श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
99.99% विरुद्ध 100% !
“नमस्कार पंत !”
“नमस्कार मोरू !”
“हा काकूंनी सांगितलेला तुमचा मोती साबण !”
“बर झालं, माझी खेप वाचली. बस, हिला चहा करायला सांगतो. अग ए, ऐकलंस का, मोरू आलाय जरा …..”
“नको नको पंत, उशीर होईल, अजून चाळीतल्या बाकीच्यांच्या ऑर्डरचा माल पण पोचवायचा आहे.”
“पण काय रे मोरू, तुझ्या पिशवीत आमचा एकुलता एक मोती साबण आणि दोन म्हैसूर सँडल साबण सोडले, तर बाकीचे सगळे डेटॉल साबणच दिसतायत मला !”
“तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे पंत. यातला एक म्हैसूर सँडल जोशी काकांचा आणि दुसरा लेले काकांचा !”
“आणि बाकी चाळीतले सगळे लोकं यंदा दिवाळीला काय डेटॉल साबण लावून अभ्यँग स्नान करणार आहेत की काय ?”
“हो ना पंत, तुम्ही त्या डेटॉलवाल्यांची टीव्हीवरची जाहिरात नाही का बघितलीत ?”
“नाही बुवा, कसली जाहिरात ?”
“अहो पंत, सध्या त्या करोनाच्या विषाणूने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे आणि ते डेटॉलवाले जाहिरातीत म्हणतात की, आमचा साबण 99.99% विषाणू मारतो.”
“म्हणून सगळ्यांनी डेटॉल साबणाची ऑर्डर दिली की काय मोरू ?”
“हो ना पंत, मग मी तरी काय करणार ? तुमची तीन घर सोडून, आणले सगळ्यांना डेटॉल साबण !”
“मोरू, अरे हे फसव्या जाहिरातीच युग आहे, हे कळत कसं नाही लोकांना ?”
“आता नाही कळत त्यांना, तर आपण काय करणार पंत ?”
“बरोबर, आपण काहीच करू शकत नाही. अरे तुला सांगतो आमचा राजेश एवढा हुशार, पण तो सुद्धा एकदा अशा जाहिरातबाजीला फसला होता म्हणजे बघ.”
“काय सांगता काय पंत ?”
“हो ना, अरे त्याच काय झालं दोन वर्षापूर्वी तो एका सेमिनारला जपानला गेला होता…..”
“बापरे, म्हणजे जपान मध्ये सुद्धा अशी फसवाफसवी चालते ?”
“नाही रे, थोडी चूक राजेशची पण होती.”
“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो ?”
“अरे त्याच काय झालं, तिथे एका दुकानात त्याला एक पांढरा साबण दिसला, ज्याच्यावर लिहिल होत, ‘ऍलर्जी फ्री, कुठल्याही प्रकारचे विषाणू, जीवजंतू 100% मारतो !”
“मग काय केलं राजेशने, घेतला का तो साबण ?”
“हो ना, चक्क आपले सहाशे रुपये मोजून एक वडी घेतली पठयाने.”
“बापरे, सहाशे रुपयाची एक साबण वडी ? पंत, याच पैशात आपल्याकडे कमीत कमी 12 लक्स आले असते आणि वर्षभर तरी पुरले असते !”
“अरे खरी मजा पुढेच आहे, हॉटेल मधे येवून त्याने त्या साबणाचे रॅपर काढले तर काय, आत साबणाच्या आकाराची तुरटीची वडी, आता बोल ?”
“पंत, म्हणजे ते जापनीज लोकं साबण म्हणून तुरटी विकत होते ?”
“हो ना, पण त्यात त्या लोकांची काय चूक ? अरे तुरटीच्या अंगी जंतूनाशकाचा गुण अंगीभूतच असतो हे तुला माहित नाही का ?”
“हो माहित आहे पंत, आम्ही गावाला गढूळ पाणी शुद्ध करायला त्यात तुरटी फिरवायचो.”
“बरोबर, तर त्याच तुरटीचा त्यांनी साबण करून विकला तर त्यांची काय चूक ? अरे तुला सांगतो, आम्ही सुद्धा पूर्वी दाढी झाल्यावर तुरटीचा खडा फिरवायचो चेहऱ्यावर, तुमच्या या हल्लीच्या आफ्टरशेव लोशनचे चोचले कुठे होते तेंव्हा ?”
“पंत या जाहिरातीच्या युगात, काय खरं काय खोटं तेच कळेनास झालं आहे. बर आता निघतो बाकीचे लोकं पण वाट बघत….”
“जायच्या आधी मोरू मला एक सांग, चाळीतल्या इतर लोकांसारखा तू पण डेटॉल साबणच वापरणार आहेस का दिवाळीला ?”
“नाही पंत, ते डेटॉलवाले त्यांचा साबण 99.99% विषाणू मारतो असं सांगतात, पण मी या विषाणूवर माझ्यापुरता 100% जालीम उपाय शोधून काढला आहे!”
“असं, कोणता उपाय ?”
“अहो मी चाळीतली खोली भाड्याने देवून…..”
“अरे काय बोलतोयस काय मोरू, तुला कोणी चाळीत कसला त्रास दिला का ? तसं असेल तर मला सांग, मी बघतो एकेकाला.”
“नाही पंत, त्रास वगैरे काही नाही….”
“मग असा टोकाचा निर्णय का घेतलास आणि तुझी खोली भाड्याने देवून तू कुठे रहायला जाणार आहेस ?”
“आपल्या चाळीपासून जवळच असलेल्या संगम नगर मधे !”
“अरे काय बोलतोयस काय मोरू ? तिथे आमच्याकडे काम करणाऱ्या सखूबाई, जोश्याकडे काम करणाऱ्या पारूबाई राहतात आणि ती एक अनधिकृत वस्ती आहे तुला माहित …..”
“आहे पंत, ती एक अनधिकृत वस्ती आहे ते….”
“आणि तरी सुद्धा तुला तिथे रहायला जायचय ?”
“हो पंत, कारण सध्याच्या करोनाच्या काळात, मुंबईतल्या अशा वस्त्याच जास्त सेफ असल्याचा खात्रीलायक रिपोर्ट आला आहे ! त्यासाठीच मी माझ्या कुटूंबासकट हे करोनाचे संकट टळे पर्यंत संगम नगर मधे राहण्याचा निर्णय घेतला आहे.”
“धन्य, धन्य आहे तुझी मोरू !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
२५-१०-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈