प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

‘परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह ‘ अशी कुटुंबाची व्याख्या केली जाते.माणसांमधली ही नाती जन्मावरून,विवाहावरून किंवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब ही समाजातील सार्वभौम संस्था असली तरी स्थळकाळसापेक्ष तिच्या स्वरूपात भिन्नता आढळून येते.

कुटुंबाचे प्रकार –

१. आप्तसंबंधावर आधारित कुटुंबप्रकार –

अ.केंद्रकुटुंब: अशा प्रकारची कुटुंबे बहुधा सर्वत्र आढळतात. यात पति, पत्नी आणि त्यांची अविवाहित किंवा दत्तक मुलांचा समावेश होतो.

ब. विस्तारित कुटुंब: यात कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असते.प्रामुख्याने शेती व्यवसायातील कुटुंबांचा यांत समावेश होतो.

२. विवाह प्रकारावर आधारित-

अ. एक विवाही कुटुंब- एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या वैवाहिक संबंधांद्वारा अशी कुटुंबे निर्माण होतात. पती आणि  पत्नी जीवंत असेपर्यंत दोघांपैकी कुणा एकाला दुसरा विवाह करता येत नाही.

ब. बहुपती कुटुंब- अनेक पुरुष एका स्त्रीबरोबर विवाह करून कुटुंब निर्माण करतात.

क. बहुपत्नी कुटुंब- यात एक पुरुष अनेक स्त्रियांसोबत विवाह करतात.

३. वंश आणि अधिसत्ता यावर आधारित-

अ. मातृसत्ताक कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही स्त्रीची असते .शिवाय कुटुंबाचा वंशही स्त्रीच्या नावाने चालला जातो.

ब.पीतृवंशीय कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही पुरुषाची असते.शिवाय कुटुंबाचा वंशही पुरुषाच्या नावाने चालतो.

४.काबीली कुटुंब: जनजातीमध्ये असलेली ही पध्दत सामाजिक विकासक्रमाच्या आदिम अवस्थेच्या जवळची आहे.

कुटुंब हा समाजशास्त्र आणि  मानसशास्त्राच्या दृष्टीने मूलभूत असा प्राथमिक गट आहे.

कुटुंबाची कार्ये-

१. प्रजनन करणे .

२. पालनपोषण करणे.

३.नव्या पिढीचे वेगवेगळ्या पध्दतींनी सामाजिकरण करणे.

४. व्यक्तीला निस्चित स्थान आणि दर्जा प्राप्त करून देणे.

वरील कार्यांपैकी प्रत्येक कार्य तत्वत:  दुसऱ्या संस्थांकडून होऊ शकते.पण आजवर तरी

कुटुंबाऐवजी दुसरी पर्यायी समाजसंस्था ही कार्ये तेवढया परिणामाने करू शकलेली नाही.

कुटुंबसंस्थेवर मुख्यत: पुढील शक्तींचे वेळोवेळी आघात होतात;

१.आर्थिक- औद्योगिकीकरण व शहरीकरण.

२.वैज्ञानिक यंत्रतंत्रशक्ति.

३.मूल्यात्मक व्यक्तिवाद किंवा समूहवाद.

४.विवाहनीतीत पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह.

हे बदल मुख्यत: पाश्चात्य समाजात होतात तरी,आपल्या समाजातील कुटुंबावरही त्याचे आघात होत आहेत. कोणत्याही प्रकारच्या कुटुंबात प्रमुख घटक पती आणि पत्नी असतात. त्यांच्या संबंधाला तडा जातो घटस्फोटामुळे.

घटस्फोट: पती आणि पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या संपुष्टात येणे म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंधापासून फारकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले तरी त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात उदा.

– घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

– ती जर मिळवती किंवा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल तर हे प्रश्न अधिक जटील होतात.

– घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहसा होत नाही.

– तिच्याकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असतो.

-घटस्फोटित स्त्रीला मुले असतील तर तिचा पुनर्विवाह होणे अवघड असतो.

– झालाच तरी तिच्या लग्नापूर्वीच्या मुलांना सावत्रपणाचा जाच सोसावा लागतो,अनेकांच्या स्वभावात काही दोष आढळून येतात, अनेक जण एकाकी आणि पोरकी होतात.

घटस्फोटामुळे असे प्रश्न केवळ स्त्रियांतच दिसतात असे नाही तर पुरुषांमध्येही अनेक समस्या दिसून येतात. अनेक आर्थिक,मानसिक, सामाजिक आणि लैंगिक समस्या निर्माण होतात, घटस्फोटित व्यक्तिविषयी समाजाचा दृष्टिकोन चांगला नसतो.याशिवाय मुलांची कस्टडी आणि मालमत्तेचे प्रश्न निर्माण होतात.

घटस्फोटाची दिसून येणारी कारणे :

-पुरुष किंवा स्त्रीचे विवाहपूर्व संबंध नंतर उघडकीस येणे.

– विवाहानंतर विवाहबाह्य संबंध.

– परस्परांची होणारी भांडणे,उडणारे खटके.

-व्यसने, जुगार.

– भावनिक छळ,अत्याचार.

– दोघांतील पुढीलपैकी फरक ;

– वय, भाषा,चालीरिती, आवडीनिवडी, छंद, खाण्यापिण्याच्या सवयी,भौगोलिक बाबी,उत्पन्नाची साधने,दोघांतील विवाहापूर्वीची अनेक बाबतीतील तफावत इ.

अनेकदा विवाहापूर्वी हवाहवासा होणारा सहवास विवाहानंतर नकोसा वाटतो परस्परांबद्दलच्या प्रेमाची जागा घृणा, तिटकारा घेते.अनेकदा संयुक्त कुटुंबातील मतभेद याला कारणीभूत ठरतात. परस्परांमधील दरी दिवसेंदिवस  वाढतच जाते. एकमेकांतील दोष दिसू लागतात, आपण कसे डावललो जातो,आपल्याला कशी किंमत दिली जात नाही हे ते सतत बोलत जातात. समाजातील आपली प्रतिमा कशी असेल आणि आपले कुटुंब म्हणून ऐक्य याची तमा न बाळगता ते  एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानतात.

हे नक्कीच चिंतेचे असते.

याला जबाबदार कोण? या प्रश्नावर एकच एक उत्तर देता येणार नाही.कुटुंबनिहाय यात वेगवेगळेपणा असतो.

घटस्फोटाच्या वर दिलेल्या कारणांव्यतिरिक्त पुढील बाबींचाही गांभीर्याने विचार करावा लागेल;

– अनेक ठिकाणी कुणी एकजण याला जबाबदार नसतो.परिस्थिती त्यांना हे करण्याला भाग पाडते

– विवाह टिकवणे हे अनेकदा अशक्य बनते.पण कधी कधी परस्परांना समजून न घेणे किंवा गृहीत धरणे हेही एक कारण असते.

-अनेकदा एक घटक आपला कोणत्यातरी बाबतीतचा हेका  सोडत नाही.आणि ते घटस्फोटाचे कारण बनते.

-कुटुंबात व्यक्तिस्वातंत्र्याला  महत्त्व असलेच पाहिजे.मात्र त्यासोबतच कुटुंबसंस्थेच्या महत्त्वाचीही जाणीव असलीच पाहिजे.

जगात भारताची ओळख ही भक्कम कुटुंबसंस्था असणारी संस्कृती अशी आहे.कुटुंबात कुणा एकावर अन्याय न होताही सर्वांच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजस्वास्थाच्या साठीही कुटुंबातील पतीपत्नींनी व्यक्तिस्वातंत्र्य,

स्वाभिमान याचा विचार करतानाच परस्परांशी सतत संवाद साधत राहीले पाहिजे.परस्परांविषयी गैरसमज हे आपापसात बोलूनच नाहीसे केले पाहिजे.

पती आणि पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाके असतात असे समजले जाते.ही दोन्ही चाके (सामाजिक दर्जा,व्यक्तिस्वातंत्र्य या अर्थाने) समान आकाराची असलीच पाहीजे.गाडी चालताना या दोहोंत ठराविक अंतर असावे.मात्र या त्यांना सतत  विश्वासाचे वंगण दिले पाहिजे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments