लोक म्हणजे उन्नतीचा मंत्रच व स्वावलंबनाचा धडा

 १) उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् l

 आत्मैव ह्यात्मनो बंन्धुरात्मैव रिपुरात्मन:ll(६/५)

माणसाने स्वतः स्वतःचा उद्धार करावा. स्वत:च स्वतःच्या नाशाला कारण होऊ नये. प्रत्येक जण आपणच आपला बंधू (हित करणारा) आणि आपणच आपला शत्रू (अधोगती करणारा )असतो.

यातून लक्षात येते की प्रत्येकाने आपल्यातील दोषांकडे दुर्लक्ष न करता ते घालवण्याचा व सद्गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच बंधू व्हावे. ‘ जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ हेच येथे लक्षात ठेवावे. उच्च स्थितीला पोहोचावे व यशस्वी व्हावे.

अशा प्रकारे स्वतःच्या उद्धारासाठी कर्म करत असताना कोणते पथ्य पाळावे हे सांगणारा दुसरा श्लोक

 २) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l

 मा कर्मफलहेतुर्भूमा ते सङ्गोsस्त्वकर्मणी ll(२/४७)

कर्म करत असताना कर्त्याची भूमिका कशी असावी याची चार सूत्रे येथे सांगितली आहेत. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. कर्मफलाच्या इच्छेने कर्म करणारा होऊ नको. तसेच ते न करण्याच्या आग्रहही नको.

कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. म्हणून स्वधर्माने प्राप्त झालेले कर्म उत्तम प्रकारे आचरावे. पण त्याचे फळ मिळणे आपल्या हातात नसते. फळ मिळणे हा भविष्यकाळ आहे. त्यात रमून वर्तमानातील कर्मावर दुर्लक्ष करू नये. कामातील आनंद घ्यावा. कर्मफल काहीही मिळो, त्याला कारण मी असे समजून कर्तुत्व अभिमान घेऊ नये. येथे अकर्म म्हणजे कर्म न करणे. मी कर्मच करत नाही म्हणजे फळाचा प्रश्न नाही असा विचार करून कर्म त्यागणे अयोग्य आहे.

अशा प्रकारे केलेले कर्म ईश्वरार्पण कसे करावे हे पुढील श्लोकात.

 ३) यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्l

 यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्ll (९/२७)

भगवंत अर्जुनाला सांगतात तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस ते मलाच अर्पण कर. माणसाची कर्मे ही साधारणपणे चार प्रकारची असतात आहार, यज्ञ, दान आणि तप. कर्म अर्पण करणे म्हणजे त्यातील कर्तृत्व भाव अर्पण करणे व फळ प्रसाद रूपाने ग्रहण करणे. यज्ञ म्हणजे फळांचा काही भाग समाजासाठी अर्पण करणे. दान म्हणजे सत्पात्री व्यक्तीला योग्य काळी शक्य ती मदत करणे आणि तप म्हणजे शरीर, मन आणि वाणी यांनी केलेली साधना. या सर्व ज्यावेळी भगवंतासाठी होतात, निस्वार्थ बुद्धीने अपेक्षा रहित होतात, तेव्हा प्रत्येक कर्म म्हणजे त्याची पूजा होते. त्याची प्राप्ती करून देणारे होते. बंध निर्माण होत नाही. अशीही कर्मा मागची खूबी व भक्तीचे व्यापकपण.

अशाप्रकारे कर्म करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे भगवंत सांगतात

 ४) मां हि पार्थ व्यपाश्रित्य येsपि स्यु: पापयोनय: l

 स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेsपि यान्ति परां गतिम् ll(९/३२)

हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी कुणीही असो माझ्या आश्रयाला आले असता परमगतीला प्राप्त होतात. म्हणजे भगवंत प्राप्तीचा अधिकार सर्वांना आहे. तेथे कोणताही भेदभाव नाही. म्हणून सर्व जातीत आणि स्त्रिया सुद्धा संत पदाला पोचल्या. त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. जो त्याच्या आश्रयाला जातो तो त्याचाच होतो. वेदाने जे अधिकार नाकारले ते गीतेने मिळवून दिले. म्हणून शबरी अनन्य भक्तीने मुक्त झाली व वाल्याचा वाल्मिकी झाला. आपणही जातीपातीवरून भेदभाव करू नये. सर्वाभूती परमेश्वर लक्षात घ्यावे.

गीता ग्राह्य व अग्राह्य दोन्ही गोष्टी सांगते. कोणत्या गुणाचा त्याग करावा म्हणजे सत मार्ग सापडतो त्याचे मार्गदर्शन गीता करते.

 ५) त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:l

काम: क्रोधस्तथा लोभस्तादेतत्त्रयं त्यजेत्ll(१६/२२)

काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची द्वारे आहेत. आपला नाश करणारी आहेत. म्हणून या तिघांचा त्याग करावा.

हे तीनही तामसी गुण आहेत. माणसाच्या अधोगतीला कारण होणारे आहेत. मोठे मोठे विद्वानही यांच्या अधीन होऊन आपल्याच अपयशाला कारण झाले. उदाहरणार्थ विश्वामित्र (काम), दुर्वास (क्रोध). अतृप्त इच्छा क्रोधाला जन्म देतात. त्या कामना पूर्ण करण्यासाठी द्रव्यासक्ती निर्माण होते हाच लोभ. त्यासाठी अवैध मार्गाचाही अवलंब केला जातो. परिणामतः नरकासारख्या हीन अवस्थेत राहण्याची वेळ माणसावर येते. म्हणून योग्य वेळीच विवेक व वैराग यांच्या बळावर या तीनही टाळाव्या व मिळेल त्यात सुखी समाधानी राहावे.

अशा प्रकारे स्वतः स्वतःचे हित साधणे. फलेच्छारहित कर्म करणे. ते ईश्वरा अर्पण करणे. असे कर्म कोणीही करू शकतात. मात्र तेथे लोभ नको. हा मार्ग सुख समाधान देणारा. म्हणून मला हे पाच श्लोक आवडले. नित्य आचरणात आणण्यासारखे आहेत.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खूप छान पाच श्लोक निवडलेत ताई.विवरण पण छान.