सौ शालिनी जोशी
विविधा
☆ गीता जशी समजली तशी… भाग – ७ – गीता — श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती ☆ सौ शालिनी जोशी ☆
मूर्ती ही एखाद्या व्यक्तीची प्रतिमा असते. तिला रंग, रूप, आकार असतो. त्यावरून त्या व्यक्तीचे बाह्य रूप समजू शकते. ती निर्जीव असते. आचार, विचार कळू शकत नाहीत. तेव्हा एखाद्या व्यक्तीने तिच्या वाणीने म्हणजे तिच्या शब्दांत सांगितलेले विचार म्हणजे त्या व्यक्तीची वाणीरूप मूर्ती. म्हणजे संत महात्म्यानी केलेला उपदेश, त्यांचे विचार ते गेले तरी ग्रंथ रूपाने लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणून त्यांच्या ग्रंथांना त्यांची वाङ्मय मूर्ती म्हणतात. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांची, आत्माराम- दासबोध समर्थांची आणि गाथा ही तुकारामांची वाङ्मम मूर्ती होय. म्हणून समर्थ रामदास शिष्यांना सांगतात, ‘ आत्माराम दासबोधl माझे स्वरूप स्वतः सिद्धll असता न करावा खेदl भक्तजनीll’ तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणतात, ‘ पुढती पुढती पुढतीl इया ग्रंथ पुण्य संपत्तीll सर्व सुखी सर्व भूतीl संपूर्ण होईजोll’ (ज्ञा. १८/१८०९)
तशीच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती. त्याविषयी सांगण्याचा हा प्रयत्न.
श्रीकृष्ण कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी अर्जुनाचा सारथी म्हणून रणांगणावरती उतरले. युद्धात भाग घेणार नाही अशी प्रतिज्ञा. पण पांडवांच्या बाजूने त्यांनीच प्रथम पांचजन्य शंख फुंकला. आणि ते ऋषिकेश (इंद्रीयांचा स्वामी, ऋषिक- इंद्रिय) अर्जुनाच्या इंद्रियांचा स्वामी झाले. रणांगणावर नातेवाईकांना व गुरुना पाहून अर्जुनाला त्यांच्याविषयीच्या मोहाने ग्रासले. पापा पासूनचे विचार धर्मनाशापर्यंत पोहोचले. तरीही श्रीकृष्ण शांत होते. त्यांनी अर्जुनाचे म्हणणे ऐकून घेतले. अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडले. तो संन्यासाची भाषा बोलू लागला आणि शेवटी श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. तेव्हा श्रीकृष्णानी आपले प्रयत्न सुरू केले. अर्जुनाची वीरश्री जागृत करायचा प्रयत्न केला. पण अर्जुन मोहरूपी चिखलात अधिकच रुतत आहे असे पाहून, असा मोहरुप रोग त्याला कधीच होऊ नये या दृष्टीने उपदेशाला सुरुवात केली. विचार केला, आचरण केले आणि मग सांगितले असा हा उपदेश.
आत्म्याचे अविनाशित्व, देहाची क्षणभंगूरता, स्वधर्माची अपरिहार्यता, क्षत्रियांचे कर्तव्य व जबाबदारी, निष्कामकर्माची महती अशा वरच्या वरच्या श्रेणीत उपदेश सुरू केला. लोकसंग्रहाचा विचार, यज्ञाच्या व संन्याशाच्या जुन्या कल्पनात बदल, ज्येष्ठांचे आचरण, निष्काम कर्म सांगून मी स्वतः असे आचरण करतो, दृष्टांच्या नाशासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. असे सांगून आपला आदर्श त्याच्या पुढे ठेवला. हळूहळू आपल्या भगवंत रूपाची जाणीव करून दिली. निर्गुण निराकार असून जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा, भक्तांचा योगक्षेम चालविणारा, सृष्टीचे चक्र चालवणारा, सर्वांचे गंतव्य स्थान मीच आहे. सर्व व्यापकत्व स्पष्ट केले. विश्वरुप दाखवले. दैवी गुणांचे श्रेष्ठत्व पटवून दिले. स्थितप्रज्ञ, जीवनमुक्त, ज्ञानी भक्त यांचे आदर्श त्याच्या समोर ठेवले. त्यामुळे मोहाच्या पलीकडे जाऊन अर्जुन युद्धाला तयार झाला. तशी कबुली त्याने दिली. गीतोपदेशाचे सार्थक झाले. सर्वांसाठी सर्वकाळी अमर असा हा उपदेश, युद्धभूमीवर केवळ ४० मिनिटात श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. आणि ‘यथेच्छसि तथा कुरु’ असे स्वातंत्र्य ही त्याला दिले.
आपल्याही जीवनात असे मोहाचे प्रसंग येत असतात खरं पाहता आपण सारे अर्जुन आहोत. तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्यासमोर नसले तरी हृदयात आहेत, मार्ग दाखवण्यास सज्ज आहेत, त्यांची गीता समोर आहे. तिचा आधार घेऊन जीवनाचे सूत्र त्या श्रीकृष्णाच्या हाती देवून संकट मुक्त व्हावे. अशी ही गीता म्हणून भगवंतांची वाङ्मय मूर्ती होते. साधकाने जीवन कसे जगावे सांगणारी जीवन गीता.
शंकराचार्य गीता महात्म्यात म्हणतात, ‘ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन:l पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्ll उपनिषद या गायी, श्रीकृष्ण हा दोहन करणारा गवळी, अर्जुन गीतामृत पिणारे वासरू. हा दृष्टांतच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती आहे सांगायला पुरेसा आहे. गीता ही श्रीविष्णूच्या मुखकमलातून निघालेले शास्त्र आहे. त्यामुळे इतर शास्त्रांच्या अभ्यासाची गरज नाही. हेच सर्व शास्त्रांचे शास्त्र. खचलेल्या मनाला उभारणी देणारं, मन बुद्धीचा समन्वय साधणार मानसशास्त्र आहे. योग्य सात्विक आहार व त्याचे फायदे सांगणार आहारशास्त्र आहे. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणारे आचरण शास्त्र आहे. नेत्यांची जबाबदारी आणि समाजातील सर्व घटकांना त्यांची कर्तव्य सांगणारं, सर्व जाती, धर्म, स्त्रिया यांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. पंचभूतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र, ‘उतिष्ठ, युद्धस्व’ सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणारे विवेक शास्त्र आहे. तसेच सर्वाभूती ईश्वर सांगणारे समत्व शास्त्र आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे आत्मज्ञान करून देणारं आत्मशास्त्र आहे. सर्व योगही कर्म, ज्ञान, भक्ती येथे एकोप्याने नांदतात. कारण व परिणाम सूत्र पद्धतीने मांडले आहेत. कोणतीही सक्ती नाही. अंधश्रद्धा नाही. पण शास्त्राप्रमाणे कर्तव्य करायचा आग्रह आहे. अर्जुनाचे दोष सांगण्याचा स्पष्टपणा आहे आणि स्वतःचे कर्तव्य ही सांगितले आहे. स्वतः केले, आचारले मग सांगितले असा हा उपदेश. अर्जुनाच्या मनात कधीही परत संभ्रम होऊ नये असा रामबाण उपाय. सर्व द्वंद्वातून मुक्त करून नराचा नारायण करणारा हा संवाद. वरवर प्रासंगिक वाटला तरी तसा नाही. सर्वकाली, सर्व जगाच्या कल्याणाचा आहे. श्रीकृष्ण योगेश्वर अर्जुनाचे निमित्त्य करून सर्व जगाचे साकडे फेडतात. कर्म बंधनात न अडकता कर्म करण्याची वेगळी दृष्टी जगाला देतात. कर्म हीच पूजा झाली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत म्हणतात, ‘म्हणौनि मज काहीl समर्थनी आता विषो नाही l गीता जाणा हे वाङ्मयीl श्रीमूर्ति प्रभूचीll (ज्ञा. १८/१६८४)
अशी ही गीता ५००० वर्षे झाली तरी तिचे महत्त्व कमी झाले नाही. सर्व काळी सर्व लोकांना ती मार्गदर्शक आहे. सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. मानवाच्या आयुष्यातील कसोटीच्या वेळी योग्य मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे भारताची वैचारिक संपत्तीच आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य, धैर्य देणारी गीता हातात घेऊन अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान केले. यशाची प्रेरणा देणारी तीच आहे. म्हणून अनेक खेळाडूही यशाचे कारण गीता सांगतात. कितीतरी विद्वान, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ गीतेचा अभ्यास करतात व केला आहे. देशी-परदेशी विद्वानांवर तिचा प्रभाव आहे. विविध भाषेत भाषांतर होत आहे. झाली आहेत. असे हे अध्यात्म प्रधान, नीतिशास्त्र भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. अभिमानाने गीता ग्रंथ आपण परदेशी पाहुण्यांना भेट देतो. पंतप्रधान मोदींनी ही पद्धत सुरू केली. कारण गीता ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयमूर्ती!
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈