सुश्री गायत्री हेर्लेकर
परिचय
नाव – सुश्री गायत्री हेर्लेकर
शिक्षण – M.Com., M.Phil.
मुळची कोल्हापूरची, सध्या वास्तव्य पुणे
कॉमर्स कॉलेज कोल्हापुर – 30-32 वर्षे प्राध्यापिका.
वाचन लेखनाची आवड
☆ विविधा ☆ चादर… अंथरतांना आणि पांघरतांना ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
दार किलकिले करुन, …हळुच आत डोकावुन सुनेने सांगितले, “आई, बेडशीटस मळलेल्या दिसतात. बदलता का आज? मशीनला लावुन टाकेन.”
खरंच की. केंव्हा बदलल्या तेही आठवत नव्हते, खरं तर पुर्वी असे होत नसे. नियमीत बदलणे व्हायचे.
अधेमधेही, काहीतरी कारण काढुन घरातील यच्चयावत कॉटवरच्या चादरी बदलायची सवय, आवड.. हौस किंवा सोसच होता, खुप वेळा त्यासाठी बोलुन पण घेत होते. पण हल्ली कंटाळा, आळस किंवा कोण येतंय माझ्या खोलीत बघायला … काहीतरी निमित्त काढुन चालढकल होते.
आता मात्र मोबाईल बाजुला ठेवुन, ताडकन… वयाला झेपेल इतपत… उठले. चादरी…. हो माझ्या भाषेत चादरीच.. काढाव्यात म्हणुन कपाट उघडले. बेडस्प्रेड, बेडकव्हर, बेडशीट, नाहीतर अगदी पलंगपोस काहीही म्हणा, मला मात्र “चादर”च जवळची वाटते.
चादरींचा हा ढीगच होता कपाटात.
रंग गेलेल्या थोड्याशा विटलेल्या पण जुन्या आठवणी आवडत्या म्हणुन ठेवलेल्या, काही २, ४वेळा धुऊनही खळ न गेलेल्या, टरटरीत वापरायला टाळाटाळ होणार्या, तर काही” “निमित्त्याने काढु”, “फारशी आवडली नाही, द्यायला होईल कुणालातरी ऐनवेळी” म्हणुन कोर्याकरकरीत लेबल ही न काढलेल्या, तर काही नेहमीच्या वापरातल्या. विविध प्रकारच्या रंगबेरंगी पानाफुलांच्या, जॉमेट्रिक डिझाईनच्या, बाटीक प्रिंट, वारली प्रिंट, पॅचवर्क, दोरीवर्क, विणलेल्या, हौसेने पेंट केलेल्या, आणि हो काही अगदी प्लेन सौम्य रंगांच्या. राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र, बंगाल, आसाम, काश्मीर, दक्षिण भारत, मध्य प्रदेश,अशा आसेतु हिमाचलातील अनेक प्रांतातील वैशिष्टे असलेल्या, काही तर परदेशी जन्मस्थान, आणि काही अगदी ओसरी पडवीतल्या ईचलकरंजी, सोलापुरच्या सर्वजणी सुखाने नांदत होत्या माझ्या या संग्रहात.
ही कोलकत्ता ट्रीपमधली,तर ती मैत्रिणीने बडोद्याहुन पाठवलेली.
नवर्याने कधीनाही ते एका लग्नाच्या वाढदिवसाला आणलेली, आणि आईला चादरींची आवड म्हणुन लेकीने वेळोवेळी आणलेल्या. लग्न_मुंजीत मिळालेल्या, नॅपकिन टॉवेल आणायला गेल्यावर खुपच आवडल्या म्हणुन घेतलेल्या, अन् हो नातींनी online मागवून दिलेल्या. प्रत्येक चादरीची वेगवेगळी आठवण. डबल, सिंगल, दिवाणावरच्या, अंथरायच्या, पांघरायच्या… किती प्रकारच्या आहेत.
कुठली जोडी सॉरी सेट काढावा हे ठरवतांना विचाराच्या धाग्यांत गुंतत च गेले.
काय म्हणाली सून, “”बेडशीटस मळल्यात, “आपल्या भाषेत “चादर मळली आहे,” डोक्यात काहीतरी चमकले, मनात आले, आपल्या आयुष्याची चादरही मळायला लागली, नव्हे मळली च आहे. नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले,
“चदरिया झिनी रे झिनी
राम नाम रस भिनी रे..”
एक छान भजन. मला आवडणारे. संत कबीरदासांचे. संतमंडळींची जीवनाकडे बघायची दृष्टीच किती वेगळी असते ना? अशी भजने, कोणत्याही गायकाच्या आवाजात, कोणत्याही शैलीत, डोळे मिटून, शांतपणे ऐका. शब्द कानावर पडतात पण मन गुंतते ते शब्दाशब्दातुन प्रतित होणार्या भावार्थातच. शरीराला दिलेली चादरीची उपमा मनात कुठेतरी खोलवर जाऊन रुजते. कमलपुष्पाच्या चरख्यावर ९, १०महिने विणायला लागलेली ही चादर, आपल्याला मर्यादित काळापुरतीच, कबीराच्या भाषेत “दो दिन”च मिळालेली असते.
आपल्या कर्माने “मैली” होते. मग संतांना वाटते, अन् ते भगवंतांना विचारतात अशा अर्थाचे एक भजन,
“मैली चादर ओढ के कैसे
द्वार तिहारे आऊं?”
कारण त्यांनाच माहित असते की भगवंताच्या भक्तीने, नामस्मरणाने ती निर्मल करता येते. अनेक भक्तशिरोमणींनी असे केल्याचे दाखले आहेत.
चादर म्हणजे कापड, वस्त्र. गीतेत, भगवंतांनी मनुष्यदेहाला दिलेले वस्त्राचा रुपक सर्वपरिचित आहे. संदर्भ, दुसरा अध्याय, २२वा श्लोक, “वासांसि जीर्णानि”.
आपण सामान्य माणसेही, चादर आणि वस्त्राचा संबंध शरीराशीच जोडतो. ऊपयोग जाणतो तो संरक्षणाचा. शरीराला इजा पोहचू नये, दुखापत होऊ नये याच हेतूने वापर करतो. अंथरुणात आणि पांघरुण म्हणुन. ती मळु नये म्हणुन काळजी घेतो.तरीही मळतेच. मग पाणी, साबण वापरुन स्वच्छ करतो, या शरीररुपी चादरीबाबत तसे करता येणार नाही का?
भगवंतनामावर विश्वास आणि सत्विचार, सत्संगती, सत्कर्म ही त्रिसुत्री लक्षात ठेवली पाहिजे, चादर अंथरतांना आणि पांघरतांना.
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈