☆ विविधा ☆ घर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
परवा मी एका माझ्या मैत्रिणी च्या घरी गेले होते . घर कसले ते छोटा महालच म्हणा की. खूप प्रशस्त खोल्या होत्या. मोठा सुंदर दिवाण खाना,ज्यात सुबक नक्षी केलेल्या पेंटिंग, देखणे झुंबर, आरामदायी खुर्च्या अश्या विविध गोष्टी होत्या. तिथून आत मोठे स्वयंपाकघर होते. ते ही नाना गोष्टीने नटलेले. एकसारख्या सुरेख काचेच्या बरण्या, स्टील चे डबे, मायक्रो वेव्ह, तो भला मोठा कट्टा त्यावर फूड प्रोसेसर, एका बाजूला एक शोकेस ज्यात काचेची भांडी नीट मांडलेली. थोडक्यात काय सगळ्या वस्तू जिथल्या तिथे.
प्रशस्त बेड रूम, स्टडी रूम, दू मजली प्रशस्त मोठे घर आणि सुंदर मोठी गच्ची . घराला रंग ही सुंदर दिलेला होता. एकूण काय कुठेच कमतरता काढण्यासारखी नव्हती. मी सहज म्हणले मैत्रिणीला काय सुंदर घर आहे ग तुझं. त्यावर जे तिने मला उत्तर दिले त्यांनी मी अवाक झाले, पाहतच राहिले तिच्या कडे.
चार वीटांपासून, दगड आणि माती पासून बांधलेल्या सुबक खोल्या म्हणजे का घर ?चार माणसे एकत्र राहणे म्हणजे का घर ? नक्की घर तू कश्याला म्हणतेस, असा प्रति प्रश्न तिने मला केला. ती म्हणाली माझ्या मते घर म्हणजे उबदार खोल्या माणसाच्या सहवासातून तयार झालेल्या. एकमेकांसाठी आपण आहोत ही जाणीव होणे म्हणजे घर. हे घर नाही काही हे कोर्ट आहे. येथे केवळ ऑर्डर आणी ऑर्डर एवढच असते. या घरात माणस रहात नाहीत तर नियम राहतात. भावनांना काडीचीही किम्मत नाही इथे. जिवंत माणसांपेक्षा निर्जीव वस्तू जास्त जपल्या जातात इथे.मग हे घर कसे ?
घर म्हणजे नुसत्या चार भिंती नव्हेत,तर त्यात मायेची ऊब लागते. घर म्हणजे एकमेकांची मन समजून घेऊन राहणे. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करणे.
मायेच्या प्रेमाचा हात जेव्हा निर्जीव भिंतींवरून फिरतो तेव्हा तीही सुखावते. त्यात ही जीव येतो.तेव्हा बनते घर.
चार आपुलकीचे शब्द जेव्हा घरभर घुमतात तेव्हा वास्तू देवताही प्रसन्न होते आणि घराला घरपण येते.
जेव्हा घरच्या स्त्रीला मान मिळतो तेव्हाच अन्नपूर्णा आनंदाने नांदते,तथास्तू म्हणते, तेव्हा बनते घर.
तिच्या मते घरातली प्रत्येक वस्तू जागच्या जागी नक्की असावी. पण म्हणून घर शो पीस नक्की नसावे. शिस्त नक्की असावी पण हुकुमशाही नसावी.
घरात गेल की भिरभिरणार्या नजरा नसाव्यात तर प्रसन्न भीती विरहित चेहेरे असावेत.
कधी कधी भिंतींवर रेखाटलेले एखादे चित्र ही घराला घरपण देऊन जाते हे तिचे सहज बोलणे मला फार भावले. हास्याने सुख नांदते, नाही तर घर म्हणजे पायात घातलेली बेडी वाटू लागते. तिच्या मते आपली कोणीतरी घरी वाट पाहत आहे ही जाणीव म्हणजे घर. एकमेकांच्या प्रेमाने घट्ट बांधलेली नात्यांची वीण म्हणजे घर. एकमेकांवरचा विश्वास, आधार म्हणजे घर.
रुसवे फुगवे पण ते न टिकणारे म्हणजे घर.अहंकार , मी म्हणीन तसेच, हुकुमशाही, दडपशाही नी घर नाही बनत . आपण जिथे मोकळा श्वास घेऊ शकतो, दिलखुलास हसू शकतो, आपली मत न घाबरता मांडू शकतो ते घर.ती त्या दिवशी खूप भरभरून, मनापासून आणि खर बोलत होती.
आणि तिचे ते बोल ऐकुन मला ही पटले उमगले माझ घर लहान असले तरी प्रेमाने, आपुलकीने भरलेले आहे. आमच्या मनाची वीण इतकी घट्ट आहे की आमच्या मुळे घर बनले आहे. त्याच्या मुळे आम्ही नाही. घर वाट पाहते आमच्या सहवासाची. कारण त्याला आमच्या मुळे घरपण मिळाले आहे.
घर प्रेमानी सजलेल असाव
आपुलकीने नटलेल असाव
मायेचा ओलावा असावा
विश्वासाचा एक सुंदर धागा असावा
जिथे हक्काची एक हाक असावी
मायेची एक थाप असावी
आधार असावा एकमेकांचा,
नुसती दिखाव्याची नाती नसावी
सहज मनाच्या कोपऱ्यातून
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
22.8.2020
मो 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈