श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? पोपट ! ?
सूर्य मावळतीकडे कलला होता. आता अंधार पडायला सुरवात झाली होती.
सगळीकडे शांतता… आजूबाजूला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते. वाटेवर पावसाचं पाणी साचल्यामुळे चालताना पायाचा ‘पचक पचक’ असा आवाज तेवढा येत होता….
गण्याला आज घरी जायला जास्तच उशीर झाला होता, त्यात हा पाऊस. पण रस्ता पायखलाचा होता म्हणून ठीक, पण या पावसामुळे आधीच गावच्या रस्त्याला असलेले मिणमिणते दिवे गुल झाले होते. अजून घर येण्यासाठी त्याला भरपूर रस्ता कापायचा होता. आता चांगलाच अंधार पडला होता आणि अमावस्या असल्यामुळे तो जास्तच गडद आणि भीतीदायक वाटत होता. त्यातल्या त्यात त्या अंधारात त्याला हातातल्या मोबाईल मधल्या विजेरीचा काय तो आधार वाटत होता !
तसा गण्या धीट गडी, पण या अमावस्येच्या किर्र रात्री त्याला नको नको ते आवाज येत असल्याचे भास व्हायला लागले. रस्त्यातले ते नेहमीचे पिंपळाच्या पाराचे वळण आले. गण्या मनांत खरंच घाबरला आणि मोठ मोठ्या आवाजात रामरक्षा म्हणू लागला. त्यात बहुतेक मोबाईलची बॅटरी डाउन झाल्यामुळे मोबाईलची विजेरी पण फडफडायला लागली आणि पाराचे वळण येण्या आधीच तिने अखेरचा श्वास घेतला व गण्याच्या डोळयांपुढे काळोख पसरला. तेवढ्यात पारा खालून त्याला कोणीतरी हसल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच मागे वळून न बघता गण्या घराकडे तिरासारखा धावत सुटला. तो थोडा धावला असेल नसेल तोच पुन्हा एकदा त्या हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला, त्या बरोबर गण्या अंगातली होती नव्हती ती शक्ती एकवटून पुन्हा घराच्या दिशेने जोरात धावत सुटला. थोडं पुढे आल्यावर गण्या धीर एकवटून रस्त्यात थांबला व त्या आवाजाचा कानोसा घ्यायचा त्याने पुन्हा प्रयत्न केला. पण आता तो आवाज काही त्याच्या कानी पडला नाही. आता घर पण टप्प्यात आलं होतं त्यामुळे त्याच्या जीवात जीव आला.
घरी आल्या आल्या काहीच न बोलता हात पाय धुवून तो जेवायला बसला. जेवताना पण गप्प गप्प ! शेवटी बायकोने न राहून विचारलंच “आज जेवणात काही कमी जास्त झालंय का?” “नाही” “मग आज एकदम गप्प गप्प, कुणाशी भांडण वगैरे?” बायकोला त्या आवाजबद्दल सांगावे का नाही या विचारात त्याच्या तोंडून “काही नाही गं, थोडी कणकण वाटत्ये, म्हणून…” “अगं बाई, मग असं करा जेवण करून, मी काढा करते तो प्या आणि झोपा बघू, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.” “बरं” इतकंच म्हणून गण्यान जेवण आटोपत घेतलं आणि तो पलंगावर आडवा झाला. पण निद्रादेवी काही प्रसन्न व्हायचं लक्षण दिसेना. त्यात पुन्हा त्याच्या कानात तो मगाचा हसण्याचा आवाज येत राहिला. कोण हसत असेल? त्या पारावर भूत खेत असल्याच्या वावड्या त्याने लहानपणा पासून ऐकल्या होत्या. त्यात आजची अमावस्येची रात्र, विचार कर करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला. तेवढ्यात बायको काढा घेऊन आली. गाण्याने निमूटपणे काढा घेतला आणि डोक्यावर परत पांघरूण घेऊन निद्रादेवीची आराधना करू लागला. पण तो हसण्याचा आवाज काही त्याची पाठ सोडत नव्हता. विचार कर करून शेवटी त्याचा मेंदू थकला आणि पहाटे पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.
सकाळी गण्या नेहमी प्रमाणे आवरून शाळेला निघाला. आज पावसाचा मागमूस नव्हता, लख्ख ऊन पडले होते. पण कालचा हसण्याचा आवाज काही त्याच्या मनातून जात नव्हता. रस्त्यातला नेहमीचा पिंपळाचा पार आला आणि आज शाळेचा रस्ता बदलावा का, या विचारात असतांनाच त्याचे लक्ष पाराकडे गेले. पारा जवळ म्हादू काहीतरी शोधत असल्याचे त्याला दिसले. गण्याने पुढे होतं “म्हादबा सकाळी सकाळी काय शोधताय पारा जवळ?” “नमस्कार मास्तर. काल पासून मोबाईल हरवला आहे माझा.” “अहो मग घरी शोधा ना, इथे पाराजवळ कशाला….” “मास्तर, काल रात्री घरी मुलाच्या मोबाईल वरून कॉल करून बघितला, बेल वाजत्ये पण घरात कुठेच नाही मिळाला.” “पण मग तो पारा जवळ शोधायच कारण काय?” “मास्तर, आता वय झालं, काल आम्ही मित्र मंडळी इथंच पारावर गप्पा मारत होतो, तेवढ्यात पाऊस यायला लागला. माझ्याकडे छत्री नव्हती” “मग?” “मग मी माझा मोबाईल इथेच कुठे तरी ठेवला, पण तो नक्की कुठे ठेवला हे आठवत नाही बघा.” “अस्स ! मी काही मदत करू का तुम्हाला मोबाईल शोधायला?” “मास्तर तुमच्याकडे मोबाईल आहे ना?” “हो आहे ना” असं म्हणून गण्याने खिशात हात घालून आपला मोबाईल काढला. “हां, मास्तर आता एक काम करा.” “बोला म्हादबा.” “तुमच्या मोबाईल वरून मला फोन लावा बघू.” गण्याने म्हादबाने सांगितलेल्या नंबर वर फोन लावला आणि पिंपळाच्या झाडाच्या ढोलीतून कुणीतरी कालच्या सारखं हसल्याचा आवाज गण्याला आला ! त्या बरोबर “मिळाला, मिळाला” असं आनंदाने ओरडत म्हादबा त्या ढोली जवळ गेला आणि त्याने आतून आपला मोबाईल काढून गण्याला दाखवला, जो अजून जोर जोरात काल रात्री सारखं हसतच होता ! आणि ते हसणं ऐकून गण्या पण कधी हसायला लागला ते त्याच त्यालाच कळलं नाही !
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈