डॉ मेधा फणसळकर
☆ विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
“अरे ए, सरक ना बाजूला! जरा कुठे अंग पसरायला जागा नाही. शी बाई! या कंबरपट्ट्याने सगळीच जागा व्यापलीये. मोठ्ठा ‛आ’ वासून पसरलाय. आणि आजूबाजूला या मेखलाबाईंचा गोतावळा आहे. कशा नवरोबाना चिकटून बसल्या आहेत बघा. मेली लाज कशी वाटत नाही म्हणते मी! हल्ली या कंबरपट्याचा मान वधारलाय ना? म्हणून ही मिजास! त्याच्याच बाजूला या एकाच पेटीत आम्हाला आपले एका बाजूला अंग चोरुन घेऊन पडून घ्यावे लागतेय. आमचे म्हणजे त्या जीवशास्त्रातील अमिबासारखे आहे. मिळेल त्या जागेत, आहे त्या आकारात स्वतःला सामावून घ्यायचे. त्यामुळे कोणीही उचलावे आणि हवे तिकडे टाकून द्यावे.”
दागिन्यांच्या मोठ्या डब्यामध्ये एका बाजूला बसून या सोन्याच्या साखळीताईंची बडबड चालू होती.
तेवढ्यात पोहेहार तिच्याकडे सरकत म्हणाला, “ताई, कशाला वाईट वाटून घेतेस? अग, माझे तरी काय वेगळे आहे? मलाही आहे त्या जागेत कसेही कोंबतात ग. हे पदर एकमेकात अडकून कसा चिमटा बसतो हे तू अनुभवले नाहीस. माईंच्या लग्नात त्यांच्या सासूबाईंनी मला घडवले. माई होत्या तोपर्यंत किती हौसेने मिरवायच्या मला. पण माईंची सून उर्मिलेने एक दोनदा मला घातले आणि अडगळीतच टाकून दिले. म्हणे मी outdated झाले आहे म्हणे. म्हणूनच ही अवस्था झाली आहे. अग साखळीताई, किमान वर्षातून लहान- सहान कार्यक्रमाला तरी तुला बाहेरची हवा मिळते. पण चिमटे बसून- बसून माझे अंग दुखू लागलंय बघ!”
त्याचवेळी एका सुंदरशा चौकोनी पेटीत मऊ गादीवर बसलेला कोल्हापुरी साज म्हणाला, “ इतके वाईट वाटून घेऊ नकोस रे दादा! आता मिळतेय मला ही मऊमऊ गादी. पण मध्यन्तरीच्या काळात मलाही ही उपेक्षा सहन करावीच लागली आहे. ‛रायाकडून’ हट्ट करुन करुन मला घडवून घेणाऱ्या या बायकांना काही दिवसांनी मी पण outdated वाटू लागलो. मग लागली माझी पण वाट! माझ्यातच गुंतलेल्या माझ्याच तारेने- या बायकोने सारखे टोचून टोचून हैराण केले बघ मला. शेवटी बायकोच ती! पण एकदा एका पार्टीत उर्मिलेच्या मैत्रिणीने कोल्हापूरी साज ‛new fashion’ म्हणून घातला. तर काय? माझा भाव एकदम वधारला. उर्मिलेने पुन्हा माझी डागडुजी करून घेतली आणि मी झळकू लागलो. माझी बायको पण आता कशी शिस्तीत मला चिकटून बसली आहे बघ. आणि आता म्हणे उर्मिलेच्या लेकीचे कॉलेजमध्ये लावणी फ्यूजन आहे. त्यात मी हवाच आहे. म्हणूनच आपल्याला बाहेर काढले आहे आज आणि ही थोडी थोडी बाहेरची हवा चाखायला मिळते आहे. त्यामुळे थोडे सहन करा. कदाचित थोडे दिवसांनी पुन्हा तुमचे दिवस येतील.”
त्याच्याच शेजारी जोंधळ्यासारख्याच पण त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या सोनेरी दाण्यांच्या नक्षीने सजलेली ठुशी समजूत काढत म्हणाली, “ नका रे एवढे निराश होऊ. शेवटी प्रत्येकाचे दिवस असतात हेच खरे. मला नाही कधी उपेक्षा सहन करावी लागली. अगदी जन्मापासून मी प्रत्येक बाईच्या गळ्यातला ताईत बनले आहे. माईंच्या सासूबाईंच्या आईने मला घडवून घेतले. त्यांच्यानंतर माई आणि आता उर्मिलासुद्धा अधूनमधून मला प्रेमाने मिरवतात. खूप वर्ष सेवा केल्यावर मध्यंतरी जरा आजारी पडले होते. पण माईंनी उर्मिलेच्या लग्नाच्या वेळी पुन्हा मला तंदुरुस्त केले आणि मी नवीन सुनेच्या गळ्यात तितक्याच दिमाखाने मिरवू लागले. त्यामुळे मी खूप पावसाळे पाहिलेत. म्हणूनच ‛एक ना एक दिवस प्रत्येकाचे चांगले दिवस येणार’हे माझे शब्द लक्षात ठेवा.”
तेवढ्यात एका कोपऱ्यात बसलेली पाटलीबाई मुसमुसत म्हणाली,“ तू म्हणतेस ते खरे ग ठुशीआज्जी! पण माझे काय? हल्ली हातात पाटल्या- बांगड्या घालायची फॅशन गेलीये म्हणे. माईंच्या सासूबाईंच्या लग्नात त्यांच्या सासऱ्यांनी चांगली पाच तोळ्याची आमची जोडी बनवून घेतली होती. माईच्या सासूबाईंचे वय अवघे आठ वर्षाचे ग त्यावेळी! बिचारी कशीबशी माझे वजन सांभाळायची. बरोबर बिलवर- तोडे या माझ्या भगिनी पण असायच्या ना ग! माई असेपर्यंत आम्ही सुखाने त्यांच्या हातावर नांदलो. उर्मिलेला मात्र रोज नोकरीवर जाताना सगळे हातात घालणे शक्यच नव्हते. तेव्हापासून आम्हा दोघींची रवानगी या छोट्या कोपऱ्यात झाली आहे. आणि आमच्या भगिनींचा मेकओव्हर करुन कंगन-ब्रेसलेटच्या रुपात अधून- मधून झळकतात उर्मिला आणि तिच्या लेकीच्या हातावर! मला मात्र घराण्याची आठवण म्हणून जपून ठेवले आहे हो! पण कधीतरी माझासुद्धा मेकओव्हर होईल की काय अशी भीती वाटत राहते. परवाच उर्मिलेचा राजू आईला सुनावत होता की ‛कसली घराण्याची परंपरा आणि काय? हे दागिने जपून ठेवून काय करायचे आहेत? त्यापेक्षा मला दे सगळे. त्याचे दुप्पट पैसे करुन देतो.’
पण उर्मिला काही बधली नाही हो त्याला. म्हणून आपण सगळे वाचलो आहोत आज.” “ हे बाकी खरे हो!” छोट्याश्या पेटीत बसलेली टपोऱ्या मोत्यांची नथ म्हणाली.“ मला माईंचा हट्ट म्हणून त्यांच्या यजमानांनी मुलाच्या मुंजीत पुण्यात पेठे सराफांकडून बनवून घेतले. माई सगळ्या कार्यक्रमात अगदी हौसेने मला मिरवत. उर्मिलेने पहिल्यांदा हळदी-कुंकू, मंगळागौरीत मला मिरवले. पण तिच्या नाकाला काही माझा भार सहन होईना. मग तिने तिच्या पहिल्या भिशीच्या पैशातून माझी ही छोटी सवत ‘हिऱ्याची नथनी’ करुन घेतली. आता तिच तोरा मिरवत असते.”
क्रमशः…
© डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈