श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? दाढी ! ! ?

First impression is…….

लेखाची सुरवात अशी एखाद्या अर्धवट सोडलेल्या इंग्रजी वाक्प्रचाराने केली की वाचकांवर इंप्रेशन पडतं, असं जाणकार म्हणतात ! खरं खोटं तेच जाणोत ! असो ! मी आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या लेखांची सुरवात मराठीतूनच केलेली आहे हे आपल्याला (ते लेख वाचले असतील तर!?) आठवत असेलच आणि हा माझा पहिलाच असा लेख आहे, की ज्याची सुरवात मी इंग्रजीतून केली आहे ! आता ती इंग्रजीतून केली आहे याच महत्वाचं कारण म्हणजे आजचा विषय, जो पुरुषांच्या जास्त जवळचा म्हणजेच दाढी, शेव्ह आणि “शेवेचा” विषय बायकांचा ! तसा “शेवेचा” उपयोग पुरुषांना ती खाण्यासाठी पण होतोच, यात वाद नाही पण “शेव” या शब्दात मी श्लेष साधलाय, हे चाणक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच !  त्यामुळे आजच्या लेखाची सुरवात मी इंग्रजीतून केल्ये हे बरोबरच आहे, हे आपण दाढी खाजवत (वाढली असेल तर) जाणकारां प्रमाणे (नसलात तरी) मान्य करायला हरकत नाही ! समजा, जर अखिल भारतीय केश कर्तनालयाचा प्रवक्ता “रोज दाढी करण्याचे फायदे” या विषयावर स्वतः अर्धा अर्धा इंच दाढीचे खुंट ठेवून बोलायला उभा राहिला, तर त्याच्या बोलण्यावर पब्लिक विश्वास तरी ठेवेल का ? म्हणूनच मी सुरवातीला असा अनेक वेळा घासून गुळगुळीत झालेला इंग्रजी वाक्प्रचार ठेवून दिला ! त्यामुळे अशा इंग्रजी वाक्प्रचाराने लेखाची सुरवात करून, उगाचच मी आपल्यावर इंप्रेशन मारतोय, हा आपल्या मनांत माझ्याविषयी झालेला गैरसमज कृपया आपण काढून टाकाल अशी मला आशा आहे ! तर, पुनः एकदा असो !

मुलांना वयात आल्यावर जसे त्यांच्या अकलेला (मुळात असेल तरच) धुमारे फुटायला लागतात, तसेच त्यांच्या गालावर, ओठांवर, हनुवठीवर बारीक बारीक केसांचे धुमारे फुटायला लागतात ! या दोन्ही धुमाऱ्यात फरक असा, की अकलेचे धुमारे फुटलेत हे त्याला, “जास्त अकलेचे दिवे पाजळू नकोस!” हा डायलॉग कधीतरी वडीलधाऱ्याकडून ऐकल्यावर कळतं आणि गालावरचे किंवा ओठावरचे धुमारे तसे दृगोचर असल्यामुळे तो मुलगा वयात आलाय हे इतर लोकांना कळतं !

माझ्या पिढीत, तारुण्यात पदार्पण करायच मुलांच वय साधारण सोळा ते अठरा होते.  हल्लीच्या (कली) युगात ते आणखीन खाली आलंय असं म्हणतात ! याची कारणं काय आहेत ? यावर दाढी खाजवता खाजवता उहापोह करायचा म्हटला, तरी या विषयातील विद्वजनांचे एक चर्चासत्र नक्कीच होईल ! एवढच कशाला, या विषयावर माने पर्यंत केस असलेला आणि आपल्या पांढऱ्या काळ्या (का काळ्या पांढऱ्या ?) दाढी मिशांनी आणि त्याच रंगाच्या जाड जाड केसांच्या भुवयांनी, आपला अर्ध्याहून अधिक चेहरा झाकला गेलाय असा विद्वान, मनांत आणेल तर भला मोठा प्रबंध नक्कीच खरडेल !

मी तरुण (शरीराने?) असतांना आमच्यातला एखादा उंटावरचा शहाणा मित्र, गप्पा मारता मारता “आपण बुवा नोकरी बिकरी करणार नाही तुमच्या सारखी, एक सॉलिड धंद्याची आयडिया आहे आपल्या डोक्यात !” असं त्या गप्पांच्या ओघात आम्हाला ऐकवायचा. मग त्या वर आमच्यापैकीच कोणीतरी एक मित्र त्याला, “खिशात नाही दाढी करायला दीड रुपया आणि गोष्टी करतोय दीड लाखाच्या !” असं ऐकवून त्याची टर उडवायचा आणि आम्ही बाकीचे त्यात सामील व्हायचो ! मंडळी, तेव्हा दाढी करायला सलून मधे खरोखरचं चक्क दीड रुपया पडत होता आणि दीड लाखात एक छोटासा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत होता, आहात कुठे !

आमच्या काळी कॉलेजला जाणारे सगळे तरुण, स्वतःला त्या काळातल्या  सिनेमातील अनेक “कुमारां” पैकी आपण एक आहोत, अशा चुकीच्या समजूतीतून पोरींवर इंप्रेशन मारायला, रोज गुळगुळीत दाढी करून कॉलेजला येत असत. त्या कुमारां पैकी जमतेम 2-3 टक्के कुमारांच सूत, स्वतःला कोणीतरी “कुमारी” अथवा “बाला” समजणाऱ्या बालिकांशी जमे आणि बाकीचे सगळे रोजचा दाढीचा खर्च वाचवून, त्या पैशातून “चार मिनार” नाहीतर “पनामा” पिऊन, मजनू बनून फिरत ! तसं बघायला गेलं तर, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी ही तेंव्हा तशी प्रेमभंग झाल्याची एक निशाणी होतीच, पण त्याच्या जोडीला, जर त्या मजनूच्या तोंडात वरील दोन पैकी कुठली सिगरेट असेल तर, त्याच्या मजनूपणावर आम्ही तेंव्हा शिक्कामोर्तब करत असू आणि जमलं तर अशा मजनू पासून शक्यतो चार हात लांबच कसं राहता येईल याचा विचार डोक्यात चालत असे ! त्याच एक कारण म्हणजे, उगाच कोणा “कुमारी” अथवा “बालाचे” आमच्या बाबतीत चांगले असलेले इंप्रेशन, खराब व्हायला नको म्हणून !

बैरागी बुवा किंवा एकुणात बुवा मंडळींना ओळखायचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांची वाढलेली दाढी ! तसं बघायला गेलं तर तो अशा लोकांचा “ट्रेड मार्कच” म्हणायला हवा ! पण हल्लीच्या कलियुगात वावरणाऱ्या आधुनिक “महाराज” आणि “बुवा” लोकांनी या भरघोस दाढीचा त्याग केलेला आपल्याला पहिला मिळेल ! त्याची कारण काय असतील ती असोत बापडी, पण मला विचाराल तर, प्रत्येक बुवांनी किंवा महाराजांनी दाढी ठेवणं खरच त्यांच्या हिताचं आहे, असं आपलं मला त्यांच्याच हितापोटी वाटतं ! म्हणजे कसं आहे ना, एखाद्या भक्ताने अशा बुवांना किंवा महाराजांना काही अवघड प्रश्न विचारून त्यांची पंचाईत केली, तर निदान दाढीवर हात फिरवून विचारात असल्याचे तरी भासवता येईल नां ? म्हणजे होईल काय, “बुडत्याला काडीचा आधार” या जुन्या म्हणीच्या जोडीला, मी तयार केलेली “बुवाला दाढीचा आधार” या नवीन म्हणीचा उद्गगाता म्हणून माझं नांव इतिहासात दर्ज व्हायला मदत तरी होईल! या माझ्या विधानाशी तुम्ही असलेली, नसलेली स्वतःची दाढी खाजवत सहमत व्हाल, अशी मी माझी स्वतःची “बुलगानीन” दाढी खाजवत आशा करतो !

जगात चांगली आणि वाईट अशी अनेक प्रकारची व्यसनं अस्तित्वात आहेत यात दुमत असण्याचं कारण नाही. आणि प्रत्येक प्राणीमात्र स्वतःला आवडणारी आणि कधीतरी खिशाला न परवडणारी व्यसनं सुद्धा आपापल्या परीने करत असतो आणि त्यात रमत असतो ! पण काही काही लोकांना दिवसातून तीन तीन वेळा दाढी करण्याचं व्यसन असतं आणि अशी माणसं माझ्या प्रमाणे तुमच्या पण पाहण्यात नक्कीच आली असतील ! या लोकांना ओळखायची एक सोप्पी पद्धत म्हणजे, त्या लोकांच्या गालांचा रंगच सततच्या ब्लेडच्या खरवडण्याने, बदलून चक्क हिरवा काळा झालेला असतो ! आता हे लोकं आपली दाढी दिवसातून तीन तीन वेळेस करून, कुणा कुणाला ती “टोचू” नये याची इतकी काळजी का घेतात, ते त्यांचे त्यांनाच माहित ! आपण उगाच कशाला त्यांच्या भानगडीत आपली दाढी, सॉरी नाक खुपसा !

काही काही अवलिया लोकांना, इतिहासात होऊन गेलेल्या पराक्रमी विरां प्रमाणे, आपल्या दाढी मिशीचा कट ठेवायला आवडतो ! अर्थात असे फक्त “दाढी मिशी वीर” खऱ्या आयुष्यात किती आणि कुठली विरता गाजवत असतील हा एक संशोधनाचा विषय होईल ! त्यांना त्यांच्या दाढी मिशीचा कट लखलाभ !

शेवटी, आपल्या सर्वांनाच, आपले स्वतःचे कुठलेही काम दुसऱ्याकडून वेळेवर करून घेण्यासाठी, (ते काम करणारा पुरुष असेल आणि त्याला दाढी असेल तर) त्याची दाढी कुरवाळायची वेळ येऊ देऊ नकोस, हिच त्या जगतनियंत्याच्या चरणी माझी प्रार्थना !

शुभं भवतु ! ?

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments