श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
? धूर, उग्र वास आणि डिवोर्स ! ??
“पंत हा तुमचा पेपर !”
“अगं सुनबाई आज तू कशी काय आलीस, नेहमी मोरू येतो पेपर द्यायला !”
“पंत मीच यांना म्हटलं, आज मी पेपर देऊन येते.”
“बरं बरं, पण त्या मागे काही खास कारण असणारच तुझं, होय ना ?”
“बरोब्बर ओळखलत पंत, नेहमी तुम्ही यांना सल्ले देता नां, आज मला तुमचा सल्ला हवाय.”
“अगं मी कसले सल्ले देणार, काहीतरी अनुभवाच्या जोरावर बोलतो इतकंच ! बरं पण मला सांग मोरू बरा आहे ना?”
“त्यांना काय धाड भरल्ये ? मी पेपर नेवून देते म्हटल्यावर परत डोक्यावर पांघरूण घेऊन आडवे झालेत!”
“असू दे गं, दमला असेल तो!”
“त्यांना दमायला काय झालय, सगळे नवीन शौक व्यवस्थित चालू आहेत त्यांचे घरातल्या घरात, गुपचूप !”
“मोऱ्याचे कसले नवीन शौक ? मला काही कळेल असं बोलशील का जरा ?”
“पंत, मला नक्की खात्री आहे, यांना पण त्या कोण आर्यन का फार्यन सारख, बॉलिवूडला लागलेलं नको ते व्यसन लागलंय!”
“काय बोलतेस काय तू ? मोऱ्या आणि ड्रग्जच्या आहारी ?”
“हो नां, म्हणून तर मला डिवोर्स हवाय यांच्या पासून आणि तो कसा मिळवायचा हेच विचारायला मी तुमचा पेपर परत करायच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आले !”
“अगं अशी घायकुतीला येऊ नकोस, मला जरा नीट सांगशील का, तुला असं वाटलंच कसं की मोऱ्या ड्रग्जच्या आहारी गेलाय म्हणून ?”
“अहो पंत, तुम्हाला म्हूणन सांगते, कोणाला सांगू नका, हे हल्ली अंघोळ करून बाहेर आले, की रोज बेडरूम मधे जातात आणि आतून कडी लावून अर्ध्या पाऊण तासाने बाहेर येतात !”
“यावरून तू डायरेक्ट मोऱ्या ड्रग्ज घेतो या निष्कर्षांवर येवून, एकदम डिवोर्सची भाषा करायला लागलीस ?”
“पंत एवढच नाही, हे बाहेर आले की बेडरूम मधून एक उग्र वास आणि धूर जाणवतो मला !”
“मग त्याला तू विचारलंस का नाही, हा धूर आणि उग्र वास कसला येतोय म्हणून ?”
“विचारलं ना मी पंत, मी सोडते की काय त्यांना !”
“मग काय म्हणाला मोऱ्या ?”
“मला म्हणाले, सध्या मी सर्दीने हैराण झालोय आणि त्यावर एक घरगुती उपाय करतोय म्हणून !”
“अगं मग तसंच असेल ना, उगाच तू त्याला ड्रग्जच व्यसन लागलंय….”
“पण पंत, तो उपाय माझ्यासमोर करायला काय हरकत आहे यांना ? बेडरूम मधे बसून कडया लावून कशाला करायचा ? ते काही नाही मला डिवोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे!”
“ठीक आहे, ठीक आहे, तुला डिवोर्स हवाय ना, मी तुला मदत करीन, तू काही काळजी करू नकोस, ok !”
“पंत मला वाटलंच होतं तुम्ही मला मदत कराल म्हणून.”
“हो, पण त्याच्या आधी मला सांग, मोऱ्याला पगार किती मिळतो महिन्याला ?”
“तसं बघा, सगळं हप्ते, टॅक्स जाऊन तीस एक हजार मिळतो !”
“आणि तो सगळा तो तुझ्या हातात आणून देतो की त्याच्या जवळच ठेवतो ?”
“अहो हे पगार झाल्या झाल्या लगेच माझ्या हातात देतात मी तो देवा समोर ठेवून नंतर माझ्याकडेच ठेवते बघा पंत !”
“आणि मोऱ्याला खर्चाला….”
“ते मागतात तसे मी त्यांना देते की !”
“मग आता तू निश्चिन्त मनाने घरी जा, कसलीच काळजी करू नकोस !”
“पण पंत माझ्या डिवोर्सच काय ?”
“अगं तुझ्या मोऱ्याला मी अर्ध्या चड्डीत असल्या पासून ओळखतोय! त्याला सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही आणि आज एकदम तू ड्रग्ज…”
“पण पंत माणूस बदलतो मोठा झाल्यावर वाईट संगतीत, तसं काहीस…”
“अगं एक लक्षात घे, मोऱ्याचा पाच वर्षाचा पगार एकत्र केलास तरी त्यातून पाच ग्राम पण ड्रग्ज येणार नाहीत !”
“काय सांगताय पंत, तुम्हाला कसं कळलं ?”
“अगं पेपर मधे बातम्यातून कळते ना त्या ड्रग्जची किंमत, त्यामुळे तू डोक्यातून मोऱ्याच्या ड्रग्जच्या व्यसनाचं खूळ काढून टाक ! ती सगळी बड्या मशहूर पैशाने सगळी भौतिक सुख विकत घेणाऱ्या धेंडांची व्यसन ! आपण निम्न मध्यमवर्गीय, महिन्याची तीस तारीख गाठता गाठता काय काय दिव्य करायला लागतात ते आपल्यालाच ठाऊक !”
“ते सगळं बरोबर पंत, पण मग त्या धुराच आणि उग्र वासाच काय ?”
“अगं कोकणातली ना तू, मग तुला सर्दी वरचा घरगुती उपाय माहित नाही ?”
“खरंच नाही माहित पंत !”
“अगं तो दीड शहाणा बेडरूम मध्ये ओव्याची धूम्रनलिका ओढत असणार, दुसरं काय !”
“धूम्रनलिका म्हणजे ?”
“अगं ओव्याची सिगरेट बनवून ओढत असणार आणि त्याचाच तुला उग्र वास आला असणार आणि धूर दिसला असणार, कळलं !”
“अग्गो बाई, किती वेंधळी मी, उगाच सुतावरून स्वर्ग गाठायला गेले ! धन्यवाद हं पंत, आज तुम्ही माझे डोळे उघडलेत ! आता मी या जन्मात डिवोर्सची भाषा करणार नाही ! येते पंत, नमस्कार करते !”
“अखंड सौभाग्यवती भव !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
२५-१०-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈