? विविधा ? 

☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं…!

एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं!

मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!

दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!

घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात!! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!

शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं! ?

प्रस्तुती – मानसी आपटे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments