श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? ? छत्री आणि मास्क !
“नमस्कार पंत, शुभ सकाळ !”
“अरे मोरू, ये, ये, आज बरेच दिवसांनी स्वारी उगवली म्हणायची !”
“तसं नाही पंत, मी तुमचा पेपर तुमच्या आधी रोज घरी नेवून वाचतो आणि गुपचूप आणून ठेवतो, हे तुम्हाल माहित आहेच.”
“अरे हो, आमचा पेपर माझ्या आधी तू वाचणे, हा मी तुझा जन्मसिद्ध हक्कच मानतो रे, पण आज पेपर ठेवतांना हाक मारलीस नां म्हणून विचारलं !”
“पंत काय आहे ना, आज जरा फुरसत आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणाल तर, बरेच दिवसात काकूंच्या हातचा, फडक्यातून गाळलेल्या फक्कडशा आल्याच्या चहाने घसा ओला झाला नाही नां, म्हणून म्हटलं हाक मारावी तुम्हाला, म्हणजे गप्पा मारता मारता आपोआप चहा पण मिळेल !”
“असं होय, कळलं, कळलं ! अग ऐकलंस का, मोऱ्या आलाय बरेच दिवसांनी, जरा चहा टाक बरं.”
“पंत, तुमचा पण व्हायचाच असेल ना अजून ?”
“अरे गाढवा, मला काय तुझ्या सारखा सूर्यवंशी समजलास की काय ? माझा झालाय एकदा, पण आता या पावसाळी वातावरणात घेईन परत ! बरं मोरू मला एक सांग, तू हल्ली एवढा बिझी कसा काय झालास एकदम ?”
“अहो एकुलत्या एक बायकोला मदत, दुसरं काय ?”
“एकुलत्या एक बायकोला म्हणजे ? आम्ही बाकीचे सगळे नवरे तुला काय कृष्णाचे अवतार वाटलो की काय ?”
“तसं नाही पंत, माझी ही एक बोलायची स्टाईल आहे, इतकंच !”
“कळली तुझी स्टाईल आणि हो, आलंय माझ्या कानावर, आजकाल तुझ्या कौन्सीलींग करणाऱ्या बायकोची प्रॅक्टिस खूपच जोरात चालली आहे म्हणे ? चांगलंच आहे ते, पण तिची प्रॅक्टिस अशी अचानक वाढायचं कारण काय मोरू ?”
“काय सांगू पंत तुम्हांला, ही सगळी त्या करोनाची कृपा !”
“आता यात करोना कुठनं आला मधेच ?”
“सांगतो, सांगतो पंत, जरा धीर धरा ना प्लिज !”
“अरे धीर काय धरा मोरू ? तुझ्या बायकोच्या वाढलेल्या प्रॅक्टिसचा आणि करोनाचा सबंध असायला ती काय डॉक्टर थोडीच आहे ?”
“नाही पंत!”
“मग, अरे कौन्सीलींग करते ना ती ? का तिनं कौन्सीलींग करता करता, स्वतःची कुठली नवीन लस करोनावर शोधल्ये आणि ती तर नाही ना देत सुटल्ये लोकांना ?”
“काही तरीच काय हो तुमच पंत, अहो ती कौन्सीलींगच करते आणि डायव्होर्स घेण्यापूर्वी कौन्सीलींग करून डायव्होर्सघेण्या पासून दोघांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात तिची स्पेशालिटी आहे, हे तुम्हाला पण …..”
“माहित आहे रे, पण तिची प्रॅक्टिस अशी एकदम वाढण्याचा आणि करोनाचा सबंध काय ?”
“अहो पंत, हल्ली करोनामुळे नवरा बायको दोघं घरात, कारण वर्क फ्रॉम होम !”
“बरोबर, पण…”
“आणि हल्ली कामवाल्या मावशीपण कामाला येऊ शकत नाहीत, मग रोज रोज ‘होम वर्क’ कोण करणार ?”
“बरोबर नव्या नवलाईचे कामाचे नऊ दिवस संपले की……”
“त्या वरून प्रथम वाद, रुसवे फुगवे, मग त्यातून विसंवाद आणि पुढे कधीतरी त्याचे पर्यवसान कोणीतरी हात उचलण्यात आणि मग त्याची परिणिती घटस्फोट मागण्या पर्यंत गेली की अशा नवरा बायकोच्या केसेस….”
“तुझ्या बायकोकडे, बरोबर ?”
“बरोब्बर पंत !”
“मोरू, ही आजची तुमची पिढी अशा क्षुल्लक कारणावरून घटस्फोटा पर्यंत जाते म्हणजे कमालच झाली म्हणायची !”
“अहो पंत, हे वाद विवाद म्हणजे अनेक कारणांपैकी एक कारण !”
“म्हणजे, मी नाही समजलो !”
“अहो याच्या जोडीला, नोकरीचे टेन्शन, वेगवेगळे स्ट्रेस, कोणाची नोकरी गेलेली, करोनामुळे फायनांशिअल क्रायसिस, एक ना अनेक कारण !”
“असं आहे तर एकंदरीत !”
“पण पंत या सगळ्यात, सध्या अशा केसेस मध्ये एक नंबरवर, घटस्फोटापर्यंत केस जाण्याचं एक नवीन आणि वेगळंच कारण गाजतंय!”
“परत तू कोड्यात बोलायला लागलास मोऱ्या ! अग ऐकलंस का ? चहा नको टाकूस, मोरूला वेळ नाही चहा प्यायला, असं म्हणतोय तो !”
“काय पंत एका चहासाठी…..”
“बघितलंस, आम्ही कसं सरळ सगळ्यांना कळेल असं बोलतो ! उगाच ताकाला जाऊन भांड लपवायची सवय नाही आमच्या पिढीला !”
“सांगतो सांगतो पंत, सध्या एक नंबरवर कुठलं भारी कारण आहे ते !”
“हां, आता कसं, बोल !”
“पंत, हल्ली काय होतं ना, लॉकडाऊन शिथिल झाला रे झाला, की तमाम जोडपी खरेदीला बाहेर पडतात ! मग हीsss झुंबड उडते बाजारात !”
“अरे पण मोरू त्यांचे ते वागण बरोबरच नां, सरकारने दिलेल्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नको का करायला प्रत्येकाने ?”
“हवी नां, मी कुठे नाही म्हणतो ?”
“मग !”
“अहो पण बाजारातून येतांना, आपल्याच नवऱ्या किंवा आपल्याच बायको बरोबर आपण घरी परत आलोय याची खात्री नको का करायला ?”
“अर्थात, पण त्याचा येथे काय संबंध मी नाही समजलो ?”
“अहो पंत, आजकाल मास्क लावल्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी नवरा बायको, चुकून बदलण्याच प्रमाण खूपच वाढलंय, आता बोला !”
“काय सांगतोस काय मोऱ्या, हे असं खरंच घडतंय ह्याच्यावर विश्वास बसत नाही माझा !”
“सांगतोय काय मी पंत आणि अशा प्रसंगात मग गैरसमज, दोघांचे एकमेकावर आरोप, प्रत्यारोप, तुझं आधी पासूनच लफडं असणार, वगैरे वगैरे.”
“अरे बापरे, खरंच कठीण आहे तुमच्या पिढीच.”
“आणि म्हणून माझ्या बायकोच्या कौन्सीलींगच्या केसेस वाढायला करोना कारणीभूत आहे असं म्हटलं मी पंत !”
“हां, हे पटलं मला मोरू, पण यात तुझी बायको बिझी झाली तर मी समजू शकतो, पण तू बिझी कशामुळे झालास ते सांग ना !”
“अहो तिला मदत करतो ना म्हणून…”
“अरे गधड्या कसली मदत करतोस तुझ्या बायकोला ते सांगशील की नाही ?”
“अहो माझं भरत कामाचं शिक्षण मला या कामी उपयोगी पडलं बघा!”
“तू आता परत कोड्यात बोलायला लागलायस, आता चहाच काय पाणी पण नाही मिळणार तुला ! अगं ए…”
“थांबा थांबा पंत, सांगतो!”
“बोल मग आता चट चट.”
“पंत, अशा मास्कच्या 99% केसेस या निव्वळ गैरसमजातून हिच्याकडे आलेल्या असतात आणि काट्याने जसा काटा काढतात, तसा यावर उपाय म्हणून त्यांना आम्ही स्वतः बनवलेले मास्कच वापरायला देतो !”
“म्हणजे, मला नीट कळलं नाही, जरा उलगडून सांगशील का ह्या मास्कची भानगड ?”
“अहो सोप्प आहे, ही प्रथम दोघांची समजूत काढते आणि नंतर त्या दोघांना आम्ही त्यांच संपूर्ण नांव ठळक अक्षरात असलेले मास्क वापरायला देतो !”
“अच्छा !”
“आणि त्या दोघांना ताकीद देतो की घराबाहेर पडतांना आम्ही दिलेलेच मास्क वापरायचे, म्हणजे आपली बायको कोण आणि आपला नवरा कोण हे ओळखणे सोपे जाईल आणि…..”
“चुकून नवरा किंवा बायकोची अदलाबदल होणार नाही, असंच ना ?”
“बरोबर !”
“अरे पण मास्क धुतांना त्याच्यावरचे नांव गेले तर, पुन्हा पंचाईत नाही का दोघांची ?”
“अहो पंत, म्हणून तर मी मगाशी म्हटलं ना, की माझं भरतकामाचं शिक्षण कामी आलं म्हणून !”
“म्हणजे रे मोरू ?”
“अहो म्हणजे मी प्रत्येकाला द्यायच्या कापडी मास्कवर, त्यांची सबंध नांव रंगीत रेशमाने भरतकाम करून लिहून देतो !”
“अस्स होय, म्हणून तू हल्ली बिझी असतोस तर !”
“हो ना पंत !”
“म्हणजे मोऱ्या जुनी झालेली फ्याशन नंतर परत येते म्हणतात, ते खोटं नाही तर !”
“आता पंत तुम्ही कोड्यात बोलायला लागलात ! तुमच्या लहानपणी कुठे करोना होता आणि त्यामुळे मास्कची भानगड असायचा प्रश्नच नव्हता तेंव्हा.”
“बरोबर, पण आता फक्त तेंव्हाच्या छत्रीची जागा या मास्कने घेतल्ये इतकंच !”
“म्हणजे काय पंत ?”
“अरे तेंव्हा बाजारातून घरी नवीन छत्री आली की, त्याच्यावर नांव पेंट केल्यावरच ती छत्री आम्हाला वापरायला मिळत असे ! कारण तेव्हा सगळ्याच छत्र्या काळ्या रंगाच्या, मग आपली छत्री चुकून हरवली तर….”
“आपले छत्रीवरचे नांव बघून ओळखायची, बरोबर पंत ?”
“बरोब्बर, म्हणजे मोरू शेवटी ‘नामाचा महिमा’ म्हणतात ते काही खोटं नाही तर!”
“धन्य आहे तुमची पंत !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈