श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
🤣 घाम आणि अक्कल ! श्री प्रमोद वामन वर्तक
“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर ! आज पेपरात वाचण्यासारखं काही नाही, म्हणून लवकरच आणला !”
“मोऱ्या, उद्यापासून एक कामं कर !”
“कोणतं पंत ?”
“आमचा पेपर वाचायला न्यायचा नाही, कळलं ?”
“असं करू नका पंत, गेली कित्येक वर्ष मी तुमचा पेपर तुमच्याआधी वाचतोय आणि परत आणून पण देतोय ना आठवणीने ?”
“गाढवा, आमचाच पेपर आम्हांला परत आणून देतोयस म्हणजे काय मेहेरबानी करतोयस की काय माझ्यावर ?”
“असं रागावू नका पंत, पण पेपरात आज खरंच वाचण्यासारखं काही नाही. रोजच्याच रटाळ बातम्या वाचून वाचून कंटाळा आलाय नुसता !”
“मग असं का करत नाहीस मोऱ्या, आपल्या एक ते आठ अहमद सेलरचा, चाळकमिटीचा अध्यक्ष या नात्याने, ‘अहमदी सफर’ नावाचा एक पेपर चालू कर ना तूच, म्हणजे तुला हव्या तशा बातम्या त्यात देता येतील संपादक या नात्याने आणि तुझा पेपर कसा वाचणेबल करायचा हे तुला ठरवता ही येईल, काय ?”
“ही मस्त कल्पना आहे पंत तुमची ! आपल्या आठ चाळीत काही ना काही रोज घडतंच असतं, त्यामुळे बातम्यांना पण तोटा नाही !”
“खरं आहे मोऱ्या, आठ चाळीतली नळावरची रोजची भांडण, प्रत्येक चाळीतली किंवा दोन चाळीत मिळून चालू असलेली प्रेम प्रकरणं, शाब्दिक हमरी तुमरी, मारामाऱ्या, नवरा बायकोची भांडण, असा बराच मसाला वापरून तुला तुझा पेपर रंजक आणि वाचनीय बनवता येईल बघ !”
“पंत समस्त आठ चाळीतील चाळकऱ्यांना सुद्धा कुठल्या चाळीत काय चालू आहे ते कळेल. लगेच ‘अहमदी सफरच्या’ कामाला लागतो आता, येतो पंत !”
“मोऱ्या तुझ्या ‘अहमदी सफर’ मध्ये इतर पेपरात जसा लोकांच्या पत्र व्यवहारासाठी, त्यांच्या समस्या किंवा विचार मांडण्यासाठी एक कोपरा राखीव असतो, तसा ठेव बरं का !”
“जरूर पंत, लोकांच्या समस्या मला चाळकमिटीचा अध्यक्ष या नात्याने लोकांच्या पत्रांनी कळल्या तर बरंच होईल, म्हणजे त्यावर लगेच काहीतरी तोडगा काढता येईल !”
“हॊ मोऱ्या !”
“पंत, जसं तुम्ही चाळीच्या पेपरला नांव सुचवलत तसं त्या पेपरमधील पत्र व्यवहाराच्या कोपऱ्याला पण नांव सुचवा ना तुम्हीच ?”
” ‘तुमच्या मनांत, सांगा जनांत’ हे नांव कसं वाटतंय तुला त्या पत्र व्यवहाराच्या कोपऱ्याला ?”
“अगदी योग्य आहे पंत ! तुमच्या मनांत काही असेल तर पत्र रूपाने ते आम्हाला कळवा, आम्ही ते आमच्या पेपरच्या पानावर छापून त्याला जनात सांगून प्रसिद्धी देवू, मस्त !”
“मोऱ्या एक लक्षात ठेव तुझ्या पेपरात माझंच पाहिलं पत्र प्रसिद्ध व्हायला हवं !”
“नक्कीच पंत, पण तुमच्या पत्राचा विषय काय असेल तेच माझ्या ध्यानात येत नाहीये, तो जर आधी कळला तर…..”
“मोऱ्या, आपल्या आठ चाळीत रोज कुणाकडे ना कुणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतंच असतं आणि…”
“पंत, आता आठ चाळी मिळून ४८० बिऱ्हाड म्हटली की असं होणारच ना !”
“त्याला माझी हरकत नाहीच मुळी, आपापल्या घरच मंगल कार्य नक्कीच साजरं करावं सगळ्यांनी पण ते कशा प्रकारे साजरं करावं याला काही पद्धत असते ना रे !”
“हॊ पंत, आपण म्हणता ते बरोबर, पण हौसेला मोल नसतं असं आपणच म्हणतो ना ?”
“अरे म्हणून काय उठल्या सुटल्या कुठल्याही कार्यक्रमात मोठं मोठ्याने DJ लावून नाचायलाच हवं का ?”
“पंत असते एकेकाला हौस त्याला…..”
“म्हणून बारशाला सुद्धा त्या लहान बाळाचा विचार न करता कर्ण कर्कश्य DJ लावून अचकट विचकट नाच करायचे ?”
“तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पंत, हल्ली सगळ्याच चाळीतून कुणी ना कुणी पेशंट असतो, बऱ्याच सिनियर सिटीझनना मोठ्या आवाजाचा त्रास होतो, हे कुणी लक्षातच घेत नाही ! पंत तुम्ही लिहाच या विषयावर पत्र, चांगल्या ठळक चौकटीत तुमचं पत्र छापतो की नाही बघा !”
“अरे मोऱ्या या अशा लोकांना सांगायला हवं, की उठल्या सुटल्या त्या DJ च्या तालावर नाचून नाचून तुम्हांला फक्त घाम येईल, पण अक्कल नाही येणार !”
“बरोबर पंत !”
“त्या DJ वर खर्च होणारे हजारो रुपये दुसऱ्या कुठल्या तरी सामाजिक कार्याला द्या, हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदत करा यातच तुमचं आणि समाजाच भलं आहे.”
“अतिशय उत्तम विचार दिलात तुम्ही पंत ! आजच नवीन पेपरच्या कामाला सुरवात करतो, शुभस्य शीघ्रम !”
“मोऱ्या, पण एक लक्षात ठेव, तू तुझा पेपर काढलास तरी आमचा पेपर कसाही असला, तरी रोज आमच्या आधी नेवून वाचायचा आणि न विसरता परत आणून द्यायचा, काय ?”
“हॊ पंत, धन्यवाद, येतो !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
ठाणे.
०८-०४-२०२२
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈