श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
मोरू आणि चमत्कार !
“पंत… पंत… पंत…”
“अरे मोरू, असं ओरडायला काय झालं, आग लागल्या सारखं ?”
“पंत आगच लागल्ये, पण ती न दिसणारी आहे !”
“आता हा कुठला आगीचा नवीन प्रकार मोरू ?”
“अहो माझ्या हृदयात लागलेली आग तुम्हाला कशी दिसेल ?”
“अरे आग बिग काही नाही, ऍसिडिटी झाली असेल तुला मोरू !”
“नाही हो पंत, ऍसिडिटी वगैरे काही नाही ! त्याच काय झालंय, गेल्या वेळेस तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी माझ्या बायकोकडून मिळणारे सगळे प्रोटीन्सचे डोस, निमूटपणे घेत होतो.”
“मग आता काय झाले मोरू ?”
“पंत, पण हा माझा मवाळपणा समजून, माझी ही मला हरभऱ्याचा डोस हल्ली जरा जास्तच प्रमाणात द्यायला लागली आहे बघा !”
“मग बरंच आहे ना रे मोरू, बायको खूष तर घर पण कसं शांत शांत !”
“अहो पंत, पण त्या हरभऱ्याच्या डोसांमुळे माझा खिसा फाटायची वेळ आल्ये, त्याच काय ?”
“म्हणजे, मी नाही समजलो मोरू ?”
“अहो ही हल्ली गोड गोड बोलून, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवते आणि एक एक नवीन नवीन मागण्या पदरात पाडून घेते आणि त्या पुरवता पुरवता माझ्या खिशाला मोठ मोठी भोक पडायला लागली आहेत त्याच काय ?”
“अस्स, मग आता तू काय करायच ठरवलं आहेस मोरू ?”
“पंत, मी ही गोष्ट काल माझ्या शेजारच्या राणे काकांना सांगितली.”
“बरं, मग !”
“त्यांनी लगेच त्यांच्या ओळखीतल्या भगताला मोबाईल करून यावर उपाय विचारला.”
“मग काय उपाय सांगितला त्या भगताने ?”
“तो भगत म्हणाला, अमावस्येच्या रात्री हरभऱ्याच्या झाडाखाली उलट्या पिसाची काळी कोंबडी…..”
“मोरू, अरे तुझा या असल्या अंधश्रद्धेवर विश्वास आहे ?”
“अजिबात नाही पंत, मी पण राणे काकांना सांगितलं, की मी असला काही अघोरी प्रकार करणार नाही म्हणून.”
“हे बरं केलंस मोरू !”
“पण पंत, आमचे बोलण चालू असतांना तिथे नेमके सावंत काका येवून टपकले !”
“आणि त्या सावत्याचा आणि त्या राण्याचा छत्तीसचा आकडा, होय ना ?”
“बरोबर ! मग सावंत काकांनी पण इरेला पेटून त्यांच्या भगताला फोन लावला.”
“अरे बापरे, म्हणजे तुझी फारच पंचाईत झाली असेल ना त्या दोघांच्या मधे मोरू ?”
“हो ना पंत, पण मी तरी काय करणार होतो गप्प बसण्याशिवाय !”
“अरे पण सावंताच्या भगताने काय उपाय सांगितला यावर ?”
“तो तर जास्तच खतरनाक होता पंत !”
“म्हणजे ?”
“तो म्हणला, अमावस्येची रात्र बरोबर आहे, पण कोंबडीच्या ऐवजी एकशिंगी बोकडाचा….”
“खरच कठीण आहे या लोकांच, आपलं काम होण्यासाठी त्या निष्पाप प्राण्यांना उगाच….”
“पण पंत मी ह्या पैकी काहीच करणार नाहीये, तुम्ही निर्धास्त असा !”
“मोरू, हे बरीक चांगले करतोयस तू !”
“हे जरी खरं असलं पंत, तरी माझे खिसे आणखी फाटायच्या आधी, आता यावर उपाय काय तो तुम्हीच सांगा म्हणजे झालं !”
“तसा एक उपाय आहे माझ्या डोक्यात मोरू !”
“सांगा पंत, लवकर सांगा, लगेच करून टाकतो तो उपाय आणि ह्या त्रासा पासून सुटका करून घेतो माझी !”
“अरे जरा धीर धर, हा उपाय पण तसा सोपा नाहीये बरं. या साठी तुला कित्येक रात्री आपल्या गच्चीवर प्रतीक्षा करावी लागेल.”
“असं रहस्यमय बोलून माझी उत्कंठा आणखी वाढवू नका पंत !”
“अरे मोरू, आपल्याकडे असा एक पिढीजात समज आहे, की जर तुम्ही रात्रीच्या वेळेस एखादा तारा निखळतांना बघितलात आणि त्या वेळेस एखादी इच्छा मनांत धरलीत तर…..”
“ती नक्की पूर्ण होते, बरोबर ना पंत ?”
“म्हणजे हा उपाय तुला माहित होता मोरू ?”
“पंत, नुसता माहित होता असं नाही, तर हा उपाय पण करून झाला आहे माझा !”
“तुला कोणी सांगितला हा उपाय ?”
“पहिल्या मजल्यावरच्या चव्हाण काकांनी.”
“मग त्याचा तुला काहीच उपयोग झाला नाही मोरू ?”
“पंत त्या उपायची पण एक गंमतच झाली !”
“म्हणजे ?”
“अहो चव्हाण काकांच्या सांगण्यावरून मी सतत तिन रात्री गच्चीवर जागून काढल्यावर, चवथ्या दिवशी मला एक तारा निखळतांना दिसला.”
“बरं, मग ?”
“पंत, मी लगेच माझ्या मनांत इच्छा धरली की मला माझ्या बायकोकडून मिळणारे हरभऱ्याचे डोस ताबडतोब बंद कर आणि चमत्कारच झाला !”
“कसला चमत्कार मोरू ?”
“अहो पंत, तो तारा पडतांना मी इच्छा मनांत धरायचाच अवकाश, तो तारा आपल्या जागेवर परत गेला, आता बोला !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
२५-१०-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈