☆ विविधा ☆ घोरणे…काही गंमती ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
झोपेत आपला आवाज आपल्याला येत नाही, पण आपल्या आवाजाने दुसऱ्याला जाग येणे, झोप न लागणे, त्रास होणे ह्या गोष्टी होऊ शकतात….ह्यालाच घोरणे म्हणतात. ? हे सर्वांनाच ठाऊक आहे…हो न?
काही पाहिलेले अनुभव, तर काही ऐकलेल्या गोष्टीवरून लेखन प्रपंच….. कारण ह्यावर एकदा लिहायचंच होत!
घोरण्याचे प्रकार तरी किती पहा…..
काही लोक तोंड बंद ठेऊन नाकाने आवाज काढतात म्हणजे आवाज येतो. इतक्या जोरात ही प्रक्रिया सुरू असते की एखादा डास किंवा कोणताही कीटक सहज नाकात जाऊ शकतो.
काही लोक तोंडाने जोरजोरात आवाज काढतात आणि तेही वेगवेगळ्या सुरात!
काही जण तर चक्क फूसss फूसsss असा आवाज काढतात…. जणू आजूबाजूला खरच फणा काढलेला नाग आहे की काय अस वाटू शकतं.
काही लोकांचा तर नुसता घशातून आवाज येतो. जग इकडचे तिकडे झाले तरी चालेल पण एक लिंक लागलेली असते ती बदलत नाहीत. एक सूर…एक ताल
काही लोक तर घोरतात आणि झोपेत मधूनच बोलतातही!
काही लोकांच्या घोरण्याचा आवाज अगदीच वेगळा असतो… कधीही न ऐकलेला!
उताणे झोपलं की जास्त घोरलं जातं असे लोक म्हणतात… मग अशा घोरणाऱ्या व्यक्तीला एका अंगावर झोपण्याची सूचना दिली जाते.मग त्यावेळी तर घोरण्याचे सगळे सूर बदलतात, काही वेळा स्वतःपुरतेच राहतात.
काही वेळा एक अंगावर करूनही घोरणे बंद नाही झाले तर एखादी चापट मारली जाते, मग नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला. काही वेळा तर चक्क गदागदा हलवलं जात!पण घोरणारी स्वारी स्वतःच्या ‘अंतरीच्या आनंदातच’ असते.
काही लोकांना तर घोरलेलं अजीबात सहन होत नाही. बायको घोरते म्हणून नवरोबा कानात कापसाचे बोळे घालतात, तरीही घोरणे ऐकू येत.. मग कानावर हात ठेवणे, त्यावर उशी ठेवणे… असे विविध प्रकार एका घोरण्यामुळे होत असतात.
कित्येक नवरा बायकोमध्ये घोरण्यावरून भांडणेही होतात. नवरा बायकोला म्हणतो मी घोरतच नाही कधी, तूच घोरतेस. पण नवऱ्याचा अनेकदा गोड गैरसमज असतो की आपण घोरतच नाही. किंवा काही वेळेस उलट परिस्थितीही असते. नवरा घोरतो, बायको नाही. घोरणे जास्त झाले की चिडून, चिमटा काढणे, हलकेच ढकलणे असेही होत….
अनेक वेळा आपण घोरतच नाही असे म्हणणाऱ्यांचे घोरण्याचा रेकॉर्डिंग ही केलेलं मी ऐकलंय! कमालच वाटली.
घरी जेष्ठ नागरिक असतील तर खूप वेळा ते ही घोरतात, पण त्यांना कस काय बोलायचं? म्हणून सहन करणंच भाग असत.
अनेक लहान मुलंही घोरतात…. अगदी मोठ्यांसारखं! मग खेळून दमला असेल म्हणून घोरतोय अस समर्थन केले जात.
काही वेळेस घरातील सगळेच घोरतात, पण कुणाला कुणाचाही त्रास वाटत नाही… कारण सगळेच शांतपणे पण घोरत झोपलेले असतात.
एकूण काय घोरणे ह्याच वैज्ञानिक कारण काहीही असो पण काही निरीक्षणांवरून त्याच्या गमती जमती लिहाव्या वाटल्या…
आणि ‘घोरणे’ हा ही लेखनाचा विषय होऊ शकतो असे वाटल नक्कीच?
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈