विविधा
☆ चैत्रगौर – उत्सवाचं लेणं… ☆ प्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर ☆
वसंत ऋतु आला. आंब्याचा मोहोर गळाला .फाल्गुनातील रंग अधिक गहिरे झाले. चहुकडे आनंद पसरला आणि या आनंदात अधिक भर पडते चैत्रपालवीने. झाडे हिरव्यागार पानांनी, फुलांनी ग्रीष्माचे स्वागत करायला तयार होतात. आपली दाट सावली वाटसरूसाठी अधिक दाट करतात. अशावेळी नव्या वर्षाचा नवा दिवस घरोघरी गुढ्या उभारून साजरा केला जातो .नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी घरोघरी चैत्र गौरीचे आगमन होते.
हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीचे महत्त्व आहे. पौर्णिमा तर साजरी होते पण अमावसेला ही महत्त्व आहे. प्रकाशाला प्राधान्य आहेच, पण अंधाराकडेही दुर्लक्ष नाही. प्रकाश- अंधार या चक्राच्या गतीत तर जीवनाचे सार आहे . प्रतिपदा द्वितीया, तृतीया अगदी चतुर्दशीपर्यंत प्रत्येक तिथी कधीतरी महत्वाची असते. चैत्र महिन्यात तृतीयेचे महत्त्व आहे. ही गौरी येते ती चैत्र शुद्ध तृतीयेला. येते तो हवामान बदल करतच. क्षणात गडगडाटासह गारांचा पाऊस तर क्षणात स्वच्छ ऊन. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकू लागल्या, की चैत्रगौर जवळ आली असे समजावे. देवा इतकेच देवीला ही आमच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. आणि ही चैत्रगौर साधीसुधी नाही तर माहेरवाशीण आहे. आमच्याकडे एरवी मुलीचे कौतुक होणार नाही पण लग्न झाल्यानंतर ती सासरहून माहेरी आली की सगळे घर तिच्यापुढे नाचत असते. आई तर वेडीपिशी होते. लेकीला काय खाऊ घालू काय नको असे तिला होते. तिच्या आवडीचे आठवून आठवून केले जाते. चार-सहा दिवसा करता आलेली असते ,मग कौतुक करायला नको ? तसं या लेकी चे कौतुक होत असते. परत ही लेक वर्षातून एकदाच येत असते, मग काय विचारावे.! ती झोपाळ्याचा हलतच नाही नव्हे ती झोपाळ्यावर बसूनच येते. हा झोपाळा पितळी असतो किंवा लाकडी असतो. लहान-मोठा कसाही चालतो. पण झोपायला हवाच . कारण दिवस तिचे हे फुलायचे, झोपाळ्या सकट झुलायचे असे असतात.
आल्या दिवशी तिला तेल लावून न्हाहू माखू घालतात. खण नेसवतात. कैरी, लिंबू , मिरच्या वगैरे घालून भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीच्या चटणीचा नैवेद्य दाखवतात. आंब्याचे पन्हे करतात. तिचा थाट काही निराळाच. जवळ जवळ महिनाभर ती मुक्कामाला असते. चैत्र शुक्ल तृतीयेला येते व वैशाख शुक्ल तृतीयेला तिला पोहोचती करावे लागते. या महिनाभरात तिला नवनवीन पदार्थ खाऊ घालावे लागतात. चैत्री पौर्णिमा नंतरच्या तृतीयेला मधली किंवा दुसरी तीज म्हणतात. या दिवशी पण डाळ पन्हे देवीसमोर ठेवतात. आणि मग करावा लागतो तिचा थाटमाट. तिचे खास हळदीकुंकू. जे कित्येक वर्षापासून आमच्या परंपरेत चालत आलेले आहे.
पूर्वी हळदीकुंकू म्हणजे बायकांना एक पर्वणीच असायची. एकमेकींना भेटण्याची आणि दागदागिन्यांनी नटण्याची. बायकांची चार दिवसापासून धांदल उडते.लाडू , करंज्या, अनारसे, चकल्या ,शेव सगळे तिखट, गोड पदार्थ करावे लागतात. ज्या दिवशी हळदीकुंकू असेल ,त्यादिवशी परत गरम पाण्याने स्नान जरीचा खण घालून तिला बसवावे लागते. मोठी आरास करावी लागते .ही आरास कोण किती कौशल्याने करतो, यातही चढाओढ असते. कोणी पानाफुलांचा झोपाळा करून त्यावर तिला बसवतात. कोणी एकावर एक पेट्या करून त्यावर कपडा घालून पायऱ्यांचा आभास करतात. आजूबाजूला पडदे लावतात. काही कल्पक कपड्यांचे जहाज , चंद्र असं काहीतरी करून नेहमीपेक्षा वेगळे कौशल्य दाखवतात. समोर डिशमध्ये फराळाचे पदार्थ भरून ठेवतात. खेळणी मांडतात. सुंदर रांगोळी काढतात. तिला जितके नटवता येईल तितके नटवतात. आहो बायकांचं काय सृष्टी देखील तिचं कौतुक करते. नाहीतर पावसाळा नसताना पावसाळी वातावरण थोडा वेळ तरी का निर्माण व्हावे ? गडगडाटासकट पाऊस का पडावा? तर चैत्र गौरीचे डोहाळे म्हणजे इच्छा पुरवण्यासाठी म्हणे. मोगरा सुद्धा बहरतो याच दिवसात. सगळे वातावरण ती सुगंधी व प्रफुल्लित करते. म्हणूनच बायका एरवी कोणाकडे जायच्या नाहीत पण चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला नाही म्हणणार नाहीत.
येणाऱ्या बायकांना चहा नसतो हो द्यायचा. आलेल्या बाईला आधी हळद कुंकू लावायचे. आत्तर लावायचे. गुलाब पाणी शिंपडायचे . कैरीचे पन्हे , खिरापत द्यायची. काही ठिकाणी खिरे म्हणजे पांढऱ्या काकड्या देतात. तर काही ठिकाणी चंदनाची उटी बायकांच्या हाताला लावतात व त्यावरून शिंपल्याने रेषा ओढतात . या उटीने हाताला एक वेगळेच सौंदर्य येते व परत कुंकवाचे वरती ठिपके द्यायचे. रंग संगती व थंडावा या दोन्ही गोष्टी किती सोप्या पद्धतीने साध्या जातात नाही का? शेवटी भिजवलेल्या ओल्या हरभऱ्याचे ओटी भरायची.
ऋतुमानाप्रमाणे सण साजरी करणारी आपली संस्कृती आहे .नाहीतर एरवी खा खा म्हटले तरी भिजवलेले पौष्टिक हरभरे कोणी खाणार नाही. पण या दिवसात दोन-तीनदा तरी अशी ओल्या हरभऱ्याची उसळ होते. असे हे शितल, प्रसन्न , उत्साही हळदीकुंकू बाहेरच्या गर्मीची , उष्णतेची जाणीवही होऊ देत नाही. चैत्रगौर अशी दिमाखात राहते आणि अक्षयतृतीयेला त्याच दिमाखात तिची बोळवण करावी लागते , एखाद्या माहेरवाशिणीसारखी.. जर अक्षय तृतीयेला बुधवार असेल तर ही माहेरवाशीण दुसऱ्या दिवशी जाते.
हे हळदीकुंकू कैरीच्या पन्हाचे, ओल्या हरभऱ्याचे, पांढऱ्या काकडीचं , चंदनाच्या सुवासीक अत्तराचे , चांदीच्या गुलाबदाणीतून येणाऱ्या गुलाब पाण्याचं . सुगंधी, प्रफुल्ल , पवित्र, शितल असंच असतं. यांनीच येणाऱ्यांचे स्वागत करावं… कारण चैत्रगौर म्हणजे तरी कोण? तुमच्याआमच्यातलीच माहेरपणाच्या कौतुकाला आसावलेली एक मनगौरच आहे. एक उत्सवाचं लेणं घेऊन आलेली… खरं ना…..
© प्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर
सोलापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈