श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
विविधा
☆ गोठा… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
गाईगुर, वासरं, म्हशीरेडक, शेळ्या यांनी भरलेला गोठा हे श्रीमंतीचं लक्षण समजले जातं. ती एक संपत्तीच होय. शेतकरी माणसाच्या घरी स्वतःचे बैल असणे हे ही एक श्रीमंतीचे लक्षण होय. आता जरी ट्रँक्टर आले असले तरीही किरकोळ कामाला बैलच उपयोगी पडतात. त्यांच्यावरच शेतकऱ्यांचा संसार, घरं उभी राहीलेली असतात. काही वेळा या शेतकऱ्यांच्या घरापेक्षा गोठाच मोठा असतो. मग त्यात पोटमाळाही असतो. खाली जनावरे आणि पोटमाळ्यावर गवत, पेंडीची पोती, तसेच धांन्याच्या कणग्या, एका बाजूला उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या शेणी अस बरच काही ठेवता येते. मग त्यात गाईच्या शेणाच्या वेगळ्या व इतर जनावरांच्या शेणाच्या वेगळ्या करून ठेवल्या जातात. गाईच्या शेणाच्या शेणी देवक्रुत्यासाठी केल्या जाणाऱ्या होम, यज्ञ, याग यासाठी वापरल्या जातात. त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शेणींचा उपयोग करून त्यात कापूर, हळद, डिंक घालून दात घासायला वापरायची राखुंडीही तयार करण्यात येते. या शेणी सोवळ्याचा स्वयंपाक करतांना चुलीत जाळायला, बाळंतीण, बाळाला शेकशेगडीसाठी ही वापरतात.
आपल्या हिंदू धर्मात तर गाईला खूप महत्त्व आहे. तीला गोमाता म्हणतात. गाईगुरांच्या संगतीने वाढलेला आपला देव श्री क्रुष्ण तर सर्वांनाचाच आवडता देव आहे. त्याच्या मुरलीचे स्वर तर या गाईंना नेहमीच भान हरपायला लावत होते. आणि आपलेही भान या मुरलीच्या स्वरांनी हरपतेच.
लहानपणी लपाछपी खेळताना गोठा हेही एक लपण्याचे ठिकाण असे. गोठ्यात लपलेला खेळगडी लवकर सापडत नसे. तसेच बालपणी एखादा हट्ट मोठ्या माणसांनी पुरवला गेला नाही म्हणून गोठ्यात रुसून बसलेल्याच्याही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तसेच एखादी माहेरवाशीण आपला सासरी झालेला छळ आठवून आईवडिलांच्या नकळत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिल्याच्याही अनेक कथा आपण ऐकत असतो. कधीतरी एखादा महत्त्वाचा निर्णयही या गोठ्यातच ठरवला जातो. तर काही वेळा तिथंच प्रेमाच हितगूज किंवा महत्त्वाची गोष्ट गुपचुप एखाद्याला सांगायला ही ह्याच गोठ्यात बोलावले जाते.
खूप ठिकाणी विशेषतः कोकणात एखादा माणूस मरण पावला की त्याच्या आकऱ्याव्या, बाराव्या, तेराव्या दिवसाचा स्वयंपाकही निशिद्ध मानला जात असल्याने व खूप ठिकाणी ह्यावेळी जेवणारे ब्राह्मण मिळत नाहीत. त्यामुळे तो स्वयंपाक या गोठ्यात करून तिथेच अशी पाने वाढून नंतर ती पाने वाढल्याचे शास्र करून मग ती पाने नदीत सोडून देण्याचीही प्रथा आहे.
हल्लीच्या दिवसात तर गाईगुरं नसलेल्या रिकाम्या गोठ्यात कोरांटिईन केलेल्या माणसांची सोय केली गेल्याच्या बातम्याही ऐकू येतात. तर असा हा गोठा खूप महत्त्वाचे ठिकाण आहे.
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈