सौ शालिनी जोशी
☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी ☆
आपले जीवन विरोधी गोष्टींनी युक्त आहे. इथे सुख आहे आणि दुःखही आहे. तसेच राग- द्वेष, लाभ-अलाभ, जय- पराजय, शीत- उष्ण असे द्वैत आहे. यापैकी एक गोष्टच एका वेळी साध्य असते. आपली स्वाभाविक ओढ सुखाकडे. ते हातात आल्यावर निसटून जाईल की काय भीती आणि सुख मिळवण्यासाठी केलेले श्रम दुःखच निर्माण करतात. सुखाचे दुःख कसे होते कळतच नाही. जयाच्या उन्मादात पराजय पुढे ठाकतो. साध्याच्या वाटेवर अडचणी येतात, सध्याचे असाध्य होते. असा हा लपाछपीचा खेळ म्हणजे जीवन. माणूस यातच गुंततो आणि खऱ्या शाश्वत सुखाला मुकतो. अशा वेळी या दोन्ही गोष्टी कशा सांभाळाव्या आणि आनंदी जीवन कसे जगावे याचा उपाय गीता सांगते. तो म्हणजे समत्व,समानता.
सुख म्हणजे इंद्रियांना अनुकूल आणि इंद्रियांना प्रतिकुल ते दुःख. (ख- इंद्रिय). या दोन्हीचा परिणाम मनावर होऊ द्यायचा नाही. मन स्थिर असेल तर बुद्धी ही स्थिर राहते. कार्याविषयी दृढभाव निर्माण होतो. इंद्रियांच्या प्रतिक्रिया नाहीत. हळहळ नाही, हुरळून जाणे नाही. सुखदुःख येवो, यश मिळो अथवा न मिळो अशा विरुद्ध परिस्थितीतही मनाची चलबिचल न होता स्थिर राहणे हेच गीतेत सांगितलेले समत्व. गीता म्हणते,’ सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यतेl’ म्हणजेच ‘सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौl’ अशी ही स्थिती. शीत- उष्ण, शुभ -अशुभ, राग- द्वेष, प्रिय-अप्रिय, निंदा-स्तुती, मान- अपमान असे प्रसंग येतच असतात. कोणतीही वेळ आली तरी जो सुखाने हर्षित होत नाही. दुःखाने खचून जात नाही त्यालाच समत्व साधले. अशा बुद्धीने केलेले कर्म हे निष्काम होते. कर्मातील मनाचा असा समतोलपणा हाच निष्काम कर्मयोग आणि हे ज्याला साधलं तोच श्रेष्ठ भक्त, गुणातीत, जीवनमुक्त.
हेच समत्व वस्तू व प्राणीमात्रांविषयी, सर्व भूतान् विषयी असावे असे गीता सांगते. वस्तू विषयी म्हणजे ‘समलोष्ठाश्मकांचन:’ (६/८)अशी स्थिती. दगड,माती आणि सोन या तीनही विषयी समत्व. माणसाला सोन्याची आसक्ती असते. ती नसणे म्हणजे ‘धनवित्त आम्हा मृत्तिके समान’. असा माणूस अनासक्त असतो. तसेच व्यक्तीविषयी समत्व ही गीता सांगते ‘सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु l साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यतेl(६/९). निरपेक्ष मित्र,उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, हितकारक बंधू, पापी आणि साधू पुरुष यांचे विषयी समभाव असणारा ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाळ यातही समत्व पाहतो. कुणाच्या द्वेष करत नाही. वरवर ते भिन्न दिसले तरी सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे या भावनेने सर्वांचा योग्य आदर करणे हीच समत्वबुद्धी. भगवंत स्वतःही समत्त्वाचे आचरण करतात. ‘समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रिय:l’ ‘सर्व भूतात मी समभावाने व्यापून आहे. मला कोणी अप्रिय नाही आणि प्रिय नाही. हा भेद माझ्या ठिकाणी नाही. आत्मरूपाने मी सर्वांना व्यापून आहे.
सर्व भूतात भगवंत तोच माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात हा सर्व भुतात्मभाव. ‘ जे जे देखे भूत ते ते भगवंत’ मान्य झाली की राग द्वेष कुणाच्या करणार ? सर्वत्र एकच परमात्मा पाहणे हेच समत्व. असे समत्व प्राप्त झाले की दृष्टिच बदलते. गत काळाचा शोक नाही, भविष्याची चिंता नाही. वर्तमानात सर्वांशी समत्वाने व्यवहार. प्राप्त कर्म उत्कृष्टपणे करणे हाच स्वधर्म होतो. शत्रु- मित्र आणि लाभ-अलाभ इत्यादी सर्व भेद स्वार्थापोटी. पण जेथे स्वार्थच नाही तिथे सर्वच समत्व. दोषांची निंदा नाही, गुणांचे स्तुती नाही दोन्ही सारखेच. आपपर भाव नाही. अशीही भेद रहित अवस्था म्हणजे सर्व सुख, मोक्ष.
असा हा जीवनाला आवश्यक विचार गीता सांगते. त्रासदायक गोष्टी टाळून शांत व सुखी जीवनाचा मार्ग दाखवते. अध्यात्माची दृष्टी देते. अर्जुनालाही युद्धातील जय पराजया विषयी समत्व सांगितले. युद्धात समोर येणारा कोणीही असला तरी शत्रूच असतो. ही समत्वबुद्धी सांगून अशा समत्व योगाने कर्म हेच कौशल्य असेही सांगितले. असे निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माचे अकर्म होते. ते पाप पुण्य द्यायला शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अर्जुनाबरोबर सर्वांनाच गीता नवीन विचार देते. सत्कर्म, स्वधर्म, समत्व हा गीतेचा पायाच आहे.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈