☆ विविधा ☆ चितळे मास्तरांनी शिकवलेला धडा ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

गेल्या रविवारचाच प्रसंग…

आम्ही नवरा-बायको बिबवेवाडी रोडवरील चितळे मास्तरांच्या दुकानात थांबलो होतो. मिठाई घेऊन बाहेर निघत होतो. तेवढ्यात एक गिर्‍हाईक दांपत्य दुकानाच्या मालकांशी हुज्जत घालू लागले, त्या आवाजाकडे लक्ष गेले. त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे १२००-१३०० रुपयांची खरेदी तर केली होती, पण घरून पिशवी आणायला विसरले होते! आता बाहेर उभ्या मोठया, पॉश कारपर्यंत सामान नेणार तरी कसे? दुकान मालकाकडे त्यांनी ’कॅरी बॅग द्या!” अशी मागणी चालवली होती. मध्यमवयीन, चांगले टापटिपीत कपडे घातले असले तरी बोलण्याचा बाज उध्दट वाटत होता. गृहस्थ बहुदा पुण्याबाहेरील पाहुणे असावेत. कारण चितळे मास्तरांकडे कॅरी बॅग मागण्याचा गधडेपणा दुसरं कोण करणार? आता मालक काय उत्तर देतात, हे ऐकायला आम्ही ’अनुभवी पुणेकरांनी’ कान टवकारले.

मालक: (कपाळावरची रेषही ढळू न देता) “सॉरी, आम्ही कॅरी बॅग देऊ शकत नाही.”

गिर्‍हाईक: अहो, पण मग मी माल बाहेर कार पर्य़ंत नेणार कसा?

मालक: पिशवी आणली नाहीत वाटतं?

गिर्‍हाईक: अहो, ती जर असती तर मागितली असती का कॅरी बॅग?

मालक: हे बघा, कॅरी बॅग देणे कायद्याने गुन्हा आहे, तुम्हालाही ह्याची पूर्ण कल्पना आहे. कायदा मोडणे आम्हाला परवडणारं नाही.

(गिर्‍हाईकाने आता अंधारात एक तीर मारला.)

गिर्‍हाईक: आणि तुमच्या गावातल्या दुकानात कशी देतात मग?

मालक: तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आमचे नियम सगळीकडे सारखेच असतात. दुकान बदलले म्हणून नियम बदलत नाहीत आणि कॅरी बॅग देणे हे आमच्या नियमांत बसत नाही. (दुकानातील गिर्‍हाईकांमध्ये हलकासा हशा पसरतो.)

(तीर फुकट गेल्याने गिर्‍हाईक वैतागते. पण मागे न हटता दुसरा गुगली टाकते. गृहस्थांना बहुदा ’You Can Negotiate Anything’ सारखी मॅनेजमेंटची bestseller  पुस्तके नुकतीच वाचून त्याचा ज्वर चढला असावा. चितळे मास्तरांच्या दुकानात त्याचा यशस्वी वापर करायचाच ह्या हट्टाने पेटल्यासारखे बोलत होते. मधूनच अकारण इंग्रजीही पाजळत होते.)

गिर्‍हाईक: एवढ्या खरेदीवर तर तुमच्या पलिकडील ’जोशी’ वाले हव्या तेवढ्या कॅरी बॅग्ज देतील. मी त्यांच्याकडे जातो ना मग!

मालक: हे पहा, आमचे दुकान कॅरी बॅग्ज देण्याबद्द्ल प्रसिध्द नसून मालाच्या क्वालिटीबद्दल प्रसिध्द आहे!

गिर्‍हाईक: हे बघा मिस्टर, तुम्ही मुद्दाम विषय बदलता आहात. तुमच्या दुकानात आलेल्या गिर्‍हाईकाला मदत करण्याची मालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की नाही? तुम्ही माझ्यासारख्या गिर्‍हाईकाला काय मदत करीत आहात, ते सांगा बरं मला.

मालक: हं, आता तुम्ही मदत मागत आहात म्हणून सांगतो, पिशवी आणायला विसरलेल्या गिर्‍हाईकांसाठी आम्ही कापडी पिशव्यांची सोय केली आहे. हे एवढे सामान नेण्यासाठी मी तुम्हाला आमच्या दुकानातील दोन कापडी पिशव्या देऊ शकतो.

(आता गिर्‍हाईकाच्या चेहर्‍यावर मंद स्मित पसरते आणि तो विजयी मुद्रेने आपल्या बायकोकडे सूचकपणे पाहतो. “कसा आणला लाइनीवर?” पण हा आनंद पुढचे वाक्य ऐकून मावळतो!)

पिशव्यांचे तुम्हाला २० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.

गिर्‍हाईक: (संतापलेल्या स्वरात) अहो पण एवढी मोठी खरेदी केल्यावर तुम्ही पिशव्यांचे कसले पैसे चार्ज करताय?

मालक: (शांतपणे) हे पहा, मी तुम्हाला पिशव्यांची मदत करू शकतो, पैशांची नव्हे. शिवाय आमच्या पिशव्यांचीही क्वालिटी उत्तम आहे, मी स्वत: वापरतो. तुम्हालाही पुढे चांगल्या उपयोगी पडतील.

….

…..

ह्या घडीला आम्ही दोघे दुकानातून बाहेर पडलो, त्यामुळे पुढील संवाद काही ऐकले नाही. बाईकवर बसलो आणि बटण-स्टार्ट केली. बायकोही मागे बसली. आता गियर टाकून निघणार त्याआधी उत्सुकतेपोटी मान वळवून दुकानाकडे नजर टाकली. त्याची बायको आधीच गाडीत येऊन बसली होती आणि नवरोबा हातात चितळे मास्तरांच्या मिठाईने भरलेल्या दोन कापडी पिशव्या घेऊन, मान खाली घालून आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत बाहेर येताना दिसले. अर्थात विजय कोणाचा झाला हे वेगळं सांगायला नको.
आम्ही दोघेही गालातल्या गालात हसलो आणि मार्गस्थ झालो.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shankar N Kulkarni

चितळे जरी भिलवडीचे असले तरी अााता पुण्यात चाांगलेच मुरले अाहेत.

Shekhar Palkhe

very true!!! I have worked at their Swargate plant(Bakarwadi) as Works Manager for two years!!! They sell quality product and never compromise in quality.