श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
साखरभाताची साखर झोप!
“अगं जरा ऐकतेस का !”
“तुमचच तर ऐकत आले आहे जन्मभर !”
“हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.”
“मग काय उत्तर अपेक्षित आहे गुरुवर्यांना ?”
“हे s s च ! मी म्हणतोय नां ते हे s s च ! ते व्हाट्स ऍपवर तुमच्या महिला मंडळाच्या “खुमखूमी” ग्रुपवर सारखे, सारखे पुणेकरांवरचे पुणेरी विनोद वाचून, तुझी भाषा जन्माने जरी तू अस्सल गिरगावकरीण असलीस, तरी आता साध्या साध्या प्रश्नांची उत्तर देतांना पण, पुणेरी भाषेत द्यायला लागली आहेस !”
“आता या विषयावर, बेडवर पडल्या पडल्या, रात्री अकरा वाजता माझं बौद्धीक घेणार आहात कां ?”
“अगं, काही जणांची मराठी जशी इंग्राजळलेली असते, तशी तुझीही मराठी आता साधं साधं बोलतांना पण, मुळा मुठेच्या पात्रात डुबकी मारल्या सारखी बोलायला लागल्ये, कळलं ?”
“इ s s श्श ! हल्ली मुळा मुठेच्या पात्रात चुळ भरण्या इतकं सुद्धा पाणी नाहीये, त्यात मी मेली डुबकी कशी काय मारणार ?”
“हे तुला कुणी सांगितलं?”
“अहो परवा लेले काकी गेल्या होत्या पुण्याला, त्या सांगत होत्या !”
“काय ?”
“त्यांची गाडी नदीच्या पुलावरून जातांना, त्यांनी भक्तीभावाने एक पाच रुपयाचं नाणं, चालत्या गाडीतून नदी पात्रात टाकलं !”
“मग ?”
“मग काय मग, खालून एका माणसाचा किंचाळण्याचा आवाज आला ! म्हणून त्यांनी ड्रायवरला गाडी थांबवायला सांगितली आणि त्या खाली नदी पात्रात डोकावून पाहायला लागल्या आणि बघतात तर काय ?”
“काय ?”
“अहो त्यांनी फेकलेलं ते नाणं पात्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या कपाळाला लागून, त्यातून रक्त येत होतं !”
“बापरे !”
“त्या मग तशाच धावत गाडीत बसल्या आणि त्यांनी ड्रायवरला गाडी हाणायला सांगितली !”
“हा s णा s य s ला ! काय ही तुझी भाषा ? मी मगाशी जे म्हटलं ते काही अगदीच खोटं नाही ! अगं गिरगांवातल्या गोरेगावकर चाळीला स्मरून, निदान दामटवायला, हाकायला असं तरी म्हणं गं !”
“त्यानं काय फरक पडणार आहे ?”
“जाऊ दे, तुझ्याशी या विषयावर आत्ता वाद घालण्यात अर्थ नाही ! गूड नाईट !”
“अरे वा रे वा, असं कसं गुड नाईट !”
“म्हणजे ? मी नाही समजलो !”
“अहो आत्ता माझा चांगला डोळा लागत होता, तर तुम्हीच नाही का, ‘अगं ऐकतेस का?’ असं बोलून माझी झोप उडवलीत ती !”
“अरे हॊ, आत्ता आठवलं. तू उद्यासाठी जो ‘साखरभात’ करून ठेवला आहेस नां, तो जरा चमचाभर आणून देतेस का ?”
“आत्ता ? रात्री अकरा वाजता ? अहो वाटलं तर सकाळी नाश्त्याला घ्या तो आणि जेवतांना पण घ्या की, आत्ता कशाला उगाच रात्री झोपताना तुम्हाला चमचाभर साखर भात हवाय ?”
“अगं त्याच काय आहे नां, आमच्या मास्तरांनी ‘साखरझोप’ ह्या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला आहे !”
“बरं, मग ?”
“मग काही नाही, म्हटलं अनायासे तू आज साखरभात केलाच आहेस, तर तो थोडा खाऊन झोपीन ! म्हणजे रात्री साखरझोप लागून, सकाळी त्यावर काहीतरी लिहिता येईल असा एक सुज्ञ विचार मनांत साखर पेरून गेला इतकंच !”
“अस्स होय ! आता आमच्या ह्या प्रौढ ढ विद्यार्थ्यांची मलाच मेलीला काळजी घेतली पाहिजे ! नाहीतर उगाच मी त्याला आत्ता साखरभात दिला नाही, म्हणून तो जर उद्या परीक्षेत नापास झाला, तर त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडून मोकळा व्हायचा !”
असं बोलून बायको किचन मधे गेली आणि बाउल मधे साखरभात घेवून आली. मी पण विजयी मुद्रेने तो बाउल घ्यायला हात पुढे केला आणि धाडकन बेडवरून खाली पडलो!
© श्री प्रमोद वामन वर्तक
२८-०१-२०२२
ताजा कलम – या पुढे भविष्यात प्रौढ शिक्षणाच्या मास्तरांनी, ‘झोप’ या विषयाला धरून निबंध लिहायला सांगितला, तरी त्या विषयी आज जागेपणी, काहीही न लिहिण्याचा मी संकल्प करत आहे !
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈