श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
छत्री आणि फ्लोट ! श्री प्रमोद वामन वर्तक
“नमस्कार पंत !”
“अरे मोऱ्या काय पत्ता काय तुझा ?”
“फातर फेकर चाळ नंबर ६, खोली नंबर…..”
“आता फार काही बोललास तर तोंडाला फेफर येई पर्यंत हा पेपरवेट फेकून मारिन मोऱ्या तुला !”
“हे बरं आहे पंत, आपणच प्रश्न विचारायचा आणि मी उत्तर द्यायला लागलो की….”
“अरे गाढवा तुझा पत्ता काय म्हणजे इतके दिवस कुठे गायब झाला होतास ? असं विचारतोय मी !”
“अस्स होय ! पंत तुम्हीं सुचवलेले अनेक व्यवसाय आता नावा रुपाला आले आहेत आणि ते सांभाळता सांभाळता दिवसाचे २४ तास पुरत नाहीत मला !”
“मग आज कसा काय वेळ मिळाला ?”
“पंत, चांगली पावसाळी हवा आहे, हवेत छान गारवा आहे, अशा वेळेस काकुंच्या हातचा आल्याचा गरमा गरम चहा मिळाला तर मग काय, सोनेपे सुहागा ! म्हणून आलो !”
“मोऱ्या उगाच चहाला जाऊन कप लपवू नकोस !”
“म्हणजे ?”
“म्हणजे आता इतक्या दिवसांनी आला आहेस मोऱ्या, तर तुला चहा मिळणारच आहे, पण मी तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत हे विसरू नकोस ! त्यामुळे पटकन काय ते खरं कारण सांग, म्हणजे हिला सांगून तुझ्या नरड्यात चहा ओतलाच म्हणून समज !”
“पंत तुम्ही खरंच मनकवडे आहात अगदी !”
“आता मला जास्त मस्का न लावता चटचट बोललास तरच तुला लवकर चहा मिळेल मोऱ्या, नाहीतर माझं मन वाकड झालं तर चहाच काय, साध पाणी सुद्धा मिळणार नाही तुला लक्षात ठेवं !”
“सांगतो, सांगतो पंत ! आता पावसाळा जवळ येवून ठेपलाय दारात हे तर तुम्हांला माहित आहेच !”
“बरं मग ?”
“तर पंत या पावसाळ्यात एखादा नवीन उद्योग सुरु करावा असं मनांत आलं आणि म्हणून तुमच्या सुपीक डोक्यात एखादी नवीन आयडिया आली असेल आणि ती जर कळली तर…..”
“अब आया उंट पहाडके नीचे !”
“म्हणजे मी उंट ?”
“नाही रे, तू तर पहाड !”
“मग उंट कोण ?”
“तो तिकडे अरबस्तानात !”
“पण त्याचा इथे काय संबंध पंत ?”
“खरंच कठीण आहे तुमच्या हल्लीच्या पिढीच मोऱ्या !”
“म्हणजे ? मी नाही समजलो पंत!”
“ते सोडून दे मोऱ्या, आता तू तुझ्या येण्याचं खरं खरं कारण सांगितलं आहेस तर मी तुला एक धंद्याची नवीन आयडिया, जी आजच माझ्या सुपीक डोक्यात आली आहे ती सांगतो तुला !”
“म्हणजे तुमच्या डोक्यात ऑलरेडी नवीन आयडिया आलेली आहे ?”
“अरे उंटा…..”
“पण पंत तो तर अरबस्तानात असतो ना ?”
“अरे हॊ खरंच की !”
“मग !”
“सॉरी, सॉरी मोरू ! माझ्या गाढवा, हे कसं वाटतंय ?”
“हां, आता कसं बरं वाटलं कानाला पंत !”
“मला पण बरं वाटलं मोऱ्या ! तर काय सांगत होतो… हां उंट या प्राण्याला वाळवंटातल जहाज म्हणतात हे तुला ठाऊक असेलच !”
“हॊ पंत, शाळेत असतांना शिकलोय!”
“नशीब त्या उंटाच !”
“काय ?”
“काही नाही रे गधडया ! तर तू म्हणतोयस ते बरोबरच आहे, पावसाळा अगदी सुरू झाला आहे आणि तशातच पेपर मधल्या आणि न्यूज चॅनेलच्या बातम्या वाचून आणि ऐकून मला या नवीन उद्योगाची आयडिया सुचली बघ !”
“कुठल्या बातम्या पंत ?”
“मोऱ्या या पावसाळ्यात सुद्धा दरवर्षी प्रमाणे रस्त्यांच्या नद्या होणार आहेत आणि आपले मुंबई बेट दरवर्षी 2 सेंटीमीटर या वेगाने पुढच्या अनेक वर्षात समुद्रात बुडणार आहे !”
“काय सांगता काय पंत ? हे खरं आहे ?”
“पेपरवाले तरी असं ओरडून ओरडून सांगतायत आणि सगळे न्यूज चॅनेल पण त्यांचीच री ओढतायत !”
“मग अशा येवू घातलेल्या आपत्तीत, कुठला नवीन उद्योग करून मी माझ्या संपत्तीत भर घालावी असं वाटतंय तुम्हांला पंत ?”
“अरे व्वा मोऱ्या, अगदी अलंकारिक बोलायला लागलास की !”
“कसचं कसचं पंत, तुमच्या सहवासात राहून थोडं थोडं शिकलोय झालं ! बरं पण तुम्ही धंद्याची नवीन आयडिया सांगणार होतात ती तर सांगा आधी !”
“मोऱ्या या पावसाळ्यात तू लोकांना छत्र्यांचे मोफत वाटप करावेसे असं मला वाटतं !”
“पंत, आत्ताच मी कुठला नवीन धंदा करून माझ्या संपत्तीत भर घालावी असं म्हटलं आणि तुम्ही मला छत्र्या मोफत वाटायला सांगताय ?”
“अरे माझं नीट ऐकून तर घे !”
“बरं पंत, बोला !”
“अरे मी मगाशी तुला म्हटलं ना, या पावसाळ्यात पण मुंबईच्या रस्त्यांच्या नद्या होणार आहेत म्हणून!”
“हॊ, पण हल्ली गेला बाजार प्रत्येकाकडे छत्री असतेच असते आणि नसेल तर रेनकोट तरी असतोच असतो !”
“ते माहित आहे रे मला, पण रस्त्याची नदी झाल्यावर या दोघांचा काही उपयोग आहे का सांग बरं मला मोऱ्या !”
“नाही, पुरुषभर पाण्यात तसा या दोघांचा काडीचा उपयोग नाही हे तुमचं म्हणणं खरं आहे पंत ! “
“हॊ ना, म्हणून तू आता पोहतांना शिकावू स्विमर जसे प्लास्टिकचा हवा भरलेला फ्लोट वापरतात त्याचा बिझनेस सुरु कर आणि एका फ्लोटवर एक छत्री मोफत दे, म्हणजे जोराचा पाऊस असेल तेव्हा लोकं छत्री वापरतील आणि…. “
“रस्त्यांच्या नद्या झाल्या तर फ्लोट वापरून लोकं आपला जीव वाचवतील, हॊ ना पंत ?”
“अगदी बरोबर मोऱ्या !”
“धन्य आहे तुमची पंत !”
© प्रमोद वामन वर्तक
३०-०६-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈