श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
आधुनिक शिरस्त्राण ! श्री प्रमोद वामन वर्तक
“नमस्कार पंत, उद्याच्या कार्यक्रमाचे लक्षात आहे ना तुमच्या ?”
“अरे असा कसा विसरेन मी ?आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आणि हिच्या हातून, तुझ्या नवीन फॅक्टरीच गुढीपाडव्याला उदघाट्न होतंय ह्याचंच अप्रूप आहे आम्हां दोघांना !”
“पंत, अहो तुमच्याच कल्पनेतून ह्या फॅक्टरीचा जन्म झालाय, मग त्याच्या उदघाटनाचा मान तुम्हाला नको का द्यायला ?”
“मोऱ्या, हरवलेला चष्मा कसा शोधायचा यावर बसल्या बसल्या, चष्म्याला ट्रॅकर लावायची कल्पना सुचली मला आणि तू मेहनतीने फॅक्टरी काढून ती प्रत्यक्षात आणतोयस ह्यातच आनंद आहे !”
“पंत तुम्हाला सांगतो, माझ्या त्या चष्म्याच्या ट्रॅकरची जाहिरात मी नुसती द्यायचा अवकाश, पहिल्या आठवड्यात दीड लाख चष्म्याच्या ट्रॅकरची ऑर्डर आल्ये मला !”
“अरे व्वा, परत एकदा तुझं अभिनंदन !”
“बरं पंत, येतो मी, उद्याची सगळी तयारी करायची आहे, त्यामुळे…”
“अरे जाशील रे मोऱ्या, पाच मिनिटांनी काही फरक पडणार नाही ! आता मी काय सांगतो ते नीट ऐक !”
“बोला ना पंत !”
“अरे तुझ्या या चष्म्याच्या ट्रॅकरमुळे माझ्यासारख्या सिनियर सिटीझनची चष्मा कुठे ठेवला आहे तो शोधायची सोय झाली हे खरं आहे, पण आजकालच्या तरुण मुलांसाठी सुद्धा एक अत्यंत उपयोगी अस डिव्हाईस तू काढावंस असं मला वाटत !”
“पंत, म्हणजे मला तुम्ही एखाद्या नवीन प्रॉडक्टची आयडिया तर नाही ना देत ?”
“अगदी बरोब्बर मोऱ्या !”
“आता मला धीर धरवत नाहीये पंत, लवकर, लवकर सांगा तुमच्या नवीन प्रॉडक्टची आयडिया !”
“सांगतो, सांगतो ! पण त्याच्या आधी मला एक सांग मोऱ्या, हल्ली तुझं मॉर्निंग वॉक काय म्हणतंय ?”
“सॉरी पंत, सध्या नव्या फॅक्टरीच्या कामात मॉर्निंग वॉकला जायला जमत नाही मला !”
“बरं, बरं, मी समजू शकतो तुझी अडचण ! मोऱ्या, हल्ली मी मॉर्निंग वॉकला गेलो ना, की एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते !”
“कोणती पंत ?”
“अरे आपले मुंबईचे कावळेदादा आणि इतर पक्षी तारा आणि काड्या जमा करून घरटी बांधायला लागलेत, आहेस कुठे ?”
“पंत, म्हणजे यंदा पाऊस वेळेवर पडणार म्हणायचा तर !”
“असं म्हणायला हरकत नाही मोऱ्या !”
“म्हणजे पंत, तुम्ही मला नवीन प्रॉडक्टची आयडिया देणार आहात, ती पावसाशी संबंधित तर नाही ना ?”
“मोऱ्या गाढवा, उगाच तुझ्या नसलेल्या अकलेची फाटकी छत्री उघडून, अक्कल झाकायचा प्रयत्न करू नकोस !”
“तसं नाही पंत, तुम्ही एकदम कावळे, चिमण्या, घरटी, पाऊस या विषयी बोलायला लागलात म्हणून….”
“मोऱ्या, अरे त्या मुक्या पक्षांना सुद्धा येणाऱ्या संकटाची, त्यांच्यासाठी पावसाळा हे एक प्रकारचे संकटच म्हणायचं, चाहूल लागते आणि आपण स्वतःला या विश्वात सर्वात बुद्धिमान म्हणवणारे मानव येणारे संकट ओळखू शकत नाही, याचीच मला खंत वाटते !”
“पंत, जरा मला समजेल असं बोलाल का ?”
“मोऱ्या मला सांग, आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता ?”
“आता हे काय पंत ? तुम्ही एकदम हवामानाच्या अंदाजावरून शरीरशास्त्रावर घसरलात की !”
“ठीक आहे, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर तू आता निघ ! आम्ही दोघं उद्या….”
“असे रागावू नका पंत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपला मेंदू !”
“बरोब्बर मोऱ्या आणि आपला मेंदू शाबूत असेल तर सगळंच अलबेल असतं, हॊ का नाही !”
“म्हणजे तुम्ही मला सुचवणाऱ्या नवीन प्रॉडक्टचा संबंध आपल्या मेंदूशी आहे तर !”
“आहे, आहे, तुझा मेंदू थोडातरी कार्यरत आहे म्हणायचा !”
“पंत आता जास्त ताणून न धरता नवीन प्रॉडक्टची आयडिया सांगितलीत तर बरं होईल !”
“अरे मोऱ्या त्याच काय आहे ना, तुमची हल्लीची तरुण पिढी, मोटरसायकल वरून वेगाच्या नशेत, ट्राफिकचे नियम न पाळता रस्त्यावरून नुसती सुसाट पळत असते !”
“तुम्ही म्हणता ते खरं आहे पंत, आजकाल असं झालं आहे खरं ! पण त्याचा नवीन प्रॉडक्टशी काय संबंध ?”
“अरे 95% तरुण हेल्मेट न घालता सुसाट वेगाने मोटरसायकल चालवून स्वतःच्या आणि पदचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असतात !”
“अगदी बरोबर पंत !”
“तर मोऱ्या, माझ्या डोक्यात काय आलं सांगतो, कुणीही हेल्मेट न घालता गाडी चालवायचीच नाही मुळी.”
“पंत, सरकारी नियमच आहे तसा, पण लक्षात कोण घेतो ?”
“म्हणून मी काय म्हणतो मोऱ्या, तू असं एखाद हेल्मेट तयार कर, की ते घातलं तरच मोटरसायकल चालू होईल ! चालवणाऱ्याच्या डोक्यावर हेल्मेट नसेल तर गाडीच चालू होणार नाही ! कशी आहे माझी नवीन प्रॉडक्टची आयडिया ?”
“भन्नाट आयडिया आहे पंत ! बघतो कसं काय जमतंय ते आणि काही सुचलं तर तुम्हाला नक्की कळवतो !”
“मोऱ्या जमेल तुला ! अरे इच्छा तिथे युक्ती असं कुणीस म्हटलंच आहे !”
“बरं येतो मी पंत !”
“आणि एक लक्षात ठेव, अशा हेल्मेटची जेंव्हा फॅक्टरी काढशील तेंव्हा….”
“तुम्हांलाच उदघाटनाला बोलवीन, मग तर झालं !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
०१-०४-२०२२
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈