श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
💃 भन्नाट ट्रॅकर! 😅
“नमस्कार पंत ! हा तुमचा पेपर !”
“मोऱ्या रोज गपचूप पेपर ठेवून गुल होतोस, आज वेळ आहे वाटत बोलायला ?”
“थोडा वेळ आहे खरा पंत आणि तुमचा सल्ला सुद्धा हवा होता, म्हणून हाक मारली !”
“म्हणजे कामा पुरता पंत आणि चहा पुरती काकू ! काय बरोबर नां ?”
“पंत कसं आहे नां सध्या कामाच्या गडबडीत, बरेच दिवसात काकूंच्या हातचा आल्याचा चहा पोटात गेला नाही त्यामुळे पोट जरा कुरकुर करतच होतं, म्हणून म्हटलं एकात एक दोन कामं उरकून टाकू !”
“बरं, बरं, कसा काय चालला आहे तुझा नवीन लघुउद्योग ?”
“एकदम मस्त ! तुम्हीच तर गेल्या वेळेस बोलणाऱ्या कुकरची आयडिया दिलीत आणि त्याला भरपूर रिस्पॉन्स मिळतोय समस्त भगिनीवर्गाचा !”
“चांगलं आहे ! आज काय कामं काढलं आहेस मोऱ्या, कुठल्या बाबतीत सल्ला हवा आहे तुला ?”
“पंत, आता बोलणाऱ्या कुकरची प्रॉडकशन लाईन सेट झाली आहे माझी ! आता लोकांना आवडणार, उपयोगी पडणार तसंच दुसरं कुठलं तरी नवीन प्रॉडक्ट काढायचा विचार मनांत येतोय, पण काय प्रॉडक्ट काढावं तेच कळत नाही ! म्हणून म्हटलं तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया वगैरे आहे का हे विचारावं, म्हणून आलोय !”
“आहे नां, नसायला काय झालंय ? उगाच का डोक्यावरचे गेले ?”
“काय सांगता काय पंत, नवीन प्रॉडक्टची आयडिया….”
“अरे आज सकाळीच माझ्या या सुपीक डोक्यात आली आणि आज तू जर का भेटला नसतास ना, तर मीच तुला बोलावून घेवून सांगणार होतो ती नवीन आयडिया !”
“पंत आता मला धीर धरवत नाहीये, लवकर, लवकर सांगा तुमच्या डोक्यातली नवीन आयडिया !”
“अरे मोऱ्या, आमच्या सगळ्या सिनियर सिटीझनचा हल्ली एक हक्काचा आजार झालाय, त्यावर एखाद औषधं…..”
“काय पंत ? आजारावर औषधं द्यायला मी डॉक्टर थोडाच आहे ?”
“अरे गाढवा, आधी माझं बोलणं तरी नीट ऐकून घे, मग बोल !”
“सॉरी पंत, बोला !”
“अरे, आजकाल स्मरणशक्ती दगा देते आम्हां सिनियर सिटीझन लोकांना आणि साधा डोळ्यावरचा चष्मा कुठे काढून ठेवलाय तेच वेळेवर आठवत नाही बघ !”
“बरं मग ?”
“मला एक सांग मोऱ्या, तुम्हां हल्लीच्या तरुण पोरांना सुद्धा, तुमचा मोबाईल तुम्हीच तुमच्या हातांनी, कुठे ठेवला आहे ते पण कधी कधी आठवत नाही, काय खरं की नाही ?”
“हॊ पंत, मग आम्ही लगेच…..”
“दुसऱ्या मोबाईल वरून कॉल करतो आणि रिंग वाजली की मोबाईल कुठे आहे ते तुम्हाला बरोब्बर कळतं, होय नां ?”
“बरोबर पंत ! पण त्याचा इथे काय संबंध ?”
“सांगतो नां ! आता तू काय कर, चष्म्याला GPS tracker लावून द्यायचा नवीन उद्योग सुरु कर ! म्हणजे काय होईल अरे माझ्या सारखी सिनियर सिटीझन मंडळी कुठे चष्मा विसरली, तर मग तो शोधायला प्रॉब्लेम यायला नको, काय कशी आहे नवीन उद्योगाची आयडिया ?”
“काय भन्नाट आयडिया दिलीत पंत ! मानलं तुम्हाला ! धन्यवाद !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
०४-०३-२०२२
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈