सौ. सुचित्रा पवार

घन सावळा आषाढ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मिरगाने होणाऱ्या जेष्ठातल्या पेरण्यांची धांदल संपते न संपते आषाढाचे काळेभोर मेघ चोहोबाजूनी गर्दी करू लागतात. सावळे सावळे जलद पाळणारे कधी एकाच ठिकाणी हट्टी बाळासारखे थांबणारे ढग मनात वेगळीच हुरहूर उठवत राहतात.काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहते उगीचच त्या पाण्याने गच्च भरल्या नभांकडे बघून.म्हणून तर कालिदासाच्या यक्षाला वियोग झालेल्या पत्नीची आठवण अस्वस्थ करून गेली असेल.हे मेघच पत्नीला निरोप देतील आणि विरह अग्नीत तडफडणाऱ्या मनाचा तिला अंदाज येईल असे त्याला वाटले असावे.आषाढाच्या पहिल्या दिवशी ढगांकडे बघून कालिदासाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

थंडगार हवा सगळ्या आसमंतात शिरून शेत शिवाराला हुडहुडी येते.चराचर आनंदी झालेलं असतं.पाखरांचा मधूर किलबिलाट सगळ्या वातावरणात भरून राहतो.इंदिरा संतांच्या रंगरंगुल्या,सान-सानुल्या गवतफुलांवर काळी, पिवळी,पांढरी,तपकिरी फुलपाखरे रुंजी घालत असतात.उन्हाळभर माळावर खुरट्या,वाळक्या कुरणावर दात आपटून ल्याप झालेली जनावरं आता वाऱ्यावर सळसळणाऱ्या हिरव्यागार कोवळ्या लूस गवतावर अंगावरची पावसाची सर झिंझाडत तुटून पडतात.किती खाऊ न किती नको!हावऱ्यासारखी नुसती हुंदडत गवतात मस्ती करत राहतात.

कुळवाची पाळी देऊनही मागे उरलेल्या चुकार तणाला खुरप्याच्या टोकाने उचलणाऱ्या शाला, माला, मंदा ,नंदाला सभोवतीच्या काळ्याकुट्ट ढगात पंढरीचा विठोबा दिसतो आणि वारीची आठवण येऊन त्यांना आनंदाचे भरते येते.आपला हात सरसर हलवत “अगं वारीला कवाशी जायाचं?”म्हणत मनातच वारीच्या वाटेवर टाळ मृदुन्गाच्या गजरात गाऊ-नाचू लागतात.

कृषिवलाना बेंदराच्या सणाची चाहूल लागलेली असते.जाता येता वाघाटीच्या वेलावर पानाआड दडलेल्या वाघाटया काढून घरधणीनीला

बारशीला कालवण करायला द्यायच्या असतात.हुनंगा झाला की खिचडा. वेळात वेळ काढून बैलांना ,गुरांना धुवून कांती तुकतुकीत करायची असते.चांगला खुराक घालून बैलांचा लाड करायचा असतो.मागच्या बेंदराला आणलेले कंडे विरून गेलेले असतात, दिष्टीचे मणी पण फुटलेले असतात.शिंगांचा रंग उडालेला असतो.येत्या बाजारातून सगळं सगळं न चुकता आणायचं असतं. फाटकी झूल शिवायला टाकायची असते.गोंडे ऐनवेळी कुठं सापडत नाहीत,तेही यावर्षी नवेच घ्यायचा विचार असतो.झालंच तर लेकीच्या पहिल्या करीवर नवे कासरे, कंडे ठेवायचे असतात.

घरधणीनींना खिचडा कांडायचा असतो,आकाडाची कर तळायला कापण्या-दामट्याचं दळण दळून आणायचं असतं.आकाड पाळायला आलेल्या लेकी हातातला चुडा अन अंगभर दागिने मिरवत सगळ्या आळीत चहा पाण्याला फिरत असतात.

देवळात  मागच्या वर्षी सप्ता झाल्यावर कपाट बंद केलेले तबला,पेटी,मृदंग बाहेर येतात.पथाऱ्या टाकल्या जातात.एकादशी होईपर्यंत आता दररोज विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन रंगणार असतं.

अ ss आ  अवघे गरजे पंढरपूर

चालला नामाचा गजर,चालला नामाचा गजर..कोणतरी सूर लावत असतो,ताल धरायला मग एकेकजण येऊन बसतो.पोराठोरांचा पाय देवळातून निघत नाही.जेवण करून धोतराची खोळ अंगभर पांघरून भजनात तल्लीन झालेल्यांच्या अंगातला गारठा कधीच पळून गेलेला असतो.

आषाढ एकादशीचा तो पवित्र दिवस येतो.दिवसभर देवळाला जत्रेचे रूप आलेले असते.घंटा खणखणत राहते.भोळा भाबडा जीव फक्त विठूच्या जीर्ण शिर्न चरणांवर लीन होतो.मागत काहीच नसतो,त्याच्या आत्म्याशी फक्त क्षणभर एकरूप  होतो.अबीर बुक्का कपाळावर लावून थोड्याशा नकळत केलेल्या पापाची वजाबाकी करतो.

अध्यात्मातल्या सत्शील लोकांचा चातुर्मास आताशा सुरू झालेला असतो.श्रावणाला पवित्र महिना मानत असले तरी आषाढ सुद्धा त्याचा सख्खा भाऊच असतो.त्याच्याइतकाच तो शुद्ध अन पवित्र असतो म्हणूनच अवसेच्या दिवे उजळून आषाढ जणू त्याचे स्वागत करतो.नव्हनाच्या लाह्या याचदिवशी भाजल्या जातात.

वर्षभर ज्ञान देणाऱ्या गुरूंच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची गुरुपौर्णिमा असो,अवघ्या महाराष्ट्राचा आषाढी एकादशीचा उपवास -वारी असो,बेंदूर असो,म्हसोबा ताई आईचा गोडा-खारा निवद असो,की तेजोमय दिव्याची पूजा असो,आषाढ गुंग असतो आपल्याच तालात,धांदलीत,नव्या नवरीच्या पैंजनाच्या तालात, लाजऱ्या नजरेत,कापऱ्या वाऱ्यात,भुरभुरत्या पावसात,अवसेच्या दिव्याच्या प्रकाशात आणि त्या

‘और ना डरा दे मुझको

ए काले काले घन..’वाल्या मनाला विव्हळ करणाऱ्या घनसावळ्या पाण्याने ओथंम्बलेल्या दाटीवाटीच्या मेघात…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments