श्री अरविंद लिमये
विविधा
☆ चविष्ट चटकदार मसाला..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
खोटं बोलणे आणि थापा मारणे यात कांही अंशी अवगुणात्मक फरक नक्कीच आहे.खोटं नेहमी स्वार्थासाठीच बोललं जातं असं नाही.समोरच्या माणसाला त्याच्याच हितासाठी कांही काळ अंधारात ठेवण्याच्या उद्देशाने खरं सांगणं योग्य नसेल तिथं खोट्याचा आधार घ्यावा लागतोच.एरवी बऱ्याचदा खोटं बोललं जातं ते भितीपोटी, स्वार्थापोटी,किंवा स्वतःची कातडी बचावण्यासाठीही.बेमालूम खोटं बोलणं सर्रास सर्वांना जमतंच असं नाही.तीही एक अंगभूत कलाच म्हणावी लागेल आणि नित्य सरावाने ते कलाकार त्यात पारंगतही होत असावेत.
थाप मारणे ही क्रिया मात्र मला उत्स्फुर्तपणे घडणारी क्रियाच वाटते.ऐनवेळी आलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सुचेल ते खोटं बोलणं म्हणजे थाप मारणं.अशी थाप मारण्यात अहितकारक उद्देश असतोच असं नाही.पण एकदा थाप मारुन प्रश्न सुटल्याचा आभास निर्माण झाला की त्याची मग सवयच लागते.ती एकदा अंगवळणी पडलेली सवय मग अनेक अडचणीना निमंत्रण देणारीच ठरते.स्वार्थासाठी थापा मारुन दुसऱ्यांना टोप्या घालणारे थापाडे किंवा खोटं बोलून स्वतःचं उखळ पांढरं करुन घेणारे खोटारडे यांना मात्र सख्खी भावंडंच म्हणायला हवे.
बिकट परिस्थितीतून वाट शोधण्याचा सोपा मार्ग म्हणून एक थाप मारणारे हळूहळू त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे दुसरी थाप मारायला प्रवृत्त होतात आणि मग नाईलाजाने एकामागोमाग एक थापा मारीत स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात अडकून बसतात.या कल्पनेचा लज्जतदार मसाल्यासारखा वापर करुन खुमासदार विनोदी चित्रपट निर्माण करणारे कल्पक दिग्दर्शक आणि उत्स्फुर्त नैसर्गिक अभिनयाने त्यांना दिलखुलास साथ देणारे कलाकार यांच्या समन्वयाने आपल्याला हसवत ठेवल्याच्या अनेक हसऱ्या आठवणी हा प्रदीर्घ लेखाचाच विषय होईल.प्रोफेसर, अंगूर,पडोसन, गोलमाल,चाची ४२०, मालामाल विकली, हंगामा,बरेलीकी बर्फी,वाट चुकलेले नवरे,चिमुकला पाहुणा,थापाड्या, अशी ही बनवाबनवी हे वानगीदाखल सांगता येतील असे कांही हिंदी मराठी चित्रपट..!’थापा’म्हणजे या सारख्या चित्रपटात वापरलेला, दु:ख-विवंचना विसरायला लावणारा आणि खळखळून हसवणारा चविष्ट खुमासदार विनोदमसालाच…!!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈